Wednesday, 30 December 2020

कोरोना आणि कैलासवासी कुंदन : पत्रकार हेमंत जोशीकोरोना आणि कैलासवासी कुंदन : पत्रकार हेमंत जोशी 

मित्रांनो, कोरोना अजिबात संपलेला नाही उलट तो गेल्या काही दिवसांपासून अधिक धोकादायक झाला आहे थेट हृदयात किंवा डोक्यात शिरतो माणूस कोसळतो देवाघरी जातो तेव्हा आपण काळजी घ्यायलाच हवी. २०२० आणि २०२१ च्या शेवटाला काय कमावले काय गमावले हे महत्वाचे ठरणारे नसून जर जिवंत राहिलो तर तीच मोठी कमाई अशी मनाची समजूत काढावी आणि तेच नेमके सत्य आहे. आमच्या खार परिसरातले एक व्यापारी गृहस्थ कुठेही घराबाहेर पडले नाही तरीही त्यांना कोरोना झाला आणि त्यात ते गेले कारण काय तर लॉक डाऊन संपताच त्यांची आवडती मोलकरीण घरी आली, बाईसाहेब अंघोळीला जातातच तिने शेटजींकडे ओठ आणि गाल केले यांनी मग पटापट तिचा आणि स्वतःचा इतक्या दिवसांचा उपवास सोडला, विकृतीपोटी तिच्यातली कोरोनाची लक्षणे त्यांना कळली नाहीत तिचा कोरोना पुढे वाढला पण त्यातून ती उठली शेटजी मात्र कायमचे देवाघरी गेले त्यांना हे असे मुके घेणे महागात पडले. अलीकडे एका व्यापारी मित्राचाच फोन आला, म्हणाला, हैप्पी एंडिंग आणि प्रत्येक अवयवाची मसाज करून घेण्यासाठी मी ज्या पार्लर मध्ये जातो तेथे पोलिसांनी धाड टाकली आहे तेथल्या मुलींना सोडा, हे तुम्ही पोलिसांना सांगा. मित्र जिवलग तरीही नाव खराब करणारे हे विकृत काम मी टाळले. हाच मित्र घरी सतत बायकोला जवळ घेऊन बसतो पण बाहेर जाऊन काय करतो तर वेश्यांकडून हि अशी भूक भागवून घेतो, कोरोना पसरेल नाही तर काय ? अर्थात हे नवीन नाही, जे पुरुष सहसा बाहेर घाण करून घरात येत नाहीत त्यांच्या बायका एवढ्या संशयी असतात कि नवऱ्यांना आयुष्य नकोसे वाटते आणि जे बायकोला पप्पी आणि बाहेर दररोज कुणाला तरी मिठी मारून मोकळे होतात अशा लबाड पुरुषांच्या बायकांना त्यांचे नवरे थेट प्रभू रामचंद्र आहेत असे वाटत असते... 

एक दिवस पुण्यात जवळचा मित्र व हरहुन्नरी कुंदन ढाके व मी एका कॉफी शॉप मध्ये गप्पा मारीत बसलो होतो. बाहेर त्याची बीएमडब्ल्यू फाईव्ह सिरीज कार उभी होती. माझ्याकडे यातले अमुक मॉडेल आहे पण फाईव्ह सिरीज नाही, मी म्हणालो.  त्यावर मला कुंदन लगेच म्हणाला, किंमत तुमची आणि गाडी माझी, घेऊन जा आणि त्याने खरेच मी सांगितलेल्या किमतीला मला फाईव्ह सिरीज दिली जी गेल्या तीन चार वर्षांपासून माझी आवडती कार आहे. वास्तविक मी कधीही वापरलेल्या कार्स विकत घेत नाही पण हि मित्राच्या प्रेमापोटी घेतली आणि हाच कुंदन ढाके, धडधाकट ढाके, परवा २८ डिसेंबरला सकाळी फिरायला गेला असता अचानक रस्त्यात जागेवरच कोसळला आणि ब्रेन हॅमरेज होऊन क्षणार्धात वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी जागच्या जागी गेला कारण तेच त्याला दिड महिन्यापूर्वी कोरोना झाला होता, शरीरात राहिलेली लक्षणे त्याच्या लक्षात आली नाहीत आणि मोस्ट हेल्थ कॉन्शस कुंदन माझा मित्र असा तडकाफडकी गेला, कोरोनाकडे असे जरासे दुर्लक्ष किंवा त्याबाबत न घाबरण्याचा अति आत्मविश्वास हा असा नडतो आणि अगदी पैलवान माणूस देखील जागच्या जागी जातो. पैसे पुढे आयुष्यभर मिळवायचे आहेत त्यामुळे ज्यांच्याकडे भरपूर पैसे आहेत त्यांनी निदान या दिवसात तरी रिस्क घेऊ नये, शक्यतो घराबाहेर पडू नये, जमिनीच्या खरेदी विक्रीतून साध्या शिक्षकाच्या या मुलाने ठेवायला जागा नाही एवढे पैसे मिळविले होते, पुढले काही दिवस त्याने जरा दमाने घेणे गरजेचे होते पण कोरोनातून उठताच तो पूर्वीच्याच उत्साहात कामाला लागला आणि कुंदन जीव गमावून बसला... 

८०-८२ च्या दरम्यान म्हणजे ८० दशकाच्या सुरुवातीला जळगावात दिवंगत ब्रिजलाल पाटील हे अतिशय प्रेमळ असे व्यक्तिमत्व होते ते जनता दलाचे नेते होते आणि जनशक्ती नावाचे दैनिक काढायचे विशेष म्हणजे हेच ब्रिजलाल पाटील व त्यांचे प्रेमळ बंधू विजय पाटील दोघांचाही मी अत्यंत लाडका त्यामुळे ते अतिशय अल्प दरात त्यांच्या ऑफसेट मशीनवर माझे त्यावेळेचे साप्ताहिक मला छापून द्यायचे. ज्या ब्रिजलाल पाटलांनी मला खूप सहकार्य केले त्यांचाच जनशक्ती पुढे कुंदन ढाके यांनी विकत घेतला कदाचित त्यामुळे मी व कुंदन एकमेकांच्या खूपसे जवळ आलो. जळगावला त्याने हे वृत्तपत्र चांगले सांभाळले आजही ते तेथे सुरु आहे, पुढे मात्र त्याने जनशक्ती जसा पुणे व मुंबईतून सुरु केला मी त्याला हटकले, म्हटले बंद कर हे दर्डा होण्याचे स्वप्न पण तोपर्यंत त्याचे जवळपास त्यावर ३५-४० करोड रुपये खर्च झाले होते. कुंदन मोठा व्यायसायिक होता म्हणून त्याने हा लॉस सहन केला पण त्याने माझे ऐकले आणि पुणे व मुंबईत वृत्तपत्र क्षेत्रात काढता पाय घेतला. सुखाचा जीव दुख्खात ज्यांना टाकायचा असतो त्यांनी दैनिक किंवा वाहिनी काढून मोकळे व्हायचे असते. उगाच मुंगेरीलाल के सपने बघतात आणि ज्यांना ज्ञान नाही अशी माणसे दैनिके काढून मोकळी होतात, खड्ड्यात जातात. अर्थात या संदर्भात कोणताही सल्ला हवा असला कि कुंदन ढाके आणि अनिल गावंडे माझ्या नरिमन पॉईंट येथील कार्यालयात हमखास यायचे मग आमचे एकत्र जेवण आणि मनसोक्त गप्पा पण आवडता कुंदन असा तडकाफडकी गेला असंख्य मित्रांना आणि तरुण कुटुंब सदस्यांना मागे ठेवून, अर्थात स्वर्गात देखील तो गप्प बसणार नाही, तेथेही ७-१२ बघून स्वस्तात जमिनी तेही थेट देवांकडून विकत घेऊन मोकळा होईल. कुंदन, तुझी सतत आठवण येत राहील, तुला श्रद्धांजली वाहतो... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


No comments:

Post a comment