Thursday, 9 January 2020

मंत्रिमंडळ खातेवाटप २ : पत्रकार हेमंत जोशी


मंत्रिमंडळ खातेवाटप २ : पत्रकार हेमंत जोशी 
पैसे न खाणारे राज्याचे भले करणारे मंत्री हे वाक्य म्हणजे एक अफवा आहे आणि अफवेवर विश्वास ठेवायचा नसतो. रस्त्यात एखादी समाजसेवा सामाजिक सेवा आडवी आली तरच करायची अन्यथा ऐय्याशी आणि पैसे  मिळविणे एवढेच काय प्रत्येक मंत्र्याच्या ध्यानात असते. एखादा मंत्री मुख्यमंत्री कदाचित ऐय्याशी नसू शकतो पण पैसे न ओरबाडणारे मंत्री औषधालाही सापडणे कठीण झाले आहे. आधी समाजाचे भले मग स्वतःचे म्हणणारे मंत्री जन्माला येणे कठीण, आधी करू आमचे भले जमले तर समाजाचे हे एवढेच सत्तेशी संबंधित साऱ्यांनी ठरविलेले असते आणि या देशद्रोह्यांना  मीडियाची मनापासून मनातून उत्तम साथ संगत सतत मिळत असते. मंत्री मुख्यमंत्री शासकीय प्रशासकीय अधिकारी  मग तो कोणत्याही विचारांचा जातीचा धर्माचा पक्षाचा असो, उद्देश साऱ्यांचे सारखेच असतात ते म्हणजे विविध योजना आखायच्या आणायच्या, फंडस् मिळवायचे आणि मिळालेले फंडस् कामावर योजनेवर नव्हे तर स्वतःसाठी खर्च करायचे.  नाव खराब होणार नाही असे अलीकडे शरद पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना जरी निक्षून ठासून चिडून सांगितलेले असले तरी मला खात्री आहे पैसे ओरबाडण्याची सुरुवात शंभर टक्के राष्ट्रवादीच्या मंत्र्यापासून झालेली आहे आणि इतरही तेच करणार आहेत कारण ज्यांचा इतिहास राज्याला लुटणारे मंत्री असा आहे तेच बहुतांश मंत्री झाले आहेत त्यामुळे ज्यांना चांगली प्रतिमाच नाही अशा आमदारांना आधी नामदार करायचे तदनंतर त्यांनाच प्रतिमा जपा पवारांनी सांगायचे हे म्हणजे असे झाले कि दरोडे टाकणाऱ्या चंबळ खोरातल्या डाकूंना आधी देशाचे अर्थमंत्री करायचे आन प्रामाणिक वागायला सांगायचे....

अलीकडे मंत्र्यांना दस्तुरखुद्द शरद पवारांनी दिलेली तंबी जर परिणामकारक ठरली तर पुन्हा एकवार पवारांच्या पक्षाची आणि मंत्र्यांची लोकप्रियता झपाट्याने वाढू शकते पण ज्या पद्धतीने पवारांच्या आणि एकूणच मंत्र्यांचे या दिवसात त्यांच्या खात्याशी संबंधित दलाल मंडळींशी बोलणे भेटणे बैठका घेणे सुरु आहे, पवारांच्या तंबी देण्याचा काही परिणाम होईल निदान या घटकेला तरी तसे वाटत नाही. विविध सततच्या आरोपांमुळे, नेत्यांच्या पोलीस चौकशांमुळे राष्ट्रवादीची प्रतिमा मालिन झाली त्यातून त्यांना पाच वर्षे सत्तेपासून दूर व्हावे लागले होते, जनतेच्या मनातून उतरलेले हे आघाडीचे मंत्री केवळ शरद पवार यांच्या चाणक्य नितीमुळे कसेबसे सत्तेत आले जणू त्यांना सत्तेची लॉटरी लागली या पार्श्वभूमीवर बदल्या बढत्या ठेकेदारी यांचे आरोप न होता तुम्ही तुमची प्रतिमा जपायला हवी अलीकडे पवारांनी दिलेली तंबी जनतेला काहीसा दिलासा देणारी आहे. खाणार्यांनाच नेमके त्यांच्या आवडीचे खाते वाटप झाल्याने म्हणजे सुभाष देसाई यांनाच पुन्हा ज्या खात्यात त्यांनी याआधी गोंधळ घातला आहे अशा पद्धतीचे आवडीचे खाते वाटप झालेले असल्याने महाआघाडीच्या मंत्र्यांनी नेहमीप्रमाणे काय करायचे ठरविलेले आहे हे लक्षात येते पण पवारांच्या उद्धवजींच्या तंबीला त्यांना घाबरावेच लागेल मात्र त्यासाठी स्वतः उद्धव ठाकरे यांना देखील सभोवताली गडबड होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे अन्यथा तुम्ही खायचे आणि आम्ही काय भजन करायचे, मंत्री जाब विचारतील....

राष्ट्रवादीचे मंत्री आणि काही ज्येष्ठ नेत्यांची बैठक अलीकडे पवारांनी घेतली. पवारांनी या बैठकीत साऱ्या मंत्र्यांना नेत्यांना सावध केले, तुम्ही केलेल्या भ्रष्टाचारामुळे सतत मागचे पाच वर्षे भाजपाने तुम्हाला कसे धारेवर धरले, घाबरवून सोडले, त्याचीही जाणीव त्यांनी करून दिली. एक चांगली सुरुवात शरद पवार यांनी जशी केली आहे ती तशी सुरुवात जर काँग्रेसच्या नेत्यांनी आणि उद्धव ठाकरे यांनी केली तर कायम डाकू ठरलेले काही मंत्री निदान कमी डाके घालतील अशी माफक अपेक्षा या सरकारकडून ठेवता येईल. कारभार चोख स्वच्छ पारदर्शी करा असे अगदी मनापासून पवारांनी त्यांच्या मंत्र्यांना बजावले तर आहे पण काळ ठरवेल मंत्र्यांनी पवारांचे सांगणे मनावर घेतलेले आहे का, प्रसंगी मी स्वतः उठसुठ खादाड मंत्र्यांची प्रकरणे न छापता आधी ती पवारांना पुराव्यांसहित लेखी कळवण्याची, मनाशी ठरविलेले आहे, बघूया कितपत यश मिळते ते कारण मंत्र्यांनी पैसे कसे खायचे हे शिकविणारेच प्रत्येक मंत्र्यांकडे ते नेहमीचे दलाल आणि कार्यालयीन कर्मचारी अधिकारी रुजू झाल्याचे दिसू लागलेले आहेत त्यामुळे चांगल्या परिणामांची शक्यता तशी कमी आहे...
क्रमश: हेमंत जोशी .

No comments:

Post a comment