Saturday, 26 December 2020

शुभेच्छा सामंत : पत्रकार हेमंत जोशीशुभेच्छा सामंत : पत्रकार हेमंत जोशी 
याआधी मी उभ्या आयुष्यात मराठी किंवा हिंदी मालिका कधीच बघितलेल्या नव्हत्या पण कोरोना महामारीमुळे कायम घरात, वेळ जात नाही म्हणून मुद्दाम एखादी दुसरी मराठी मालिका बघायला सुरुवात केली आणि सुरवात देखील नेमक्या एका अतिशय टुकार व भिकार मालिकेपासून झाली, अगबाई सासूबाई हि ती मालिका पण त्यातले दोन्ही प्रमुख पात्रे गिरीश ओक आणि निवेदिता जोशी सराफ जवळून परिचयाचे, म्हणून हि मालिका निवडली, या मालिकेचे भंगार कथानक, म्हणून मी एक दिवस गिरीश ओक यांना फोन करून विचारले त्यावर ते एवढेच म्हणाले, आमचा नाईलाज असतो ते जे सांगतात तेवढे करून मोकळे व्हायचे असते. अलीकडे तर निवेदिताला आलेल्या उचक्या बघून मनाशी म्हणालो, आता हे दाखवून मोकळे होतात कि काय, निवेदिताला गिरीश पासून दिवस गेलेत. अर्थात तसे प्रेक्षकांच्या पचनी यासाठी पडले असते किंवा योगायोग असा कि प्रत्यक्ष आयुष्यात गिरीश यांनी पोटच्या मुलीच्या मैत्रिणीशी लग्न केले आणि उतारवयात पुन्हा हे महाशय एका मुलीचे पुन्हा बाप देखील झाले तेच निवेदिताचे देखील, तिनेही आपल्यापेक्षा दुप्पट वयाच्या थोराड अशोक सराफ यांच्याशी त्याकाळी लग्न करून पुढे ती एका मुलाची आई देखील झाली.... 

२६ डिसेंबर, राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांचा वाढदिवस, त्यांना दीर्घायुष्य चिंतूया. सामंत यांचेही तेच, त्यांच्या चेहर्याकडून बघून त्यांच्या वयाचा अंदाज येत नाही त्यामुळे गिरीश किंवा निवेदिता सारखे त्यांच्याही बाबतीत असे घडू शकते कि उद्या समजा उदय शाळेचा गणवेश घालून दहावीच्या वर्गात येऊन बसले तरी इतरांच्या ते लक्षात येणार नाही. हसतमुख राहणे आणि सदैव उत्साही जगणे त्यांच्या तारुण्याचे उघड रहस्य. समोरचा मग तो कोणीही असो, क्षणार्धात एखाद्याला किंवा एखादीला आपलेसे करणे त्यांना अगदी सहज जमते, २६ डिसेंबरला सामंत यांचा वाढदिवस माझ्या ते लक्षात नव्हते पण २५ तारखेला तेही राष्ट्रवादीच्या नेत्याचा संजय शेट्ये यांचा फोन आला कि मी उदय सामंत यांच्यावर चार कौतुकाचे मी शब्द लिहावेत, असे हे सामंत ज्यांचे साऱ्या पक्षात अनेक क्षेत्रात राज्यात देशभरात जगभर मोठ्या संख्येने मित्र परिवार आहे. राष्ट्रवादी सोडून ते शिवसेनामय झाले तरीही त्यांचे आजही ते शरद पवार असोत कि काहीसे खडूस अजितदादा किंवा स्पर्धक सुनील तटकरे साऱ्यांशी  पूर्वीचे स्नेहाचे मैत्रीचे संबंध आहेत. जसे ते उद्धव ठाकरे यांचे अत्यंत लाडके आहेत विश्वासू सैनिक आहेत जबाबदारी न झटणारे मंत्रिमंडळातले सहकारी आहेत त्याचवेळी त्यांना बघता क्षणी थेट देवेंद्र फडणवीस यांचाही उर भरून येतो अगदी मनापासून ते उदय सामंत यांना बिलगून शुभेच्छा देऊन मोकळे होतात याचे प्रमुख कारण म्हणजे खालची मान वर न करता भेटायला येणाऱ्या प्रत्येकाचे ते मनापासून तेथल्या तेथे निर्णय घेऊन काम करून देतात, त्यातून त्यांची लोकप्रियता अशी वाढत गेली, साऱ्यांनी त्यांना त्यांच्या असलेल्या गुण दोषांसहित स्वीकारले मैत्री केली... 

कोरोना महामारीत आरोग्य विभाग जेवढा महत्वाचा त्या खालोखाल गृह व शिक्षण खाते सांभाळणे अत्यंत जिकिरीचे किंवा महाकठीण असे काम होते आणि क्लिष्ट शिक्षण खात्याची जबाबदारी या महामारीत उच्च व तंत्र शिक्षण खात्याचे मंत्री म्हणून उदय सामंत यांनी यशस्वीपणे हाताळली सांभाळली सांभाळताहेत, कदाचित त्यांचा एखादा दुसरा निर्णय मंत्री या नात्याने काहीसा वादग्रस्त ठरला देखील असेल पण त्यावर आडमुठी भूमिका न घेता त्यांनी होणाऱ्या टीकेचा देखील विचार केला अभ्यास केला प्रसंगी चार पावले ते नक्की मागे आले. विशेष म्हणजे तब्बल एक वेळ नव्हे तर लागोपाठ दोन वेळा त्यांनाही कोरोनाने घेरले पण उदय तेथेही घाबरले नाहीत मागे हटले नाहीत घाबरणे त्यांच्या रक्तात नाही ते जसे अंथरुणातून बाहेर आले लगेचच रत्नागिरी जिल्ह्यात आणि राज्यातील विविध जबाबदाऱ्यांना यशस्वी सामोरे गेले. असे म्हणतात, उदय सामंत कोकणातले असे एकमेव नेते जे कोणत्याही विधान सभा मतदार संघातून उभे राहिले तरी अगदी सहज नेहमीप्रमाणे निवडून येतील, अतिशय मोठ्या मनाचा हा नेता प्रत्येकासाठी धावून जातो साऱ्यांना संकटात सहकार्य करतो म्हणून कोकणातल्या प्रत्येकाला अगदी त्याच्या कट्टर विरोधकाला देखील हवाहवासा वाटतो. त्यांनी युवा नेता म्हणून एकेकाळी जशी राष्ट्रवादी राज्यात मोठी करण्यात महत्वाची भूमिका निभावली, मला खात्री आहे, आज त्यांनी त्यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातली शिवसेना टॉपला आणली उद्या हेच उदय सामंत लोकप्रिय शिक्षण मंत्री आणि शिवसेनेचे यशस्वी नेते या नात्याने राज्यातल्या शिवसैनिकात उत्साह भरतील आणि शिवसेना आहे त्यापेक्षा मोठी करण्यात शंभर टक्के मोलाची महत्वाची भूमिका पार पाडून मोकळे होतील. त्यांना पुन्हा एकवार वाढदिवसाच्या शुभेच्छा ! 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 
No comments:

Post a comment