Friday, 5 June 2020

आघाडीतून बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी

आघाडीतून बिघाडी : पत्रकार हेमंत जोशी 
आमच्या ओळखीतले एक कुटुंब होते त्या कुटुंबात मोठ्या मुलाचे लग्न झाले नवी सून त्या कुटुंबात आल्या आल्या तिसरेच दिवशी सासू बाथरूममध्ये पाय घसरून पडली पुढले सहा महिने सासू अंथरुणावरून उठली नाही, दिराची नोकरी गेली, मोठी नणंद विधवा होऊन कायमची माहेरी आली  धाकट्या नंणंदेचा चौथा लागला असताना गर्भपात झाला सासर्यांना वेड लागून ते कायम गाव सोडून निघून गेले नवरा पैसे घेतांना रंगेहात पकडल्या गेला तिलाही कधी नव्हे ते फिट्स यायला लागल्या हे सहन न झाल्याने कि काय धडधाकट आजेसासू पातळ दोरीवर वाळत घालता घालता गेल्या विशेष म्हणजे त्यांच्या शेजारची नलिनी पण समोरच्या अहमद बरोबर पळून गेली वरच्या माळ्यावर राहणारे गोविंदराव पायरांवरून घसरून गडगडत खाली आल्याने वयाच्या चाळिशीतच त्यांची नसबंदी करावी लागली तर हे सहन न झाल्याने त्यांची बायको खालच्या माळ्यावर राहणाऱ्या श्यामच्या प्रेमात पडली आणि श्यामची बायको ते बघून कायमची माहेरी निघून गेली....

सध्या काही काम नाही घरातल्या खोलीत एकटाच पडून असतो आणि भिंत हीच प्रेयसी अशी मनाची समजूत घालून भिंतीशीच तासनतास प्रेमविलाप करीत बसतो. कधी रफीची रडकी गाणी ऐकतो तर कधी बाबूजींची गाणी म्हणण्याचा प्रयत्न करतो, शेजारचे मग रागाने दार बंद करून घेतात तो भाग वेगळा. आज असाच आढ्याकडे बघत आघाडी सरकार विशेषतः उद्धवजी यांच्या मुख्यमंत्री होण्याचा विचार करीत होतो आणि उद्धवजींवरून मला माझ्या त्या ओळखीच्या कुटुंबाचा किस्सा आठवला. उद्धव मुख्यमंत्री झाले आघाडी सरकार सत्तेत बसले त्याआधीपासूनच अपशकुनांची जी मालिका सुरु झाली ती संपता संपत नाही विशेष म्हणजे कोरोना महामारीने तर जगाला संकटाच्या खाईत नेऊन सोडले आहे, आघाडीचा पायगुण वर सांगितलेल्या नव्याने घरात आलेल्या सुनेसारखाच आहे. पण ज्या तरुण पिढीला किंवा या राज्यातल्या सर्वसामान्य जनतेला उद्धव यांच्याविषयी नेमके जे माहित नाही ते येथे मी तुम्हाला सांगून चकित करणार आहे, ते ऐकून तुमचे ज्ञान वाढणार आहे आणि मनोरंजन देखील होणार आहे. उद्धव किंवा ठाकरे कुटुंबीय बाहेरच्यांना फारसे माहित नाही कारण सारे ठाकरे कुटुंबाकडे यायचे ठाकरे यांना अमुक एखाद्याकडे जाण्याची कधी वेळच आलेली नव्हती आणि तोच त्यांचा मोठा प्लस पॉइण्ट होता...

एक महत्वाच्या मुद्दयांवर तुम्हाला नेमके सांगायचे झाल्यास जेव्हा जेव्हा या राज्यातील सत्तेशी शिवसेनेशी संबंधित नेत्यांनी दलालांनी अधिकाऱ्यांनी मीडियाने विशेषतः उद्धव यांना जेव्हा केव्हा अपयशी ठरविले, अंडर एस्टीमेट केले, उद्धव राजकारणात नादान आहेत कमकुवत आहेत असे हिणविलें म्हटले तेव्हा तेव्हा प्रत्येकवेळी उद्धव त्या त्या प्रसंगी मग ती निवडणूक असो किंवा त्यानंतर  राजकारणात पदार्पण असो किंवा बाळासाहेबांचे जाणे असो किंवा शिवसेनेतली फाटाफूट असो  एखाद्या महत्वाच्या निवडणुकीत त्यांचा पराभव असो, त्या त्या प्रसंगी सारेच्या सारे जेव्हा केव्हा हेच म्हणायचे कि आता उद्धव संपले आणि शिवसेना खलास झाली त्या त्या वेळी असे कधीही घडले नाही याउलट उद्धव आणि शिवसेना उफाळून व उसळून जोमाने जोरात जोशात वर आले यशस्वी ठरले नेमके नेहमीप्रमाणे यावेळी देखील मुख्यमंत्री म्हणून पुन्हा एकवार त्यांच्याबाबतीत हे असे यशाचे गणित जमून येऊ शकते, आज जे त्यांना हे जमत नाही असे अनेक म्हणताहेत ते पुन्हा एकवार  तोंडावर पडू शकतात त्यांची फजिती होऊ शकते कारण मराठी माणूस इतर साऱ्या नेत्यांना लाथाडून केव्हा उद्धव यांना आलिंगन देऊन मोकळा होईल लोकांच्या मनातले काहीच सांगता येत नाही....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment