Thursday, 23 January 2020

सामंत उद्धवजींचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी


सामंत उद्धवजींचा हनुमंत : पत्रकार हेमंत जोशी 
उद्धवजींनी भांगडा करून दाखवा, सांगायचा अवकाश हे आधी भांगडा तर करून दाखवतीलच पण लावणी, कथ्थक, कॅब्रे, कोळी नृत्य इत्यादी अनेक प्रकार करून मोकळे होतील. समजा उद्धवजी यांना म्हणाले, जा आत्ताच्या आता आणि त्या चार शत्रूंना तलवारीने कापून टाका, हे परिणामांची चिंता न करता लगेच जातील आधी ती चार मुंडकी तर उडवतीलच पण नंतरही उद्धवजी येऊन बघेपर्यंत हवेत तलवार फिरवत नाचवत राहतील. एखादी कविता आज म्हणून दाखवा, उद्धवजींनी त्यांना आदेश देण्याचा अवकाश हे आधी एखाद्या रोमँटिक कवितेने सुरुवात करतील नंतर न थांबता पोवाडा, भक्तीगीत, विरहगीत, प्रेमगीत, भावगीत, कोंकणी गीत, गझल सारेकाही एकापाठोपाठ त्यांना म्हणून दाखवतील. उद्धवजींचे या राज्यात प्रत्येक प्रांतात प्रत्येक जिल्ह्यात काही हनुमान आहेत, या अशा हनुमंतांना एकदा का उद्धवजींनी आदेश दिले रे दिले कि या अशा मानलेल्या आणि नेमलेल्या हनुमंतांचा उत्साह भलेही ते पन्नाशीकडे झुकलेले असतील पण अशावेळी थेट सोळावे लागलेल्या तरुणासारखा असतो, त्यातलेच एक प्रमुख हनुमंत म्हणाल तर उद्धवजींचे विश्वासू त्यांचे विश्व्स्त आहेत या राज्याचे नवनिर्वाचित मंत्री श्रीमान उदय सामंत...

काही मंडळींना आपण तरुण असावे तरुण दिसावे छान छान बोलावे मस्त मस्त हसून जगावे सतत उत्साह व उत्सवमूर्ती म्हणून मतदारांसमोर लोकांसमोर पेश व्हावे, सदैव हसतमुख राहावे, प्रत्येकाच्या उपयोगी पडावे, काहीतरी सतत वेगळे करून दाखवावे, कायम लोकांमध्ये आपली उठबैस असावी, ज्याने त्याने आपले कायम कौतुक करावे, जेवढे शक्य असेल अगदी मनापासून इतरांना सहकार्य करावे, नवनवीन आव्हाने स्वीकारावित, चार लोकांना आग्रहाने बसवून जेऊ घालावे, तरुणांमध्ये दहा वर्षांनी लहान आहोत असे भासवून धम्माल गप्पा माराव्यात, बुजुर्ग मंडळींना आदराने संबोधावे थोडक्यात एखाद्या हिरोसारखे असावे जगावे वागावे असे सतत वाटत राहते त्यामुळे असे नेते असे लोकप्रतिनिधी जरी उद्या पन्नाशीचे झाले तरी त्यांच्याकडे तरुण मुली देखील एखादा हिरो आल्यासारखे बघतात लाजतात आणि असे नेते ज्याला त्याला आपल्या वयाचे वाटतात त्यातून अशांची  लोकप्रियता कायम वाढते आणि टिकते. हे वर्णन अगदी शंभर टक्के तंतोतंत मंत्रीमहोदय उदय सामंत यांना लागू पडते. यातले एक जरी वाक्य त्यांच्याबाबतीत चुकीचे निघाले, अवास्तव वाटले तर मला थेट फासावर चढवा किंवा अगदी जाहीर माझ्याकडून पोवाडा म्हणून घ्या किंवा मला भांगडा करायला सांगा...

रत्नागिरीतले आधीचे सारे अनेक रेकॉर्ड मोडत सामंत महाशय तीन तीन वेळा आमदारकीला निवडून आले. निवडणुका मग त्या किणत्याही असोत म्हणजे ग्रामपंच्यातीपासून तर खासदारकीपर्यंत, उदय सामंत यांनी त्यांच्या विधानसभा मतदारसंघात यश प्राप्त केले नाही असे कधी झाल्याचे निदान मला तरी आठवत नाही. उदय सामंत हे असे अजब रसायन आहे कि त्यांना सतत असे वाटत राहते कि माझ्या मतदार संघात सतत अमुक एखादी तरी निवडणूक असावी आणि साहेब, आपण ती निवडणूक जिंकलो बरे का, असे अगदी सकाळी सकाळी उद्धवजींना फोन करून सांगावे. त्यातूनच हे घडले म्हणजे दीपक केसरकर रामदास कदम भास्कर जाधव अशा अनेक दिग्ग्जना बाजूला सारत त्यांचा रोष राग पत्करत उद्धव यांनी उदय सामंत यांना राज्यमंत्री नव्हे तर थेट मंत्री केले आणि सांगून टाकले जो माणूस कष्टाळू असतो स्वतःच्या कुटुंबासाठी कमी मतदारांसाठी शिवसैनिकांसाठी अधिक जगतो तो माझा लाडका असतो, ठरतो. उदय हे पिढीजात उत्तम व्यावसायिक आहेत, व्यवसाय आजही त्यांचे वडील आणि मोठा भाऊ किरण हे दोघे सांभाळतात आणि या नेत्याला त्यांनी केव्हाच कायम मोकाट सोडलंय लोकांसाठी, लोकांचे भले करण्यासाठी. स्टायलिश उदय आपल्या स्वतःच्या चॉपर मधून रत्नागिरीत उतरतात आणि वेळ तशी आलिच तर एखाद्या कार्यकर्त्याच्या बाईक वर बसून मतदारसंघात फेरफटका मारून केव्हातरी रात्री उशिरा घरी येतात. उदय सामंत यांच्या आयुष्याचे अनेक विविध कंगोरे आहेत, त्यावर येथे केवळ काही वाक्यात सामंत हा विषय संपविणे निदान मला तरी शक्य नाही, त्यांच्यावर यापुढे सतत लिहीत राहीन कधी चांगले तर कधी...
तूर्त एवढेच: हेमंत जोशी.

No comments:

Post a comment