Tuesday, 26 November 2019

गुड बाय मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी

गुड बाय मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी 
अलिकडल्या महिन्याभरात म्हणजे विधान सभा निवडणुकांचे निकाल हाती आल्यानंतर जे काय घडले ते महाभयंकर होते, विविध चर्चा आणि अफवांना एवढे उधाण आले होते कि वाटायचे कदाचित हेही कानावर येईल उदय तानपाठक यांना हेमंत जोशी यांच्यापासून दिवस गेले आहेत, पत्रकार अभय देशपांडे बाळंतपणासाठी रजेवर गेले आहेत, निखिल वागळे यांचेदिवस भरत आल्याने त्यांना घाटीच्या महिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, असे काहीही कानावर पडण्याची येण्याची दाट शक्यता होती कारण जो तो स्वतःला राजकारणातला तद्न्य समजायला लागला होता. त्या संजय राऊत यांच्याविषयी तर नको नको ते बोलले जात होते, त्यांनीच शिवसेना भाजपा युतीचे शरद पवार यांच्या सांगण्यावरून वाटोळे केले हे तर मला वाटते जो तो ज्याला त्याला सांगत होता याचे कारण एकच कि मुख्यमंत्री होऊ घातलेले उद्धव ठाकरे नेमके कसे हे आजपर्यंत कोणाला फारसे कळलेच नाही याचे कारण म्हणजे उद्धव यांचा पेहराव आणि त्यांचे वागणे बोलणे ज्या पद्धतीचे आहे त्यावरून उगाचच बहुतेकांना वाटते कि त्यांना राजकारणातले फारसे कळत नाही, ते सल्लागारांच्या सांगण्यावरून आपले निर्णय घेत असतात आणि येथेच लोकांची फसगत होते...

जसजसे दिवस पुढे जातील तेव्हा लोकांना आता नेमके कळेल कि उद्धव ठाकरे कसे आहेत कारण पहिल्यांदा ते मातोश्री च्या बाहेर खऱ्या अर्थाने पडून जेथे कॉमन माणसाचा सतत संबंध येणार आहे, अधिकाऱ्यांशी सतत संबंध येणार आहे तेथे त्यांना आता यापुढे बसावे लागणार आहे त्यानंतर मित्रहो, तुम्हाला उद्धव नेमके कसे राजकारणी कळणार आहे, तो दिवस आता फार दूर नाही. मी मात्र त्यांचा जो अतिशय बारकाईने अभ्यास आजतागायत करीत आलो आहे, एवढे खात्रीने सांगतो त्यांच्यासमोर प्रसंगी शरद पवार देखील टरकून दबकून घाबरून वचकून असतील. आणि केलेल्या अभ्यासाच्या आधारे आणि घेतलेल्या नेमक्या माहितीच्या आधारे, विधान सभा निवडणुकीच्या निकालानंतर खासदार पत्रकार संजय राऊत जे सतत बोलत सुटले होते ते तसे बोलण्यासाठी ना त्यांनी आपली स्वतःची अक्कल वापरली ना त्यांनी मित्र शरद पवार यांचा आधार घेतला. या कालावधीत संजय राऊत जे जे बोलले ते ते सारे प्लॅनिंग आणि फिडींग फक्त आणि फक्त उद्धव ठाकरे यांचे होते. फक्त मधल्या काळात केव्हातरी एक दिवस राऊत काहीबाही मनाचे सांगून जेव्हा मोकळे झाले त्यानंतर उद्धव यांनी त्यांचे दोन दिवस फोन घेतले नाही त्यानंतर झालेली चूक राऊत यांनी मान्य केली नंतर सारे सुरळीत झाले, पार पडले...

www.vikrantjoshi.com

वास्तविक मी पत्रकारितेच्या प्रदीर्घ वाटचालीत कधीही अमुक एखाद्या सत्ताधाऱ्यांच्या मोहपाशात अडकलो असे कधीही झाले नाही. प्रत्येकाच्या बाबतीत जो चुकला मग तो कोणीही असो त्याला शब्दांतून धो धो धुतला आणि चांगल्या कामात एखाद्याचे कौतुक करतांना त्यात आपला फायदा काय व किती कधीही बघितले नाही. पण देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत ज्यांना मी गमतीने सेवेंद्र म्हणतो माझे त्यांच्यावर प्रेम यासाठी उफाळून वर आले कि पहिल्यांदा असे घडत होते कि कोणीतरी विदर्भाच्या भल्यासाठी विशेषतः तेथील मजबूर शेतकऱ्यांसाठी झटत होते अर्थात ते देवेंद्र होते. तुम्हाला हे माहित नाही कि मी स्वतः शेतकरी आहे माझ्याकडे २३-२५ एकर ओलिताची शेती असूनही गेले दहा वर्षे सतत मला त्यातून कवडीची उत्पन्न नाही एवढे भीषण वास्तव विदर्भातील साऱ्याच शेतकऱ्यांचे आहे, आम्हा शेतकऱ्यांचे भले करणारा पहिला खरा मसीहा म्हणून या देवेंद्र वर मनापासून एक नेता म्हणून प्रीत जडली, आता ते सत्तेत नसतील तरीही त्यांच्यावर प्रेम तसूभर देखील कमी होणार नाही,  काही मिळण्याचे बंद झाले कि दूर व्हायचे अशी इतर अनेकांसारखी माझी पत्रकारिता नाही म्हणून जेव्हा फडणवीसांचा वर्षा बंगल्यावर शेवटचा दिवस मुक्कामी होता, मी आणि विक्रांत आवर्जून त्यांना भेटायला गेलो, छान गप्पा मारून परतलो, येतांना कारमध्ये डोळ्यात नक्की अश्रू होते, चालायचेच राजकारणात वर खाली होतच असते....
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment