Thursday, 20 August 2020

काका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी


काका पुतणे : भाग २: पत्रकार हेमंत जोशी

दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांचे घराणे आणि कुटुंब सदस्य संख्यने फार मोठे पण राज ठाकरे यांना ज्यादिवशी मजबूर होऊन मातोश्रीला पारखे व्हावे लागले तेव्हापासून जवळपास सारेच ठाकरे व नातेवाईक एकमेकांपासून दूर गेले आणि खुबीने केवळ चार सदस्यांचे ठाकरे कुटुंब आता ओळखल्या जाऊ लागले आहे, तेजस आदित्य श्रीमती रश्मी आणि उद्धवजी नेमके हे असेच राज्याचे राजकरणातले जे दुसरे नामांकित पवार घराणे आहे तेथे देखील सेम तो सेम घडलेले आहे. अख्खे प्रचंड संख्येचे पवार एकीकडे आणि शरदराव व त्यांच्या मुलीचे कुटुंब एकीकडे असे सध्या पवारांकडे देखील आहे. आप्पासाहेबांपासून तर अभिजित अजित रोहित पार्थ इत्यादी इतर पवार कुटुंब सदस्यात कोणीही शरदरावांच्या आणि सुप्रियाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करता कामा नये अन्यथा त्यांचा लगेच राजकीय खात्मा करण्यात येतो हि वस्तुस्थिती आहे. पवार आणि ठाकरे या दोन्ही कुटुंबातले काही सदस्य जवळचे नातेवाईक माझ्या बऱ्यापैकी परिचयाचे ओळखीचे आहेत, जेव्हा केव्हा अनुक्रमे शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे राजकीय ग्राफ खाली येतात ते एखाद्या मोठ्या अडचणीत सापडतात तेव्हा तेव्हा या दोघांच्याही अनेक तेही अतिशय जवळच्या नातलगांना गुदगुदल्या होतात हि वस्तुस्थिती आहे, माझ्या या परिच्छेदावर शरद पवार आणि उद्धवजींना नक्की राग येईल पण काय करू काहीही मनात ठेवणे मला अशक्य असते मी लिहून मोकळा होतो... 

पवार आणि ठाकरे कुटुंबात कटुता निर्माण झाली ती काका व पुतणे या नात्याने विशेष म्हणजे पवार व ठाकरे यांच्यासारखे या राज्यात काका पुतणे असे वाद निर्माण झालेले अनेक राजकीय घराणी आहेत ज्यात कटुता आल्याने काकांचेच अधिक राजकीय नुकसान झालेले आहे जे पवार व ठाकरे यांचे झाले तसे. रोह्याचे सुनील तटकरे नव्या मुंबईचे गणेश नाईक नागपूर काटोलचे अनिल देशमुख बीडचे जयदत्त क्षीरसागर उस्मानाबादचे डॉ. पदमसिंह पाटील असे त्यावर कितीतरी उदाहरणे तुम्हाला सांगता येतील. ज्या सुनील तटकरे यांची राजकीय ताकद राज्याचे संघटन सांभाळण्याची त्या सुनील तटकरे यांना पोटचे जेमतेम राजकीय ताकद असणारे किंवा बापाच्या भरवशावर पुढे गेलेले मुलगा अनिकेत आणि मुलगी आदिती फार महत्वाचे वाटले त्याचवेळी पाठीशी कायम राजकीय ताकद देणारे बंधू अनिल आणि पुतणे अवधूत डोळ्यात खुपले त्यातून नेमके घडले असे कि हेच सुनील तटकरे आज केवळ राज्यमंत्री असलेल्या मुलीचे आर्थिक व्यवहार सांभाळण्यात धन्यता मानत असल्याचे चित्र मंत्रालयात अगदी उघड बघायला मिळते आहे. पैसा आणि सत्ता आधी माझ्या मुलांसाठी नंतर इतर नातेवाईकांसाठी आणि कधीतरी जीवाला जीव देणार्या कार्यकर्त्यांसाठी हि हलकट स्वार्थी नीच बदमाश संधीसाधू वृत्तीच ज्या त्या नेत्यांमध्ये बघायला मिळते त्यातूनच क्षणिक फायदा पण पुढे अशा कुटुंबांचे वाटोळे होते गेलेले दिसते... 

www.vikrantjoshi.com

या राज्यातल्या हिंदुत्वाची मक्तेदारी जशी भाजपा आणि राष्ट्रीय  स्वयंसेवक संघाकडे आहे तशी तमाम मराठी जनतेची मक्तेदारी केवळ शिवसेनेकडे आत्ता आत्तापर्यंत होती विशेषतः मुंबईतील विशेषतः अमराठी व मुस्लिम समाजासमोर हतबल ठरलेल्या मराठी माणसाला शिवसेनेचा फार मोठा आधार होता हे तुम्हाला सांगणे म्हणजे सुनील ताटकरेंच्या मालमत्तेविषयी अनिल तटकरे यांना सांगण्यासारखे. पण उद्धव ठाकरे यांना शरद पवार यांनी अतिशय खुबीने मुख्यमंत्री केले उद्धव यांनी आदित्य यांना काही एक गरज नसतांना आधी आमदार केले नंतर मंत्री केले तेथेच सारे बिनसले. उद्धव मातोश्रीच्या ज्या दिवशी बाहेर पडले त्याच दिवशी मी लिहून ठेवले आहे कि आता सारे संपले. सत्तेतले अननुभवी उद्धवजी विनाकारण पवारांच्या जाळ्यात अलगद सापडले आणि त्यांच्या याच बेसावध निर्णयाचा यापुढे मोठा फायदा भाजपाला होणार आहे, मुंबईतला मराठी मोठ्या प्रमाणावर भाजपा आता आपल्याकडे नक्की आकर्षित करण्याचा प्रयत्न करणार आहे, अलीकडे त्यासाठी त्यांनी जसे नारायण राणे यांना पुढे केले आहे तसे काही शिवसेनेतले प्रभावी मराठी नेते आपल्याकडे खेचण्याचा मोठा प्रयत्न भाजपाकडून होतो आहे. संघटना शिवसेना वाढविण्यात मातब्बर उद्धवजी मुख्यमंत्री झाले खरे पण त्यातून मराठी माणसाचा फायदा नव्हे तर मोठे नुकसान झालेले आहे, जे घडले ते चुकीचे नक्की घडले आहे.,. 

तूर्त एवढेच : हेमंत जोशी 


1 comment:

 1. नमस्कार हेमंत जोशी.

  तुम्ही म्हणता तसं उद्धव मुख्यमंत्री झाल्याने मुंबईच्या मराठी माणसाचं नुकसान झालं आहे, किंवा तसं वाटतंय हे खरंय. पण हे तात्कालिक नुकसान आहे. उद्धवना हे अपेक्षित आहेच व त्यांनी त्यावर विचार केलेला असेलंच. आदित्यना मंत्री बनवण्यामागे काही निश्चित विचार असावासं दिसतंय. अन्यथा एकाच घरात दोन मंत्री कशाला पाहिजेत?

  आता असं बघा की मागील खेपेस १९९५ साली शिवसेना सत्तेत आली होती, तेव्हा एक ओरड ऐकू येत असे. ती म्हणजे प्रशासन शिवसेनेचं ऐकंत नाहीत. सेनेला सरकार चालवता येत नाही. मात्र असं असलं तरीही प्रशासनास काबूत ठेवण्याची क्षमता बाळगून असलेला एक मनुष्य शिवसेनेत होता. तो म्हणजे तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी. पण त्यांना शरद पवारांनी पैसे खायला शिकवलं आणि पंतांना पैशाची चटक लागली. त्यामुळे शिवसेनेचं जे नुकसान झालं ते कशानेही भरून आलेलं नाही. हा जबर फटका आहे ज्यावर कधीच कसलीही चर्चा झालेली नाही.

  यावर उपाय म्हणजे या प्रश्नाला उद्धव यांनी थेट भिडणे. स्वत: चिखलात उतरून काम करावं लागणार. त्याला पर्याय नाही. आज जर सरकार चालवायचं असेल तर शिवसेनेकडे शून्य अनुभव आहे. तरीही उद्धव यांनी हे ओझं उचललंच ना? त्रिशंकू परिस्थितीत कोणी तयार होता का सरकार स्थापन करायला? याउलट उद्धव पहिल्यापासून मुख्यमंत्रीपदावर दावा सांगंत राहिले, आणि त्यांनी तो खरा करून दाखवला. आज मराठी माणसाची तात्कालिक पीछेहाट होतेय, यावर उपाय म्हणून उद्या हाच मराठी माणूस शिवसेनेला प्रचंड मतांनी विजयी करू शकतो ना? जेणेकरून नबाब मालिक सारखे अस्तनीतले निखारे पोसायची वेळ मराठी माणसावर येऊ नये.

  आता असा विजय जर शिवसेनेला मिळाला, तर तो निभावण्यासाठी प्राशासनिक अनुभव हवा ना हाताशी? तो नसेल तर शिवसेनेचेच भ्रष्ट मंत्री आणि त्यांना साथ देणारे तितकेच भ्रष्ट अधिकारी हा विजय गिळून टाकतील. उद्धवांनी भविष्यावर दृष्टी ठेवून हे निर्णय घेतले असावेत असा माझा कयास आहे.

  आपला नम्र,
  -गामा पैलवान

  ReplyDelete