Thursday, 25 June 2020

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी

जिद्दी आणि हट्टी ठाकरे : पत्रकार हेमंत जोशी 
बहुसंख्य माणसे मोठी जिद्दी असतात, फायदा तोटा नफा नुकसान बरबादी आबादी इत्यादी विविध परिणाम दुष्परिणामांचा अशी माणसे विचार न करता मनाला येईल किंवा मनात आले तसे वागून मोकळे होतात. आमचा एक पत्रकार मित्र आहे त्याने अगदीच दोन आवश्यक लोकांना सोबतीला नेऊन कोर्ट मॅरेज केले पण पुढे काही महिन्यानंतर एक दिवस अचानक त्याच्या मनात आले कि लग्नाचा दणक्यात स्वागत समारंभ घडवून आणावा वास्तविक तेव्हा त्याची बायको सहा महिन्यांची गरोदर होती तरीही त्याने हेका हट्ट सोडला नाही, बायको ठेंगणी लठ्ठ त्यामुळे पॉट एकदम पुढे आलेले पण त्याने स्वागत समारंभ उरकलाच किंवा लाड आडनावाचा पूर्वी एक वादग्रस्त पत्रकार होता तो तर मुलगी वयात आल्यानंतर हनिमून साजरा करण्यासाठी मुलीसहित काश्मीर ला गेला होता. मला हे आठवले आपल्या मुख्यमंत्र्यांमुळे, तेही असेच जिद्दी आणि कमालीचे हट्टी त्यांच्या जे मनात येते ते करून मोकळे होतात अशावेळी सांगणारे त्यांच्यासमोर हात टेकतात पण उद्धव घेतलेल्या अमुक एखाद्या भूमिकेवरून निर्णयावरून मागे न फिरणारे मागे न हटणारे आहेत म्हणजे त्यांच्या मनात अमुक एक आले कि रश्मीवाहिनी पण हतबल असमर्थ ठरतात. जो विरोध प्रसंगी थेट घरातून मिलिंद नार्वेकर यांना झाला किंवा आजही होतो, काढून टाका असा अनेकांनी जनसंपर्क अधिकारी हर्षल प्रधान बाबतीत उद्धवजींकडे अनेकदा आग्रह धरला, उपयोग अशा अनेकांच्या बाबतीत शून्य टक्के झाला आणि नेमके हे असेच आता अजॉय मेहता यांच्याबाबतीत देखील घडते आहे किंवा घडले आहे... 

मुख्य सचिव म्हणून निवृत्त झाल्यानंतर मेहता यांना आता थेट सहाव्या माळ्यावर उद्धवजींनी त्यांच्या अगदी शेजारी अजॉय मेहता यांना बसवून घेतले आहे तुम्हाला काय वाटते याआधी मेहता यांचे ऐकू नये त्यांना एवढे अति महत्व देऊ नये म्हणून काय कमी दबाव किंवा लावालाव्या उद्धव यांच्याकडे थेट करण्यात आल्या नाहीत, असे अजिबात नाही याउलट मेहता विरोधातून उद्धव यांच्याकडे त्यांचे महत्व अधिकाधिक वाढत गेले आणि अनेक असंख्य विरोधक हात चोळत बसले, मेहता का त्यांना नको आहेत त्याची अनेक कारणे आहेत पण एकदा का आले उद्धवजींच्या मना तेथे थेट ब्रम्हदेवाचेही चालेना हि अशीच त्यांच्याबाबतीत वस्तुस्थिती आहे. माझे सांगणे कदाचित येथे आगाऊपणाचे ठरेल पण प्रसंगी उद्धव यांना अडचणीच्या ठरणाऱ्या नस्त्या त्यांनी त्या अगदी पवारांच्या मर्जीतल्या असल्या तरी क्लिअर करू नयेत या पद्धतीने मुख्यमंत्र्यांना सावध करणाऱ्या मेहता यांना थेट शरद पवार यांचाही या निवृत्तीनंतरच्या नेमणुकीला आणि ते मुख्य सचिव म्हणून देखील विरोध होता पण प्रसंगी उद्धव जेथे रष्मीवहिनी किंवा आदित्य यांच्या सांगण्याला धुडकावून लावतात तेथे पवार यांचे सांगणे आणि ऐकणे फार दूर राहते त्यामुळे मेहता यांच्या निवृत्त होण्याआधीच त्यांच्या निवृत्ती नंतरच्या केबिनचे सहाव्या माळ्यावर तेही अशोक चव्हाणांच्या सार्वजनिक बांधकाम खात्याने काम सुरु केले होते. फार कमी नेते असे बघायला मिळतात जे चांगल्या वाईट परिणामांची फिकर चिंता पर्वा न करता घेतलेल्या निर्णयांवर ठाम असतात त्यात उद्धव यांचा पहिला नम्बर लागतो....

www.vikrantjoshi.com

1985 नंतर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले राजकारण दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी पूर्णतः बदलवून व हादरवून सोडले म्हणजे राज्याच्या कानाकोपऱ्यात घडायचे असे कि बाप काँग्रेसमध्ये आणि नेत्यांची पुढली पिढी शिवसेनेत महत्वाचे म्हणजे या गदारोळात काँग्रेस नेते घरी  बसले आणि त्यांची मुले तेही शिवसेनेतून पुढे आले अर्थात तेव्हा पवारांचे स्वतंत्र असे अस्तित्व नव्हते त्यांची स्वतंत्र राजकीय पार्टी अस्तित्वातही आली नव्हती. 1980 नंतरची पिढी काँग्रेसपासून फार मोठ्या प्रमाणात दूर गेली त्यातले बहुसंख्य शिवसेनेत गेले पण रथयात्रा आणि भाजपाचे बदललेले धाडसी रूप त्यातून अनेक भाजपामध्ये पण काम करू लागले ज्याचा मोठा फटका राज्यात पवारांच्या नेतृत्वाला व काँग्रेसच्या राजकारणाला नेतृत्वाला देखील बसला. इतर विसरले पण शरद पवारांना हा फटका हा झटका चांगलाच झोंबला होता त्यातून तेव्हापासून त्यांनी पद्धतशीर आखणी करून ती कसर भरून काढली त्यात त्यांनी मुस्लिम मराठा इत्यादी कार्ड्स चा मोठ्या खुबीने उपयोग करून  घेतलाआणि पुन्हा एकदा अनेक वर्षांनी तरुण पिढी पवारांनी त्यांच्या राष्ट्रवादीकडे खेचून आणली आकर्षित केली ज्याचा काही प्रमाणात काही ठिकाणी फायदा काँग्रेस पण झाला ज्याकडे मला वाटते उद्धव ठाकरे यांचे निदान आजतरी अजिबात लक्ष नाही त्यांना सध्या मुख्यमंत्रीपद अधिक महत्वाचे वाटते आहे. आजची तरुण पिढी बऱ्यापैकी आपल्यापासून दूर गेली आहे हे भाजपाच्या देखील लक्षात आले आहे म्हणून त्यांनी पुन्हा एकवार रा. स्व. संघाच्या माध्यमातून दुरावलेल्या तरुण तरुणींना आपलेसे करण्याचा विशेषतः ब्राम्हणेतर तरुण पिढीत पुन्हा एकवार कुठे मुंढे खडसे दिसतात का त्यावर चाचपणी आणि प्रयत्न सुरु केलेले आहेत... 
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment