Monday, 7 September 2020

संजय बोले उद्धवजी डोले : पत्रकार हेमंत जोशी

 संजय बोले उद्धवजी डोले : पत्रकार हेमंत जोशी 

मराठी मानसिकता अनेकदा कशी चुकीची असते त्यातून आपण मराठी इतरांसमोर स्वतःचे कसे हसे  करून घेतो त्यावर काही उदाहरणे देता येतील. नव्याने सुरु झालेल्या "माझाच होशील ना" या मालिकेतले एक पात्र डॉ. सुयश अतिशय श्रीमंत दाखवलेला आहे पण त्याची कार फार तर ८-१० लाख रुपयांची स्कोडा रॅपिड हि दाखवलेली आहे, अरे दाखवा कि एखादी मर्सिडीज वगैरे पण नाही... त्यावर  माझ्यासमोर घडलेला एक किस्सा मला आठवला. किस्सा तसा खूप जुना आहे. सिनेमाचे नाव आठवत नाही पण त्या मराठी सिनेमाचे जुहूच्या कुठल्यातरी बंगल्यात चित्रीकरण सुरु होते मी सहजच लक्ष्मीकांत बेर्डे शूटिंग करत होता म्हणून आत डोकावलो. शेजारी दिवंगत पत्नी रुही पण बसलेली होती, गप्पा रंगल्या. त्यात एक सिन होता कि खलनायक म्हणतो अमुक एका ठिकाणी पाच लाख रुपये घरून ये. मी लक्ष्याला म्हणालो अरे निदान पन्नास लाख तरी म्हणायला सांग, पैसे द्यायचे तर नसतातच कि. त्यावर लक्ष्या म्हणाला, अरे मराठी माणसाकडे नसतात एवढे पैसे म्हणून मागायला लाज वाटते. अशी हि आपली कमकुवत मानसिकता. "माझाच होशील ना" मधला डॉक्टर सुयश नायिका साईला म्हणतो कि कार ऍटोमॅटिक आहे, पण थोड्याच वेळात नायिका कार चे गियर बदलतांना दिसते.... 😆

आपण मराठी स्वतःचेच घोडे पुढे दामटतो समोरच्या माणसाच्या चष्म्यातून बघायला तयार नसतो. आमचेच सांगणे तेवढे सत्य किंवा योग्य असे काहीतरी वेगळेच आपले विचार असतात. जो उठतो तो काही एक विचार न करता एकतर त्या संजय राऊत यांना किंवा उद्धव ठाकरेंना शिव्या शाप दूषणे दोष देऊन मोकळे होतो इतकेच काय अगदी अलीकडे एका शिवसेना नेत्याने म्हणे उद्धव यांना हिम्मत करून थेट तोंडावरच विचारले कि कशाला हे संजय राऊत यांचे विचित्र वागणे तुम्ही खपवून घेता आहेत त्यावर क्षणाचाही विलंब न लावता उद्धवजी म्हणाले संजय इज राईट, जे मला हवे आहे तेच संजय करून बोलून मोकळे होतात. हे असे असते मराठी माणसाचे म्हणजे त्याला सेक्स, सिनेमा आणि राजकारण यातले फारसे काहीही कळत नसते पण तिन्ही विषय त्याच्या जिव्हाळ्याचे त्यामुळे संधी मिळाली रे मिळाली कि या तिन्ही विषयांवर आपण आपले असे काही ज्ञान पाजळून मोकळे होतो कि विचारू नका. तुम्ही आम्ही आपल्या नजरेतून बघतो उद्धव यांच्या नजरेतून बघण्याची आपली मानसिकताच नाही. माझे वाक्य लिहून ठेवा जर उद्या ठाकरे कुटुंबाबाहेरचा मुख्यमंत्री, सेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना निवडायचा झाल्यास ते एकनाथ शिंदे यांना तिसऱ्या क्रमांकावर अनिल परब यांना दुसऱ्या क्रमांकावर तर संजय राऊत यांचा प्राधान्याने विचार करून त्यांनाच मुख्यमंत्री करून मोकळे होतील. कारण उद्धवजींना म्हणे असे सतत वाटते कि अनिल परब किंवा एकनाथ शिंदे या दोघांनाही जर आणखी मोठी फार मोठी संधी आणि जबाबदारी दिली तर ते स्वतःचा नारायण राणे करून मोकळे होतील म्हणजे कठीण प्रसंगी शिवसेनेतून बाहेर पडतील. धोका देतील कदाचित तसे होणारही नाही पण असे उद्धव यांना का वाटते त्यावर परब आणि शिंदे या दोघांनी स्वतःशी विचारमंथन करायला हवे... 

"शोले" या गाजलेल्या हिंदी चित्रपटात प्रत्येक गंभीर प्रसंगाआधी एकतर गाणे दाखवले आहे किंवा असरानी, धर्मेंद्र जगदीप, मावशी किंवा अमिताभ इत्यादींचे विनोदी प्रसंग टाकलेले आहेत. दर्शकांचे मन सिरीयस मूड मधून डायव्हर्ट करण्यासाठी हे केल्या गेले आहे. उद्धव ठाकरे दुसरे काय करतात म्हणजे आदित्य ठाकरे हा विषय असो किंवा कोरोना सारख्या महामारीत आलेले अपयश असो, ते मधेच संजय राऊत यांना आणून त्यांच्याकडून असे करून किंवा बोलून घेतात कि जनतेचेच नव्हे तर प्रखर प्रभावी विरोधकांचे देखील लक्ष डायव्हर्ट होऊन मन विचलित होते आणि उद्धव यांचे सरकार पुढे रेटण्याचे काम सोपे होते. काय बोलावे आणि काय बोलू नये हे तुम्हाला कळते ते संजय राऊत उद्धव ठाकरे यांना कळत नाही असे तुम्हाला म्हणायचे असेल तर तो मूर्खपणा आहे. आजपर्यंत संजय यांच्याकडून जे काय घडले आहे मग त्या मुलाखती असोत कि त्यांची बेताल वक्तव्ये, सारे काही नियोजन पूर्वक त्या दोघात हे आधी ठरविल्या जाते त्यांची त्यावर चरचा होते त्यानंतरच सारे काही घडत असते, लक्ष तुमचे विचलित होते त्यावेळी संजय आणि उद्धवजी गालातल्या गालात हसत असतात कारण त्यांनी नेहमीप्रमाणे पुन्हा एकदा तुम्हाला उल्लू बनविलेले असते. फारतर उद्धवजी यांना संजय यांचे हशिश, गांजा किंवा दारू सारखे ऍडिक्शन आहे म्हटले तर वावगे ठरणार नाही म्हणजे त्यांना या कामासाठी फक्त संजयच हवे असतात असे वाटल्यास तुम्ही म्हणावे पण त्या दोघांना काही कळत नाही असे जेव्हा तुम्ही म्हणत असता वास्तवात लोकांनो अशावेळी खरेतर तुम्हालाच काही कळत नसते... 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment