Monday, 14 October 2019

कच्चे लिंबू उमेदवार : पत्रकार हेमंत जोशी

कच्चे लिंबू उमेदवार : पत्रकार हेमंत जोशी 
जसे शेख जितू शेख आव्हाड यांच्या मुंब्र्यात त्यांना जणू विचारून शिवसेनेने मुद्दाम कच्चे लिंबूदीपाली सय्यद यांना बळीचा बकरा केले तेच मुंबईत विशेषतः भाजपा उमेदवारांच्या विरोधी उमेदवारांबाबत चित्र दिसते आहे. बहुतेक लढती अशा कि भाजपा उमेदवार विरोधात काँग्रेस किंवा राष्ट्रवादीला उमेदवार सापडले नाहीत कि त्यांनी जाणूनबजून कच्चे लिंबू उभे केले नेमके कळत नाही. हि चूक करण्याची ती वेळ नाही कि पूर्वी दगड जरी उभे केले तरी ते इंदिरा गांधी नावाच्या करिष्म्यामुळे सहज निवडून यायचे जे अलीकडे नरेंद्र मोदी यांच्या नावाने घडू शकते. सुदैवाने भाजपा कडे उत्तम उमेदवारांची मोठी रेलचेल आहे पण समजा चांगल्या उमेदवारांची यावेळी भाजपाकडे वानवा असती तर मोदी यांच्या नावाने दगड जरी उभे केले असते तरी तेनक्की निवडून आले असते...

मागाठाणे विधानसभा मतदार संघात बलाढ्य प्रकाश सुर्वे यांच्यासमोर नवख्या बाहेरच्या मणिशंकर चौहान यांना राष्ट्रवादीने उमेदवारी देणे म्हणजे एखाद्या हाडकुळ्या माणसाने खली यास कडेवर उचलून घेण्याची भाषा करण्यासारखे किंवा कांदिवलीच्या लोकमान्य योगेश सागर यांच्यासमोर कालू बुधेलीया यासी काँग्रेसने उमेदवारी देणे म्हणजे बुधेलीया यांच्या कुटुंब सदस्यांनी देखील सागर यांनाच मतदान करून येण्यासारखे. माजी राज्यमंत्री विद्या ठाकूर यांच्या समोर ज्यांचा आजपर्यंत काँग्रेसशी दूर दूर पर्यंत कधी संबंध नव्हता त्या कट्टर समाजवादी आणि निखिल वागळे यांच्या शिष्याला आमचे पत्रकार मित्र युवराज मोहिते यांना थेट उमेदवारी देणे म्हणजे आजच विद्याताई यांनी सुटकेचा श्वास सोडण्यासारखे किंवा बाळ होण्याआधी जसे हौशी मायबाप लंगोट आणून ठेवतात तसे आजच विद्या ठाकूर  यांनी गुलालाची पोते भरून ठेवावेत...

ज्यांची नावे माहित नाहीत ज्यांची धड मतदारसंघात ओळख नाही, ज्यांचे काही काम नाही अशा जवळपास सार्यां उमेदवारांना युतीच्या विरोधकांनी मुंबईत उमेदवारी ज्या पद्धतीने बहाल केल्या आहेत असे वाटते कोलांट्या उड्या मारणार्या माकडांनी थेट  सिंहिणीला मधुचंद्रासाठी पाचारण केले आहे. आदित्य ठाकरे यांच्यासमोर सुरेश माने ही काय लढत असू शकते ? पराग अळवणी यांच्यासमोर कोणी जयंती सिरोया, हे तर असे झाले कि एखाद्या सिनेमातून अमिताभ ला काढले आणि कवलजीतला घेतले. निवडणुकांपूर्वीच निवडणुकांचे निकाल असे यावेळचे चित्र आहे. म्हणजे बहुतेक ठिकाणी जवळपास साऱ्याच ठिकाणी युतीच्या उमेदवारांनी बाजारात आत्ताच जावे आणि फटाके घेऊन यावेत, दिवाळीपूर्वीच दिवाळी साजरी करावी. राम कदम यांच्यासमोर कोणी आनंद शुक्ला उभे आहेत मला तर हीच शंका आहे कि राम कदम यांचे विरोधी पक्षात देखील अनेक मित्र असल्याने त्यांनीच हे कच्चे लिंबू मागून घेतले असावे, आघाडीची मोठी शोकांतिका आहे...
हेमंत जोशी 

No comments:

Post a comment