Wednesday, 2 September 2020

उडता महाराष्ट्र तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी

 उडता महाराष्ट्र तुम्ही आणि आम्ही : पत्रकार हेमंत जोशी 

उडता पंजाब च्या जवळपास येऊन पोहोचलेला आजचा आपला महाराष्ट्र , पूर्वी फार तर उच्चभ्रू मराठी स्त्रिया दारू प्यायच्या खचित सिगारेट्स ओढायच्या मराठी पुरुष दारू प्यायचे ड्रग्स त्यांना ठाऊकही नव्हते, आता तसे नाही मराठी तरुण व तरुणी यामध्ये फारसा फरक उरलेला नाही दोघेही सर्हास दारू पितात सिगारेट्स ओढतात त्यांच्यात ड्रग्स घेण्याचे प्रमाण अति झपाट्याने वाढले आहे वाढते आहे कारण या व्यसनांचे आम्ही एकेकाळचे सुसंस्कृत मराठी देखील उदात्तीकरण करतो आहे , व्यसनांकडे श्रीमंतीचे लक्षण म्हणून बघतो आहे. नागपुरातला माझा अनुभव सांगतो, आदल्या दिवशीपर्यंत माझ्या अत्यंत जवळचे दोन पुरुष ज्या एका तिसऱ्या पुरुषविषयी व त्याच्या व्यसनांविषयी त्याच्या व्यसनी पत्नीविषयी विकृत वृत्तीविषयी भरभरून भडभडून सांगत होते दुसरे दिवशी ते त्याच माणसाच्या षष्ठीला थेट स्टेजवर अगदी जाहीर तोंड भरून न थकता न थांबता कौतुक करतांना, विशेष म्हणजे तो कसा देवत्व प्राप्त झालेला संकट मोचक म्हणून तारीफ करतांना बघून मी अचंबित झालो. विशेष म्हणजे त्या कार्यक्रमात त्यांच्या या व्यसनी नेत्यावर जो विशेषांक काढण्यात  आला होता त्यात या दोघांचेही भरभरून स्तुतीपर लिहिलेले लेख होते. कार्यक्रम संपल्यानंतर बेशरम चेहरा करून ते दोघेही पुन्हा ह्या ह्या हसत जेव्हा माझ्यासमोर आले, एक हलकट कटाक्ष टाकून मी त्यांच्या पुढ्यातून निघून गेलो. या अशा व्यसनी आणि विकृत नवरा बायकोला आपल्या घरातही घेणे म्हणजे कुटुंब आपल्याच हाताने संपविण्याससारखे आहे असे आदल्याच दिवशी मला त्या त्यांच्या नेत्यांविषयी सांगणारे हे तद्दन लाचार या समाजात जागोजाग असल्यानेच मराठी उच्च कुटुंब व्यवस्था घसरते आहे घसरली आहे... 

मी माझ्या आयुष्यातले चांगले किंवा वाईट कधीही लपवून न ठेवता समाजाला सामोरा गेलो. माणसाच्या हातून चुका होतात पण त्या लक्षात आल्यानंतर अशा चुका पुन्हा न करणे म्हणजे आयुष्यावर प्रभुत्व मिळविणे असे मी समजतो. वयाच्या सोळाव्या वर्षी घरातून बाहेर पडल्यानंतर फार तर १७ व्या वर्षी मी नोकरीला लागलो तेव्हा मला पगार होता १५० रुपये त्यात धाकट्या भावाला माझ्यासारखे स्टेनोग्राफर करण्याचे माझे स्वप्न होते त्यामुळे कित्येक महिने मी एकदाच जेवत असे पण पगार मिळाला कि मी आणि माझा शिरीष नावाचा मित्र आपापल्या पगारातून दहा रुपये काढून त्यातल्या दोन रुपयांची गावठी दारू पिऊन उरलेल्या आठ रुपयांचे चमचमीत जेवण बाहेर घेत असू, पुढे याच गावठी दारूने शिरीष चा ऐन तारुण्यात जीव घेतला मी मात्र लगेचच वर्षभरात स्वतःला सावरले, गावठी दारूला कायमचा राम राम ठोकला पण ते दहा रुपये त्या दिवशी म्हणजे महिन्यातून एकदा मला दिवाळी साजरा केल्याचा आनंद द्यायचे. नंतर मात्र महिनाभर एकवेळ जेवण डोळ्यात पाणी आणायचे. पण पुढे फार लवकर मी दारिद्र्यावर मात केली त्यासाठी मला सुरेशदादा जैन व त्यांचे बंधू रमेश, सतीश व मधुभाभी यांची मोलाची मदत झाली.... 

भावाला स्टेनोग्राफर करून पुढे त्याला उच्च न्यायालयात त्यावेळेचे कायदा मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि सचिव चौधरी सहकार्याने प्रमोशन मिळवून देण्यात मी यशस्वी झालो. माझ्या डोळ्याचे पारणे फिटले. सुरेशदादा जैन किंवा मधुभाभी  यांची अलीकडे भेट होत नाही, सतीशदादा तर देवाघरी गेले पण जेव्हा केव्हा या कुटुंबाचा विषय निघतो मी त्यांच्यावर आधी कृतद्न्यता व्यक्त करून भरभरून बोलतो. खाल्ल्या मिठाला जागायचेच असते. मतभेद झाल्यानंतर देखील बेईमान व्हायचे नसते. १९९० नंतर मराठी माणूस देखील बेईमानी भ्रष्टाचार करून अनेक श्रीमंत झाले खरे पण नवश्रीमंत होणाऱ्यांचे कुटुंबाकडे मुलांकडे साफ दुर्लक्ष झाले. त्यामुळे १९९० नंतरची पिढी व्यसनांच्या आहारी गेलेली आहे. मला एक असे नेते कि मंत्री माहित आहेत कि ते पुण्यातल्या त्यांच्या घरी बाई आणि पैशांच्या आहारी गेल्याने जवळपास १५ वर्षे पत्नी आणि दोन मुलांकडे फिरकलेच नव्हते म्हणजे कधीतरी एखाद्या पाव्हण्या सारखे घरात थोडावेळ डोकवायचे त्यातून घडले असे कि त्यांचा एक मुलगा ड्रग्स व विविध वाईट व्यसनांच्या आहारी गेला. आता या नेत्याचे डोळे उघडले खरे पण वेळ निघून गेली आहे. आता हा नेता दररोज वाममार्गाला गेलेल्या तरुण मुलास म्हणतो कि तू वाट्टेल तसा वाग पण माझ्या नजरेसमोर २४ तास राहत जा आणि आता ते त्या मुलास शक्य नाही. अर्थात नवश्रीमंत झालेले आपण सारेच थोड्याफार फरकाने या नेत्यासारखे, राज्य विकून खाणारे जे कोणी आहेत असतील होतील त्यांना तो परमेश्वर सोडत नाही... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी No comments:

Post a comment