Monday, 18 November 2019

पवारांचे घराणे : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे घराणे : पत्रकार हेमंत जोशी 
कुठल्याशा वाहिनीवर रोहित पवारांची मुलाखत बघितली आणि तेव्हाच सांगितले कि हे पोरगं राजकारणात नक्की पुढे जाणारं आहे नंतर तेच घडले थेट राम शिंदे यांच्या मतदार संघात घुसून रोहित यांनी त्यांना पराभूत केले. माझे भाकीत खरे ठरले. पवारांच्या घरात अजितदादा यांच्या बाजूने ऑफ कोर्स पार्थ पवार आहेत आणि आज तरी सुप्रिया सुळे व रोहित यांच्यात एकी आहे, अजित दादा यांच्यापेक्षा सुप्रिया व शरद पवार यांचे रोहित यांच्याशी विशेष अधिक सख्य आहे. पण शरद पवारांना हेही पक्के माहित आहे कि जर रोहित यांना अधिक प्राधान्य दिले मुभा दिली स्वातंत्र्य दिले मोकळीक दिली तर ते प्रसंगी भविष्यात म्हणजे शरदरावांच्या राजकीय निवृत्तीनंतर सुप्रिया यांना बाजूला सारून सिंहासन बळकावतील पण तो स्वभाव अजितदादांचा नसल्याने जरी शरदराव आणि अजितदादा या दोघात काही मतभेद मनभेद असलेत तरी दादांचा नेमका दिलदार स्वभाव आणि सुप्रिया यांच्यावर असलेले प्रेम सत्तेच्या सिंहासनावर बसविताना शरदराव कायम अजितदादा यांनाच प्राधान्य देतील...

www.vikrantjoshi.com

विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आणि त्यानंतरही रोहित पवार यांची शरद पवार यांच्या सभोवतालची लुडबुड वाढलेली जेव्हा पवारांच्या हे लक्षात आले त्यांनी म्हणे अलीकडे रोहित यांच्या लुडबुडीवर काहीसे निर्बंध घातल्याचे माझी पक्की माहिती आहे. त्यांनी तसे खडे बोल रोहित पवारांना सुनावल्याचेही कानावर आले आहे. रोहित यांचे आजोबा म्हणजे शरद पवार यांचे सख्खे मोठे भाऊ दिवंगत आप्पासाहेब हे देखील तसे रोहित पद्धतीने राजकीय महत्वाकांक्षा राखून होते पण त्यांनाही शरद पवारांनी त्यापासून रोखले आणि बारामतीच्या समाजकार्यात तेवढे मर्यादित ठेवल्याचे मला पक्के आठवते. रोहित यांच्या स्पर्धेत राजकारणात उतरलेला पार्थ अजित पवार तसा म्हणाल तर काहीसा कच्चा लिंबू इनोसंट प्रेमळ आणि मनाने बापासारखा व शरद पवारांसारखा एकदम दिलदार, तो उदार भोळाभाबडा, तारुण्याचा मनमुराद आनंद घेणारा धमाल माणूस. बापावर नितांत प्रेम आणि बापाला घाबरणाराही म्हणजे अजितदादांचा आदर  ठेवणारा. विशेष म्हणजे पार्थ यास आपल्या राजकीय मर्यादा नेमक्या माहित असल्याने तो सतत दादांच्या मागे मागे सावलीसारखा राहून नेमके राजकारण समजावून घेतोय...

पार्थ पवार राजकारणात कदाचित रोहित यांच्या तुलनेत काहीसे हळूहळू आपले पाय रोवतील पण रोवलेले पाय घट्ट असतील आणि अजितदादा त्यांच्याकडून राजकारणातली नेमकी तालीम करवून घेतील हेही नक्की आहे. रोहित यांची आणखी जमेची बाजू म्हणजे त्यांच्या पाठीशी उभे असलेले त्यांचे सासरे म्हणजे पुणे जिल्ह्यातील मोठे बांधकाम व्यावसायिक मगर कुटुंबीय, जसे विश्व्जीत पतंगराव कदम हे स्वतः मोठे आहेतच पण दुधात साखर म्हणजे जगश्रीमंत अविनाश भोसले यांची कन्या त्याची पत्नी असल्याने त्याला दुधात साखर जसे म्हटले तर वावगे ठरणार नाही तेच रोहित पवार यांच्याही बाबतीत म्हटल्यास योग्य ठरावे. एक मात्र नक्की शरद पवार यांच्या राजकीय निवृत्तीनंतर जर सुप्रिया यांनी रोहित यांच्याऐवजी अजितदादा यांचा मोठा भाऊ या नात्याने घट्ट हात हातात धरला तर ते त्यांच्या दृष्टीने नक्की फायद्याचे ठरणारे असेल अर्थात आज तरी सुप्रिया यांचा अधिक ओढा रोहित यांच्याकडे असल्याने आणि ते लक्षात आल्याने मध्यंतरी अजितदादा अज्ञातवासात निघून गेले होते, तसे पुन्हा घडू नये अन्यथा पवारांच्या घरी राजकीय फूट शरदरावांच्या राजकीय निवृत्तीनंतर पवार घराण्याचे मोठे नुकसान करणारी ठरेल,असे घडता कामा नये, रोहित पवार यांनी सत्तेची फार घाई करू नये...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी 

No comments:

Post a comment