Monday, 4 January 2021

असा घडलो असा वाढलो : पत्रकार हेमंत जोशीअसा घडलो असा वाढलो : पत्रकार हेमंत जोशी 

बहुतेक माणसे आत्मचरित्र तद्दन खोटे खोटे लिहून मोकळे होतात, मला खोटे लिहायला अजिबात आवडत नाही म्हणून मी आत्मचरित्र लिहीत नाही कदाचित लिहिणार पण नाही कारण आयुष्यात जे घडले किंवा घडते आहे ते लिहिले तर कदाचित कुटुंब सदस्य देखील उघडे पडतील आणि मी तर एवढा मोकळा कि माझे पहिले हस्तमैथुन देखील केव्हा, मी लिहून मोकळा होईल म्हणून त्या आगीशी खेळणेच नको आणि मला आयुष्यात जे वाटेला आले ते माझ्या शत्रूच्या देखील वाटेला येऊ नये हेच मी देवाला कायम मागत आलेलो आहे. माझा जो तुम्हाला दिसतो तो एक मुखवटा आहे, खरा चेहरा महाभयानक आहे म्हणून नकोच ते आत्मचरित्र लिहिणे त्याऐवजी प्रसंगानुरूप अनेकदा जे आयुष्यातले अनुभव मी लिहितो तो माझ्या आत्मचरित्राचा एक भाग समजावा आणि उरलेल्या भागाकडे दुर्लक्ष करावे. एक मात्र नक्की वाटत आले आहे कि आयुष्यात वाट्याला आलेली काही वाईट माणसे आज ना उद्या मला समजून घेतील माझे हळवे मन समजून घेतील आणि माझ्याशी खूप छान वागतील पण असे काही घडले नाही घडत नाही आणि आता तर वाटते अखेरच्या श्वासापर्यंत अस्वस्थ करून सोडणाऱ्या लोकांना आणि अनुभवांना बगलेत घट्ट पकडूनच पुढे पुढे जावे लागणार आहे, आसपास काही दुष्ट मनाची स्वभावाची माणसे असली कि अनेकदा वाटते हे जग लवकर सोडून निघून जावे पण उरलेल्या जवाबदाऱ्या आठवतात पुन्हा पुढल्या कामाला लागतो सारे दुःख विसरून आणि हृदयात साठवून... 

ज्यांनी शॉर्टहँड लिपी शोधून काढली त्या सर आयझॅक पिटमॅन यांचा ४ जानेवारी जन्मदिवस, याच पिटमॅन यांच्यामुळे मी वयाच्या केवळ १७ व्या वर्षी पोटापाण्याला लागलो आणि त्यांनी माझे आयुष्य देखील वर्षा दोन वर्षात बदलवून टाकले म्हणून त्यांच्यावर येथे लिहावेसे वाटले. जेव्हा माझ्या गावातले बुद्धिमान सुखवस्तू पदवीधर मुले इंग्रजी शॉर्टहँड शिकायला शहरात जायचे आणि काहीच महिन्यात अपयशी होऊन परत यायचे त्यावेळी वडील म्हणाले, हे आव्हान स्वीकार शॉर्टहँड शिकायला शहरात जा, मी घराबाहेर पडलो, वडिलांनी वर्षभर कुटुंब सदस्यांना अर्धपोटी ठेवून मला पैसे पाठवले स्टेनो केले, जेव्हा गावातले सारेच अपयशी ठरले त्याकाळी मी केवळ मराठी मिडीयम दहावी पास, वर्षभरात १२० वेगाची शॉर्टहँड परीक्षा पास झालो आणि कामाला लागलो पुढे धाकट्या भावाला पण स्टेनो केले इतरही चार कुटुंब सदस्य यथावकाश स्टेनो झाले आणि आम्ही दारिद्र्यातून पटकन बाहेर पडलो कारण इंग्रजी शॉर्टहँड शिकवण्याची मी अतिशय सोपी पद्धत त्याकाळी डेव्हलप केली आणि बघता बघता जळगावला माझ्याकडे शॉर्टहँड शिकण्यास हजारो विदयार्थ्यांची रांग लागली पण १९८७ दरम्यान लक्षात आले कि पुढले युग संगणकाचे आहे, शॉर्टहँड संपले आहे मग त्याक्षणी चांगले चालणारे शॉर्टहँड टायपिंग क्लासेस बंद केले आणि ज्यादा लक्ष पत्रकारितेवरच केंद्रित केले पुढे तेथेही वाचकांना नेमके देऊन भल्या भल्यांना मागे टाकले. विशेष म्हणजे स्टेनो झाल्याने पीए झाल्याने थेट सुरेशदादा जैन यांच्यासारख्या बड्या मंडळींच्या थेट सान्निध्यात आलो आणि मोठे कसे व्हायचे, व्यवसाय कसा करायचा हे शिकून घेतले आणि स्वप्ने साकार करता आली, अपेक्षेपेक्षा अधिक यशस्वी झालो ते केवळ त्याकाळी शॉर्टहँडवर कमांड मिळविल्याने... 

शॉर्टहँड म्हटले कि ते सर आयझॅक पिटमॅन यांनी शोधलेले इंग्रजी शॉर्टहँडच असायचे, त्यांचे ते पुस्तक त्याकाळी केवळ १२ रुपयांना मिळणारे एकमेव छोटेखानी पुस्तक पण त्या भरवशावर जगातले कितीतरी तरुण तरुणी पोटापाण्याला लागले. अमुक एखाद्याला स्टेनो आहे ते त्याकाळी मोठेपणाचे लक्षण होते, दुर्दैवाने स्टेनोग्राफीमध्ये दाक्षिणात्य मंडळींची मोनोपली होती कारण त्यांचे इंग्रजीवर प्रभुत्व असायचे आणि मराठी तरुण तरुणी  तर परवडेबल किंवा अचानकली असे शब्द वापरून इज्जत घालून मोकळे व्हायचे म्हणून मी शुद्ध मराठीतून अतिशय सोप्या पद्धतीने इंग्रजी शॉर्टहँडची त्याकाळी हजारोंना गोडी लावली आणि वयाच्या केवळ २०/२१ व्या वर्षी आर्थिक यश मिळवून मोकळा झालो वरून अनेक असंख्य मराठी विदयार्थ्यांना तेही सरकारी नोकरीत त्यातून स्थान मिळाले. पिटमॅन यांचे हे छोटेखानी पुस्तक पण जगात सर्वाधिक खपाचे म्हणून त्याकाळी ते असे वलयांकित होते. माझ्या गावातला त्याकाळी १२० वेगाची शॉर्टहँड परीक्षा पास झालेला मी पहिला विदयार्थी त्यामुळे गावात स्कुटर घेऊन आलो कि सारे गाव कौतुकाने बघायचे किंवा एकेकाळी गावाने ओवाळून टाकलेला मी खुपसा खोडकर पण स्टेनो झाल्याने साऱ्यांची आपोआप बोलती बंद झाली. केवळ अशक्यप्राय शॉर्टहँड शिकल्यानेच माझी प्रगती झाली दारिद्र्य संपून जीवनाला बढती मिळाली. ज्याकाळी ब्राम्हणाच्या खेड्यातल्या मुलांकडे स्वकर्तुत्वावर स्वतःची सायकल देखील नसायची त्याकाळी वयाच्या केवळ २१ व्या वर्षी माझ्याकडे स्वतःची कार होती. सर आयझॅक पिटमॅन यांना वाकून नमस्कार...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी  


No comments:

Post a comment