Saturday, 4 July 2020

लायक नालायक आणि मीडिया : पत्रकार हेमंत जोशी


लायक नालायक आणि मीडिया : पत्रकार हेमंत जोशी 
स्वतःचे ठेवावे झाकून आणि दुसऱ्याचे बघावे वाकून पद्धतीने मला वागणे आवडत नाही आपण आपल्या गुण दोषांसहित सार्वजनिक जीवनाला सामोरे जायला हवे पण असे आपल्याकडे  खचित क्वचित घडते. सध्याच्या या कोरोना महामारीत मीडिया विशेषतः वृत्तपत्रात काम करणारे फार मोठ्या संकटाला आणि समस्येला तोंड देताहेत, याआधीही मी त्यावर लिहिले आहे तोच विषय येथे कंटिन्यू करतो आहे. काही अकार्यक्षम वार्ताहरांना वाहिन्या व वृत्तपत्रात विविध पदांवर काम करणाऱ्या कामचुकार आळशी अडाणी मंडळींच्या हाती मीडिया मालकांनी नारळ दिला असता तर ते फारसे मनाला लागले नसते पण आपल्या या महाराष्ट्रात वृत्तपत्रे विविध मीडिया मध्ये काम करणाऱ्या काही हजार कर्मचाऱ्यांना तशी अजिबात त्या मालकांना आर्थिक चणचण नसतांना एकतर तडकाफडकी काढून टाकले आहे आणि उरलेल्यांचे वेतन या मालकांनी निम्म्यावर आणून ठेवले आहे त्यातून वृत्तपत्रात मीडियामध्ये काम करणाऱ्यांना फार मोठे नैराश्य आले आहे या सर्वांच्या घरात अतिशय चिंताजनक वातावरण आहे त्यांचे कुटुंब व ते प्रचंड तणावाखाली आहेत ज्यामुळे अनेकांच्या घरात काहीही वाईट घडू शकते अनेकांना नैराश्येचे झटके येताहेत त्यांना त्यातून तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा लागतो आहे विशेष म्हणजे मालकधार्जिणे सरकार या मालकांना घाबरून मीडिया क्षेत्रातून अचानक काढून टाकलेल्या किंवा ज्यांच्या वेतनात कपात केली आहे त्यांची बाजू घ्यायला बाजू समजावून घ्यायला तयार नाही थोडक्यात लोकशाहीच्या या चौथ्या स्तंभाला सरकारने आणि मालकांनी आज वाऱ्यावर सोडले आहे जे अतिशय चिंताजनक आहे... 

आता मी माझी माझ्या कुटुंबाविषयी वस्तुस्थिती सांगतो. अचानक तडकाफडकी एकदम मार्च महिन्याच्या मध्यावर कोरोनाचे संकट येथे उफाळून वर आले आणि ज्या व्यवसायावर माझे माझ्या कुटुंबाचे मोठे आर्थिक स्रोत उभे आहे त्या व्यवसायाला टाळे लावावे लागले उत्पन्न झिरो झाले मी व माझी दोन्ही कमावती मुले या उद्भवलेल्या संकटात दिग्मूढ भयभीत अस्वस्थ अशांत निराश झालो त्याचे परिणाम लगेच घरात दिसायला लागले, एकत्र कुटुंब त्यात सारे चोवीस तास एकत्र साऱ्यांची चिडचिड अस्वस्थता वाढली आणि घरात मोठे वाद निर्माण होऊन माझे हे जोपासलेले स्वप्न दुभंगते कि काय असे मला सुरुवातीचे महिनाभर झाले सुदैवाने सतत अनेक संकटांची आपत्तीची मला सवय असल्याने माझ्या डोक्यावर बर्फ असतो आणि जिभेवर साखर असते. मी, विक्रांत व विनीत दोघांनाही विश्वासात घेऊन एकच सांगितले कि मी आणि विक्रांतने आपल्या तलवार रुपी कलमा घरात काढून हे घर उध्वस्त करायचे आहे कि समाजातल्या वाईट प्रवृत्तीवर आम्ही तुटून पडायचे आहे, घराचं वाटोळे करायचे असेल तर मी एक लेख लिहून मोकळा होतो कि माझे कौटुंबिक स्वास्थ्य ठीक नसल्याने मी माझी लेखणी आजपासून खाली ठेवतो आहे, अशी आर्थिक संकटे व्यावसायिकांना येत जात राहतील अशावेळी कौटुंबिक स्वास्थ्य आणि मनस्वास्थ्य तेवढे जपणे अतिशय महत्वाचे असते आपण सारेच एकमेकांच्या हातात हात घेऊन ठाम उभे राहू सारे काही चांगले होईल त्यानंतर मात्र माझ्या उच्चशिक्षित कुटुंब सदस्यांनी विशेषतः विक्रांतने हे घर अतिशय छान सांभाळून घेतले आहे....

आमचे फार फार मोठे प्रचंड असे या कोरोना महामारीत आर्थिक व्यावसायिक नुकसान नक्की झालेले आहे.नेमके हेच मला आमच्या क्षेत्रात काम करणाऱ्या त्यातल्या काही घरी बसलेल्या काही कमी वेतन मिळणाऱ्या भावा बहिणींना सांगायचे आहे कि महासंकट आले आहे हे नक्की आहे पण हीच ती वेळ कि डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ठेवून डोके भनकू न देता तुम्हाला मार्ग काढायचे आहेत मी तुम्हाला सांगतो कि तुमच्यातले शेकडा 75% वृत्तपत्रात किंवा वाहिन्यांवर काम करणारे लिखाणात आणि बोलण्यावर प्रभुत्व राखून आहेत यापुढे नोकरीच्या भरवशावर अजिबात न राहता स्वतःचे साप्ताहिक किंवा यु ट्यूब वाहिनी सुरु करा त्यासाठी ओळखीच्या सधन मंडळींकडून आर्थिक सहकार्य घ्या आणि नोकरीत जे कमावले मिळविले नसेल त्यापेक्षा कितीतरी अधिक मिळवून मोकळे व्हा आणि या दोन्ही क्षेत्रात उतरतांना जर तुम्हाला काहीही कोणताही सल्ला लागला त्यासाठी मी चोवीस तास उपलब्ध आहे, एक दिवस तुमचेही माझ्यासारखे नरिमन पॉईंटला स्वतःच्या मालकीचे कार्यालय असायलाच हवे. इच्छा ठेवा मार्ग नक्की सापडेल. माझ्या या उभ्या अनुभवी आयुष्यात मीडिया क्षेत्रात मी कितीतरी तरुण मित्र आर्थिक व व्यावसायिक दृष्ट्या मोठे होतांना बघितले आहेत तेच आता तुम्हीही करायलाच हवे कोणत्या शेटजींची या क्षेत्रात मक्तेदारी हे चित्र आता तुम्हालाच पुसायचे आहे. मृत्यूला संकटाला अजिबात घाबरू नका बदनामीला वचकू नका हळूहळू पुढे पुढे जात राहा पण कुटुंब उध्वस्त होईल असे कृपया काहीही करू नका जेथे म्हणून शक्य आहे मी तुमच्या पाठीशी नक्की उभा आहे...
क्रमश: हेमंत जोशी No comments:

Post a comment