Thursday, 12 March 2020

मागे वळून पाहतांना : पत्रकार हेमंत जोशी


मागे वळून पाहतांना : पत्रकार हेमंत जोशी 
१० मार्च माझा वाढदिवस, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष भ्रमणध्वनीवरून सोशल मीडियावर विविध माध्यमातून अनेकांनी आप्तांनी मित्रांनी मैत्रिणींनी नातेवाईकांनी कित्येकांनी अनेकांनी हजारोंनी मला शुभेच्छा दिल्या त्या साऱ्यांचे आभार मानायला माझ्याकडे शब्द नाहीत, एवढेच सांगतो, मन भरून आले. गदगदून आले. ज्या पद्धतीने ज्या शब्दात ज्या उत्साहाने ज्या कित्येकांनी मला शुभेच्छा दिल्या, त्यांच्या बोलण्यातून लेखांतून लिखाणातून हेच जाणवले कि जणू काही त्यांच्याच एखाद्या कुटुंब सदस्याला ते अगदी मनापासून शुभेच्छा देताहेत. गत आयुष्याचा मी अनेकदा विचार करतो त्यामुळे माझे पाय कायम जमिनीवर असतात कारण वयाच्या विसाव्या वर्षापर्यंत तर मला दोन वेळेच्या जेवणाची भ्रांत असायची आणि आश्चर्य म्हणजे वयाच्या २१ व्या वर्षी माझ्याकडे स्वतःची पहिली कार होती आणि अशा काळी जेव्हा कि ब्राम्हणांच्या मुलांकडे त्याकाळी स्वतःच्या हिमतीवर सायकल विकत घेण्याची देखील कुवत ताकद  नसायची. माझ्या बाबतीती सांगायचे झाल्यास हा सारा ईश्वरी चमत्कार आणि अगदीच लहानपणी देवाघरी गेलेल्या आईचे स्वर्गातून पाठबळ आणि आशीर्वाद...

आपण कायम चिरतरुण असावे दिसावे असे जर तुम्हालाही वाटत असेल तर जे मी केले तेच तुम्ही केले तर चिरतरुण राहणे दिसणे असणे सहज शक्य आहे असते. माणसाने घेतलेल्या निर्णयावर कायम ठाम असावे डोक्यात सतत इतरांच्या बाबतीत सकारात्मक पॉझेटिव्ह विचार ठेवून आपण वागावे जगावे. डावपेच खेळत, डोक्यात इतरांच्या बाबतीत ईर्ष्या जेलसी राग द्वेष बदला ठेवून जर तुम्ही जगात असाल तर इतरांचे प्रसंगी वाटोळे होईल पण सर्वाधिक आपले स्वतःचेच अधिक नुकसान त्यातून होते. कोणत्याही व्यक्तीच्या किंवा व्यक्तींच्या बाबतीत समोर एक आणि मागे एक अशा वेगवेगळ्या भूमिका घेऊन कधीही जगू नये. काही माणसे माझ्या तोंडावर माझ्याविषयी अतिशय छान बोलतात पण तीच माणसे माझ्याविषयीच पाठीमागे मात्र अतिशय वाईट बोलतात, अशी दुटप्पी भूमिका घेणाऱ्यांचे आयुष्य कधीही सुखाने जात नाही. एकदा मी एका मोठ्या व्यक्ती कडे त्याला भेटायला गेलो, त्याने माझ्या बायकोकडल्या एका नातेवाईकाचा उल्लेख केल्यावर मी त्या नातेवाईकाविषयी खूप भरभरून बोललो त्यावर तो मित्र म्हणाला,  तू ज्याच्या विषयी मला कौतुकाने सांगतो आहेस तोच तुझा नातेवाईक अगदी अलीकडे तुझ्याविषयी मात्र अतिशय वाईट बोलत होता, त्यावर मी एवढेच म्हणालो, अरे मी वाईट माणूस आहे म्हणून त्याची तसे वाईट सांगण्याची बोलण्याची इच्छा झाली असावी...

व्यसनांपासून कोसो दूर, रात्रीचे जागरण, डोक्यात इतरांविषयी असूया राग आणि नकारात्मक विचार न ठेवणे, शक्यतो मांसाहार न करणे, नियमित व्यायाम, सतत हसत राहणे इतरांना हसविणे आणि डावपेच खेळून इतरांना संपविण्याची वृत्ती अंगी न ठेवणे, मला वाटते आयुष्यात जे मिळाले आहे ते जसेच्या तसे स्वीकारले आणि सतत स्वतःला कामात जुंपून घेतले कि वृद्धत्व आपोआप दूर पळते. आपले अमुक एखाद्याने वाईट केले आहे किंवा वाईट चिंतिले आहे त्यावर विचार करीत बसू नका उलट आपल्याला कसे आणखी आणखी पुढे जाता येईल, स्पर्धेत टिकून राहणे कसे शक्य होईल, त्यावर कायम सकारात्मक भूमिका घेऊन जगावे, आयुष्य चांगले जाते. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या दारूच्या पार्ट्या, सिगारेट्स आणि जागरणे त्यातून तुमच्या शरीरात नको ते रोग अगदी लवकर शिरकाव करणार आहेत हे नक्की लक्षात ठेवावे. मी पत्रकार असूनही रात्रीचे नको ते
आयुष्य कधीही जगत नाही, त्यातून जगण्याची मजा येते. पर्यटन मात्र मला खूप आवडते. पुन्हा एकवार तुमचे आभार मला दिलेल्या शुभेच्छांबद्दल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.


No comments:

Post a comment