Friday, 27 March 2020

ईश्य ! काय करावे कसे करावे केव्हा करावे : पत्रकार हेमंत जोशी

ईश्य ! काय करावे कसे करावे केव्हा करावे : पत्रकार हेमंत जोशी 
पत्नी अकाली गेल्यानंतर व.पु. काळे अनेकदा साहित्य सहवास मध्ये त्यांचा घरी एकटेच असायचे. मुलीचे आणि मुलाचे लग्न झालेले, घर तसे लहान त्यामुळे व.पु एकटे असायचे. एकदा ते मला म्हणाले, कधी कधी एकटेपण खायला उठते त्यामुळे मीच मला माझ्याच हातांनी थोपटवून घेतो. मला देखील आयुष्यात विविध कारणांनी अनेकदा जेव्हा केव्हा एकटे राहण्याचा प्रसंग आला मीच माझे अश्रू पुसले किंवा स्वतःशी बोलत बसे त्यामुळे मन आपोआप मोकळे व्हायचे, हलके व्हायचे. कदाचित सध्या हा प्रसंग तुमच्यापैकी अनेकांवर येऊन ठेपलेला असेल. कधी सखा म्हणून तर कधी वडीलधारे म्हणून कधी जिवलगा म्हणून तर कधी कुटुंबातला एक सदस्य म्हणून केव्हाही मला फोन करा, छान छान गप्पा मारूया पण आपण एकटे आहोत किंवा वयस्क असतांना दोघेच घरी आहोत, असे कोणतेही निराशेचे विचार मनात आणू नका, झटकून टाका...

आपल्याकडे नेमके घडते असे कि एखादी स्त्री पुरुषाकडे मन मोकळे करायला गेली कि ती प्रेमात पडली आहे असा अर्थ आपण काढून मोकळे होतो. कृपया निदान या दिवसाततरी असले विकृत कामांध विचार सोडून द्या. आपण सारे साक्षात मृत्यूच्या दारात उभे आहोत त्यातून अनेकांना नैराश्येने ग्रासले जाऊ शकते. आता माझे माझ्या कुटुंबाचे माझ्या व्यवसायाचे पैशांचे मालमत्तेचे काय होईल कसे होईल हे जे अनेकांना वाटते आहे तसे वाटून घेणे त्यातून नैराश्याला जवळ करणे अजिबात आवश्यक नाही. तुम्हाला म्हणून सांगतो, साधारणतः १०-१२ वर्षांपूर्वी मला प्रकृती अस्वास्थ्यामुळे ४-५ महिने घरी बसावे लागले होते त्यादरम्यान एखादा प्रचंड निराश झाला असता, स्वतःची आणखी तब्बेत त्याने बिघडवून घेतली असती. मी मात्र स्वतःच्या मनाची स्वतःच समजूत काढत होतो आणि जेव्हा काही महिन्यांनी पुन्हा कामाला सुरुवात केली, पुढल्या केवळ एक दोन वर्षात, आयुष्यभराची कमाई करून मोकळा झालो. थोडक्यात, घरी बसलो म्हणून सारे संपले, असे समजायचे नसते...

आजच्या अडचणीत आजच्या संकटात उद्याचा उष:काल आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. अनेकांची पहाडासारखी पोटाची मुले अचानक देवाघरी जातात. माझ्या मोठ्या बहिणीला वयाच्या केवळ ३० व्या वर्षी वैधव्य आले होते ज्यावेळी तिला शाळेतही न जाणारा मुलगा व मुलगी होते. समोर प्रचंड अडचणींचा डोंगर पण तरीही ती खचली घाबरली मागे हटली नाही. त्वेषाने जिद्दीने तडफेने तिने सरकारी नोकरी केली, मुलांना उत्तम संस्कार दिले त्यांना घडविले वाढविले मोठे केले. निराशेवर मात करावीच लागते जेव्हा केव्हा आपण एकटे एकाकी आहोत किंवा सारे संपले आहे असे वाटते. अर्थात दुसऱ्यांना ज्ञान पाजणे सोपे असते, स्वतःवर आलेले प्रसंग निभावणे मात्र अत्यंत कठीण असे काम असते. हेही दिवस नक्की निघून जातील. पुढले काही दिवस निराशेचे आहेत पण त्यानंतर दुपट्टीने कामाला लागून आधीची सारी कसर भरून काढता येईल आणि पुन्हा एकवार पूर्वीचे सुगीचे दिवस येतील. आज मात्र हातपाय गाळून बसणे म्हणजे कुटुंबाला उध्वस्त करण्यासारखे ते ठरावे. पत्रकार अभय देशपांडे, पत्रकार अभिजित मुळ्ये, पत्रकार भाऊ तोरसेकर पत्रकार कैलास म्हापदी किंवा संपदा केजकर यांच्यासारख्या माझ्या काही मित्र मैत्रिणींशी बोलून त्यांच्याशी तुम्हाला सुसंवाद साधता येईल का, त्यावर मी विचार करतो आहे. लवकरच त्यांचे भ्रमणध्वनी तुम्हाला शेअर करता येतील...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

1 comment:

  1. सर कृपया आपला नंबर शेअर करा...

    ReplyDelete