Wednesday, 1 April 2020

विचारांचे वादळ : पत्रकार हेमंत जोशी

विचारांचे वादळ : पत्रकार हेमंत जोशी 
डोक्यात सतत नकारत्मक विचार, इतरांविषयी कायम तिरस्कार, वायफळ बडबड करणे, हमेशा इतरांचे वाईट चिंतणारे आणि घरातल्याना किंवा सभोवताली असणाऱ्यांना कायम तोडून बोलणारे मला वाटते हे एकप्रकारे सायको पेशंट असल्याचे लक्षण आहे, नेमकी अशी माणसे बहुतेक साऱ्या कुटुंबातून आढळतात, अशा मंडळींनी वास्तवीक वास्तवात एकतर योगाद्वारे नकारत्मक विचारांवर नियंत्रण आणावे किंवा मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला प्रसंगी औषधोपचार देखील करून घ्यावेत त्यात गैर काहीही नसते उलट होतो तो अख्ख्या कुटुंबाचा किंवा सभोवतालच्या मंडळींचा फायदाच. समजा अशी सायको माणसे तुमच्या सभोवताली असतील तेव्हा एकतर ती तुम्हाला घाबरून तरी असावीत किंवा असे काही सतत आरडाओरड करणारे असतील तर आपण स्वतः मौनव्रत धारण करून समोरच्या माणसाशी आणि त्यामुळे उदभवणाऱ्या परिस्थितीशी मुकाबला करावा. असे अनेक जोडपी आहेत ज्यात एकतरी  म्हणजे नवरा किंवा बायको दोघांपैकी एक हा असा निगेटिव्ह विचारांचा असला कि अशा कुटुंबाची जोडप्याच्या आयुष्याची वाट लागते. माझा एक दूरचा नातेवाईक ते दोघेही एकाचवेळी या अशा निगेटिव्ह विचारांचे त्यामुळे ते दोघेही सतत आपापल्या सवयीनुसार बिनधास्त वागत जगत आलेले सुदैवाने त्यांचे दोन्ही मुलगे समजूतदार निघाले म्हणून देव पावला अन्यथा मुले रस्त्यावर आली असती...

लॉक डाऊन च्या दिवसातही जर एखाद्या स्त्रीला तिचा नवरा घरात असणे त्रासाचे वाटत असेल तर त्या नवऱ्यासारखा दुर्दैवी दुसरा कोणीही नाही. आणि अशा कितीतरी बायका तुम्हाला बघायला मिळतात ज्यांचे यादिवसातही नवऱ्याला अतोनात छळणे सुरु आहे. एक काम तुम्हाला धड करता येत नाही, अशा प्रकारची बोलणी या दिवसात खाऊन गप्प बसणे अधिक फायद्याचे ठरावे. घरात फेरफटका मारावा तर आत्ताच केरकचरा काढला आहे असे तिखट शब्द कानावर पडतात. झोपलो तर बेडशीट आताच बदलली आहे खराब होईल आणि बायकोजवळ जावे तर त्या सटवीला घ्या कि बोलावून असे शब्द कानावर पडतात. मुलाना बोलावे तर तुम्हाला काय त्रास होतोय आणि बोललो नाही तर डोक्यावर बसवून ठेवले आहे, असे कानावर पडते. घरात बसून आहोत तरी त्रास आणि शेजारी मित्राकडे जातो, म्हटले तर खबरदार बाहेर पडलात तर. कितीही उशिराने खायला मागितले तरी आताच तर खायला दिले होते किंवा चहा जरी मागितला तरी किती चहा पिता हे खडे बोल ऐकावे लागतात. कामवाल्या बाईला साधा आवाज जरी दिला तरी संशयाने टोमणे मारणे सुरु आणि पत्नीकडे सुखाची डिमांड करावी तर चेकाळलात वाटते हे तिखट शब्द कानावर पडलेच म्हणून समजा...

घर असे असावे ज्या ठिकाणी एका खोलीतून दुसऱ्या खोलीत आवाज बाहेर न यावा. एकमेकांकडे हसतमुख चेहऱ्याने बघावे आणि मोठ्यांचा मान राखल्या जावा. आपण जे बोलतोय किंवा ज्यापद्धतीने वागतोय त्याचे अनुकरण तुमच्या नकळत तुमची मुले करीत असतात हे नेहमी ध्यानात ठेवावे. घरात जर मद्याचे पेले रिचविल्या जात असतील आणि सिगारेटचे झुरके तोंडातून बाहेर पडत असतील त्या घरातली मुले चांगली निघावीत अशी अपेक्षा करणे देखील चुकीचे असते. मुलांच्या आयुष्याची वाताहत करण्यात आई वडिलांचा सिंहाचा वाटा असतो ठरतो हे ज्यांच्या लक्षात येते ती जोडपी खऱ्या अर्थाने सुशिक्षित आहेत झालीत असे समजावे केवळ पदव्या मिळवून काहीही घडणार नाही त्याचवेळी उत्तम संस्कारांची जोड तेवढीच आवश्यक असते ठरते. मुलांना आईवडिलांच्या कष्टांची जशी जाणीव असते तसा आईवडिलांच्या वाईट कृतींचाही त्यांना तेवढाच प्रखर सखोल अभ्यास असतो म्हणून आपण कसे वागतो आणि कसे जगतो त्याकडे विशेषत्वाने ध्यान देणे गर्जेचे असते, आवश्यक  ठरते. अत्यंत महत्वाचे म्हणजे जे पुरुष घरात सतत तापट डोक्याने आरडाओरड करीत कुटुंब सदस्यांना गॅसवर ठेवतात अशा कुटुंब सद्द्स्यांना जिवंतपणी नरक यातना भोगण्याचे दुर्भाग्य वाट्याला येते आले असे समजावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी. 

No comments:

Post a comment