Wednesday, 21 October 2020

खडसेंचे हसे कि खडसे फसे : पत्रकार हेमंत जोशीखडसेंचे हसे कि खडसे फसे : पत्रकार हेमंत जोशी 
कधीकाळी उज्वल गुप्ते नावाचा माझ्यापेक्षा वयाने लहान असलेला चुणचुणीत देखणा हुशार तरुण माझे टंकलेखन आणि लघुलेखनाचे उत्तम चालणारे क्लासेस सांभाळायचा, त्यावेळी मी त्याचा एकेरी उल्लेख करीत असे आणि हाक देखील एकेरी नावाने मारत असे. पुढे मी त्याच्याशी माझ्या सख्य्या धाकट्या बहिणीचे लग्न लावून दिले त्यानंतर मात्र आजतागायत किंवा याहीपुढे मी उज्वल यास उज्वलराव म्हणू लागलो आणि एकेरी उल्लेख देखील त्यानंतर टाळला कारण माझ्यासाठी उज्वलरावांचे नाते बदलले होते विशेष म्हणजे लग्नानंतर उज्वलराव माझा एकेरी नावाने उल्लेख करू लागले कारण तो अधिकार त्यांना प्राप्त झाला होता. १९८७ दरम्यान जेव्हा मी मुंबईत आलो, काही महिने माझे वास्तव्य व्हीटी स्टेशन समोरील स्टाफ कॉलेज च्या विश्राम गृहात होते तेव्हा माझ्या शेजारी आयएएस करणारे आनंद लिमये, शेखर चन्ने, सतीश सोनी, संजय चहांदे, सुरेश काकानी, अरुण दुबे इत्यादी वास्तव्याला होते, आम्ही मित्र झालो आणि समवयस्क म्हणून एकमेकांना एकेरी नावाने उल्लेख करू लागलो पुढे ते सारे राज्याचे प्रशासकीय अधिकारी झाले, त्यानंतर मात्र मी त्यांचा उल्लेख प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष कधीही एकेरी केला नाही कारण ते मोठ्या पदावर गेले आणि खुर्चीचा मान राखायचाच असतो, जो नेमका मान एकनाथ खडसे यांना देवेंद्र फडणवीसांचा राखता आला नाही म्हणजे देवेंद्र मुख्यमंत्री आणि खडसे मंत्री असतांना देखील ते कायम प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फडणवीसांच्या खुर्चीचा अजिबात मान न राखता  एकेरी बोलायचे आणि उर्मट तेही साऱयांदेखत वाट्टेल ते त्यांना बोलून मोकळे व्हायचे, थेट मंत्रिमंडळाच्या साप्ताहिक बैठकीत देखील साऱयांदेखत मुख्यमंत्र्यांचा पाणउतारा करायचे, देवेंद्र म्हणजे लिंबू तिंबू आणि आपणच फार मोठे या अविर्भावात एकनाथ खडसे  यांनी स्वतःचे आणि कुटुंबाचे फार मोठे राजकीय नुकसान करून घेतलेले आहे. नाही म्हणायला गिरीश महाजन मंत्री झाले होते आणि फडणवीस थेट मुख्यमंत्री पण केवळ असूयेतून या दोघांचा पाणउतारा, नुकसान अधिक खडसे यांचेच झालेले आहे हे नक्की... 

जळगाव जिल्ह्यात शरद पवारांची राजकीय ताकद अरुण गुजराथींनी कधीही फारशी वाढवली नाही पण स्वतःची आर्थिक ताकद मात्र त्यांनी कशी उत्तम वाढवली हे एक दिवस मला अगदी सविस्तर त्यांच्या शहा आडनावाच्या एकेकाळी व्यवहार सांभाळणाऱ्या व्यक्तीने सांगितले होते. राजमल लखीचंद या सोन्याच्या पिढीचे मालक आणि शरद पवारांचे कायम पाठीराखे ईश्वरबाबू जैन यांनी नाही म्हणायला एकदा पवारांचे जळगाव जिल्ह्यात थेट सहा आमदार निवडून आणले होते, विशेष म्हणजे ईश्वरबाबू जैन आणि एकनाथ खडसे एकमेकांचे तसे कट्टर राजकीय शत्रू पण आता दुर्दैवाने दोघेही पवारांच्या झेंड्याखाली एकत्र येताहेत, आले आहेत.  याच ईश्वरबाबू यांच्या मुलाने म्हणजे मनीष यांनी एकनाथ खडसे यांच्या दिवंगत मुलास विधान परिषदेत पराभूत केले होते या पराभवाने खचूनच निखिल यांनी आत्महत्या केली असे खडसे आजही बोलून दाखवतात त्यामुळे त्यानंतर मग दुखावलेल्या खडसे यांनीही अप्रत्यक्ष जैन कुटुंबियांना मोठ्या आर्थिक अडचणीत आणून सोडले, थोडक्यात जैन व खडसे दोघेही एकमेकांपासून दुखावलेले व दुरावलेले त्यामुळे खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाने शंभर टक्के ईश्वरबाबू जैन व कुटुंबीय नाराज निराश झालेले आहेत. तीच बाब जळगाव जिल्ह्यातील पवारांच्या पाठीशी असलेल्या मराठा नेत्यांची, तसेही लेवा पाटील व मराठा पाटील या जिल्ह्यात राजकारणात फारसे एकत्र नांदताना आजपर्यंत कधी दिसलेले नाहीत. एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादी प्रवेशाचे नक्की ठरल्यावर तर आमदार अनिल पाटील, माजी मंत्री सतीश पाटील, अभिषेक पाटील, खडसे यांचे दुसरे कट्टर शत्रू रवींद्र पाटील, माजी मंत्री गुलाबराव देवकर, संजय गरुड इत्यादी ८-१० नेते थेट शरद पवारांना भेटून म्हणाले कि एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी पक्षात आणू नका त्यावर पवार  म्हणाले, जळगाव जिल्ह्यात तुम्हाला राष्ट्रवादीचे काम वाढवता आलेले नाही त्यामुळे पक्ष मोठा करण्याच्या दृष्टीने मला खडसे यांना प्रवेश देणे आवश्यक वाटते पण तुमच्या विनंतीनुसार मी त्यांना एवढ्यात नक्की मंत्री करणार नाही मात्र पुढल्या पंचवार्षिक योजनेत मला तो देखील विचार करावा लागेल. विशेष म्हणजे शिवसेना भाजपा युती आणि एकनाथ खडसे यांचे राष्ट्रवादीत प्रवेश करणे त्यातून उद्या आमदारकी मिळण्याची धूसर चिन्हे दिसू लागताच जर उद्या रवींद्र पाटील, सतीश पाटील इत्यादी नेत्यांनी इतर पक्षाची दारे ठोठावल्यास फारसे आस्चर्य वाटणार नाही.... 

एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपाच्या खासदार आहेत आणि खडसे हे पत्नी मंदाकिनी व कन्या रोहिणी यांच्यासह जवळपास राष्ट्रवादी झाले आहेत. रोहिणी राष्ट्रवादी मध्ये आणि रक्षा भाजपामध्ये थोडक्यात एकनाथ खडसे यांनी आपल्या हयातीतच त्या दोघींमध्ये फारसे आपापसात पटत नसल्याने त्यांची दोन वेगवेगळ्या पक्षात वर्णी लावून ते मोकळे झाले आहेत. एवढेसे चिमुकले ते मुक्ताई नगर पण या एकाच गावात आधीपासूनच एकनाथजी, रोहिणी आणि रक्षा यांची वेगवेगळी कार्यालये आहेत, आता वेगवेगळ्या पक्षात राहून खडसे कुटुंब एकमेकांपासून अधिक दुरावणार कि काय तसे इतरांना जाणवायला लागले आहे. जरी एकनाथ खडसे लगेचच पवारांनी मराठा नेत्यांना दिलेल्या शब्दानुसार मंत्री झाले नाहीत तरी त्यांना पक्षाचे कार्याध्यक्ष करून जळगाव जिल्ह्यात पक्ष वाढविण्यासाठी आणि राज्यातल्या भाजपामध्ये अस्वस्थता निर्माण करण्यासाठी शरद पवार शंभर टक्के एकनाथ खडसे यांचा उपयोग करून घेतील फक्त अडचण हीच कि अत्यंत नाजूक प्रकृतीचे एकनाथ खडसे त्यांना प्रचार व प्रसार करण्याची दगदग सहन होणार आहे का ? एकनाथ खडसे यांच्यासारखे थकलेले व दगदग अजिबात सहन न होणारे काही भाजपातले जळगाव जिल्ह्यातले नेते त्यांच्या संगतीने पक्षात आले म्हणजे ताकद वाढली असे नक्की होणार नाही तरीही शरद पवार यांचे अत्यंत तल्लख असे राजकीय डोके, त्यांनी टाइम पास म्हणून नक्की खडसे यांना राष्ट्रवादीत आणलेले नाही त्यामुळे नेमके रिझल्ट्स बघितल्यानंतरच नक्की काय घडले कोणाचे काय वाढले कोणाचे काय कमी झाले हे सांगता येईल. राष्ट्रवादीच्या झेंड्याखाली मुस्लिम, मराठा व लेवा एकत्र येणे, गिरीश महाजन यांची अडचण वाढली आहे, असे फारतर आज म्हणता येईल. मात्र लेवा समाजाची ताकद वाढवून जळगाव जिल्ह्यातील मराठ्यांचे महत्व कमी करणे किंवा खच्चीकरण करणे ना हे शरद पवार यांना परवडणारे आहे ना असा वेडेपणा पवार करून मोकळे होतील... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी No comments:

Post a comment