Friday, 11 September 2020

सेना गोत्यात महाआघाडी संकटात : पत्रकार हेमंत जोशी

सेना गोत्यात महाआघाडी संकटात : पत्रकार हेमंत जोशी 

या दिवसात काही कुटुंब सदस्यांचा जर तुम्हाला मानसिक शारीरिक जाच त्रास असेल आणि तुमचे सतत घरी बसून असणे, मला वाटते त्यातून अनेकांना आत्महत्या करावी का असे वाटत असेल किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेणे त्यांना नक्कीच गरजेचे असेल, घराबाहेर पडल्यानंतर  एकवेळ थेट दाऊद शी पंगा घेऊन किंवा दंगा करून मोकळे व्हाल पण कुटुंब सदस्यांचे किंवा जवळच्या खाष्ट नातेवाईकांचे दुष्ट वागणे त्यासमोर टिकणे महाकठीण असे काम असते. एकमेकांशी सलोखा न राखता येणे अशी माणसे वास्तवात वेडी असावीत असे वाटते. या कठीण महामारीत ज्यांनी घरी शांतता राखली ते खरे सुसंस्कृत कारण राज्यकर्त्यांनी तर या कोरोना साथीचे महामारीचे महाधिंडवडे काढले आहेत असा माझा त्यांच्यावर थेट आरोप आहे, केवळ उद्धव ठाकरे यांना लक्ष्य करून उपयोगाचे नाही तर एखादा दुसरा अपवाद सोडल्यास जवळपास अख्ख्या मंत्रीमंडळाने राज्याची लोकांची वाट लावलेली आहे, आज सत्ता हाती आहे त्यामुळे महा आघाडीच्या बहुसंख्य मंत्र्यांनी हवे तेवढे लुटून न्यावे पण जनता वैतागली आहे, भविष्यात मतदार तुम्हाला कधीही माफ करणार नाहीत जवळ घेणार नाहीत. आपले सरकार फार टिकणारे नाही हे लक्षात आल्याने कि काय जो तो लूटमार करून मोकळा होतो आहे... 

आजवरचा राज्याचा राजकीय इतिहास असे सांगतो कि निवडणुकांच्या आधी जे हिंदू विशेषतः मराठी मतदार शिवसेना यावेळी संपली असे छातीठोकपणे सांगतात तेच पुढे शिवसेनेच्या पाठीशी भरभक्कम उभे राहून सेना उमेदवारांना मोठ्या प्रमाणावर मतदान करून मोकळे होतात त्यामुळे उद्धवजी विजयाच्या बाबतीत कायम सदा कॉन्फिडन्ट असतात,  पण लिहून ठेवा यापुढे नजीकच्या किमान दहा वर्षात असे घडणार नाही जर उद्धव यांनी त्वरित जनताभिमुख काही निर्णय घेऊन जनतेला मृत्यूच्या दारातून खेचून आणले नाही. भलेही कंगना रिया अर्णब सुशांत दिशा संजय असे विविध विषयांना महत्व देऊन महाआघाडी सरकार कोरोनाच्या अपयशातून जनतेचे लक्ष यादिवसात डायव्हर्ट करण्यात यशस्वी ठरत असेल किंवा ठरली असेल पण निवडणुकांच्या तोंडावर हेच मराठी हिंदू मतदार शिवसेनेची काँग्रेस केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत कारण जे विषय महत्वाचे आहेत त्याकडे महाआघाडीच्या मंत्र्यांचे, सरकारचे साफ दुर्लक्ष आणि आज याला संपवा उद्या त्याला बदनाम करा याकडेच अधिक लक्ष केंद्रित करणे, हे जे काय सुरु आहे, मोठी किंमत १०० टक्के विशेषतः शिवसेनेला मोजावी लागणार आहे आणि माझी लेटेस्ट माहिती अशी कि कोणत्याही क्षणी महाआघाडीतून बाहेर पडण्याची काँग्रेसची पूर्ण मानसिकता झाली आहे किंबहुना त्यांनी तसे ठरविलेच आहे.... 

राज्यातले सारेच  मराठी मतदार शिवसेनेच्या पाठीशी, असे आजतागायत कधीही राज्यात घडलेले नाही पण हे मात्र नक्की घडले आहे कि जे शिवसेनेचे परंपरागत मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार सेनेच्या पाठीशी प्रत्येक कठीण प्रसंगी किंवा कोणत्याही निवडणुकीत कायम उभे राहायचे उभे असायचे यावेळी मात्र मी जो राज्याचा कानोसा घेतो आहे ती एक प्रकारे सेनेला धोक्याची घंटा आहे, आता खुद्द सेनेचा परंपरागत मतदार विशेषतः कडवा शिवसैनिक देखील सेनेच्या चुकीच्या विविध भूमिकांना आणि युवा नेतृत्वाला मनापासून वैतागला आहे. एक ज्येष्ठ सेना नेते अलीकडे मला म्हणाले हि केवळ युवा सेना आहे, बाळासाहेबांची प्रगल्भ शिवसेना जवळपास इतिहासजमा झाली आहे कारण मातोश्रीवर कडव्या व अनुभवी नेत्यांना नव्हे तर उथळ पोरकट अमराठी दलालांचे महत्व वाढवून ठेवण्यात आलेले आहे. नको त्या अंगावर येणाऱ्या मंडळींच्या नादी लागून त्यांच्यावर दहशत निर्माण करण्याच्या नादात सेना नेते का म्हणून आपली इज्जत  इभ्रत ताकद घालवून बसताहेत न उलगडणारे हे कोडे आहे ज्यामुळे यापुढे मुंबईतल्या शिवसेनेला कोण घाबरतो, अशी मोठी पुण्याई लाभलेल्या मिळविलेल्या शिवसेनेची जागतिक व भारतीय पातळीवर प्रतिमा नक्की निर्माण होणार आहे. भलेही माझ्यासारख्या असंख्य मराठी मंडळींना शिवसैनिक व्हायचे नसेल पण मराठी माणसाचे तारणहार म्हणून सेनेकडे प्रत्येक मराठी विशेषतः मुंबईकर मोठ्या अभिमानाने बघत आला आहे, आज तीच मराठी माणसाचा स्वाभिमान, शिवसेना जर अधोगतीच्या मार्गाने जात असेल तर  डोळ्यात टचकन अश्रू येतील, मन सैरभैर होईल.... 

एक आणखी अतिशय महत्वाचा मुद्दा येथे मांडतो कि आदित्य ठाकरे अजूनही वेळ गेलेली नाही, तुम्ही मंत्री पदाचा राजीनामा द्या, मी देखील आजोबा से सवाई आहे हे सेना नेता म्हणून सिद्ध करा, कुठे काही चुकलेच असेल तर अशा चुका पुन्हा करणार नाही अशी शपथ घ्या आणि आज तर साधे मंत्री आहात,  पुढे मुख्यमंत्री व्हा मात्र हे असे जर घडले नाही तर उद्धवजींची गादी तेज तेजस ठाकरेंच्या हवाली, अशी बातमी एक दिवस कानावर पडल्याशिवाय राहणार नाही, तातडीने सावध व्हा...

तूर्त एवढेच : हेमंत जोशीNo comments:

Post a comment