Sunday, 22 September 2019

देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी


देशात नरेंद्र राज्यात देवेंद्र : पत्रकार हेमंत जोशी 
देशात सर्वाधिक लोकप्रिय नरेंद्र आणि राज्यात ऑफ कोर्स देवेंद्र. शोले सिनेमासारखी या दोघांना मिळालेली लोकप्रियता आणि लोकमान्यता. इतरांना फारशी न आवडणाऱ्या जातीचा नेता सर्वांना आवडायला लागणे हे देवेंद्र फडणवीस यांचे सर्वाधिक यश कारण जातीपातीच्या भिंती ओलांडून देवेंद्र फडणवीसांनी महर्षी कर्वे, स्वातंत्रवीर सावरकर, लोकमान्य टिळक, विनोबा भावे, गोपाळ कृष्ण गोखले इत्यादींचे अनुकरण केले, जात बाजूला ठेवून साऱ्या जातीपातीचे भले केले म्हणून या महाराष्ट्राने आज साऱ्यांना मागे सारत फडणवीसांना नंबर वन वर नेऊन ठेवले. शरद पवार यांनी आडून नेहमीचे डाव, दबावटाकून फडणवीसांना छळलेले जनतेला आवडले नाही म्हणून पवारांनाच त्यांनी बाजूला सारून राज्याचे नेते म्हणून फडणवीसांकडे आधी बघितले नंतर त्यांना त्या उंचीवर नेऊन ठेवले...

एक चुटका जो फडणवीसांना तंतोतंत लागू पडणारा पूर्वी तुम्हाला सांगितलेला आज येथे रिपीट करतो. सदाशिव पेठेतले एकमेकांचे दोन जवळचे मित्र आप्पा फडके आणि अण्णा लेले. एक दिवस आप्पा त्यांच्या नानू या टोपण नावाच्या मुलास म्हणाले, आज अचानक शिखरण खाण्याचा खूप मूड आलाय, बाजारात जा आणि सहा केळी घेऊन ये. आज ठरवलंय, सहाही केळींचा फडशा पाडायचाच. आज्ञाधारक नानू लगेच उठला नि बाजारात गेला. नेहमीची केळेवाली म्हणाली, नानू सहा ऐवजी आठ केळी घेऊन जा, तेवढीच उरलेली आहेत, स्वस्तात देते. नानूला भाव छान मिळाला म्हणून खूप आनंद झाला.केळी घेऊन घरी आला. सहा ऐवजी थेट आठ केळी, एवढी उधळपट्टी, आप्पांची सटकली, मुलगा बिघडला म्हणून ते अस्वस्थ झाले, इकडून तिकडे येरझारा घालू लागले...शेवटी त्यांनी ठरवले, नानूला चार व्यवहाराच्या काटकसरीच्या गोष्टी शिकण्यासाठी अण्णा लेले यांच्याकडे पाठवायचे. काहीशा रागानेच ते नानूला म्हणाले, आज संध्याकाळी अण्णा कडे जरा जाऊन ये आणि चार उपदेश ऐकून ये. आज्ञाधारक आणि व्यवहार चुकल्याने खजील झालेल्या नानूने हो अशी मान डोलावली आणि संध्याकाळी तो निमूटपणे अण्णाकडे जायला निघाला, पोहोचला. दारावरची बेल दाबली, वाजली नाही म्हणून काडी वाजवली, पातळ पंचा नेसून हातात मिणमिणता दिवा घेऊन अण्णा लेले यांनी दार उघडले, म्हणाले, तुझ्या ते लक्षात आलेच असेल कि काम कडी वाजवून भागते आहे मग बेल कशाला बिल वाढवायला, म्हणून ती बंद करून ठेवलेली आहे. नानूने मान डोलावली, लक्षात आले हे सांगण्यासाठी. तेवढ्यात अण्णा त्याला म्हणालेही कि असे नाही आम्ही बेल नेहमीच बंद ठेवतो, दिवाळीत हमखास सुरु ठेवतो, श्रीमंत आहोत हे येणाऱ्यांना दाखवण्यासाठी...

नानू जसा आत आला त्याला सोफ्यावर बसायला सांगून अण्णांनी स्वतः दिवा मालवला, म्हणाले, हेही तुझ्या लक्षात आलेच असेल दिवा का मालवला, एकमेकांना बघायचे नाही, केवळ एकमेकांशी बोलायचे आहे, हा दिवा कशाला म्हणून मालवला. मग हळूच अण्णा कोपऱ्यात गेले नि अंगावर असलेला एकमेव पंचा देखील त्यांनी सोडला नि व्यवस्थित घडी करून ठेवला. नानूच्या सोफयावर एका टोकाला येऊन मग तेही बसले नि म्हणाले, लक्षात आले का मी पंचा का काढून ठेवला ते...अरे सिंच्या, अंधारात बसलो आहोत त्यामुळे आपण एकमेकांना धड पाहू बघू शकत नाही मग त्या पंचाची झीज का म्हणून करावी म्हणून तोही काढून ठेवला. नानूला काटकसरीचे महत्व क्षणार्धात पटले नि तो घरी परतला...

www.vikrantjoshi.com

काही विरोधकांनी विशेषतः शरद पवारांनी आपल्या मुख्यमंत्र्यांची राजकीय अवस्था त्यांच्या समोर मुद्दाम विविध संकटे उभी करून वर सांगितलेल्या अण्णा लेले यांच्यासारखी करण्याचे म्हणजे फडणवीसांना जनतेसमोर उघडे नागडे करण्याचे प्रयत्न केले पण हे मुख्यमंत्री वेगळे, जनतेला मनापासून आवडलेले म्हणून त्यांनी पवार किंवा विरोधकांनाच नोव्हेअर केले एवढे कि विरोधकांना लोकांसमोर येण्याची जाण्याची लाज वाटावी, वाटते. आपल्या स्वतःसाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी हिशेबाने नित्यनियमाने पैसे ओरबाडायचे हे अजिबात मनात न ठेवणारा हा मुख्यमंत्री, केवळ जनतेच्या भल्यासाठी राब राब राबतोय, बघतांना राज्यातले मतदार त्यांची जात कोणती, पार्टी कोणती, त्यांनी सारे बाजूला ठेवले नि एक उत्तम नेता म्हणून देवेंद्र फडणवीस यांना डोक्यावर घेतलेले आहे...

२०१४ ते २०१९ मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यापासून असा एकही दिवस फडणवीसांच्या या कार्यकाळात उगवला नाही ज्यादिवशी त्यांच्यासमोर अमुक एखादे तगडे आव्हान संकट उभे नव्हते त्यात त्यांचा चाकोरीबाहेर निर्णय घेण्याचा सुरुवातीपासूनच स्वभाव पण एक बरे आहे कि फडणवीसांना मोठ्या उंचीची बुद्धिमत्ता परमेश्वराने बहाल केलेली आहे, उच्चशिक्षण आणि अलौकिक बुद्धिमत्तेच्या भरवशावर त्यांनी अभ्यासपूर्ण निर्णय घेतले आणि धीरोदात्त मनाने प्रत्येक आपत्तीला संकटाला ते यशस्वीरीत्या सामोरे गेले. त्यांच्यासभोवताली वावरणाऱ्या त्यांच्या मित्रांना आप्तांना कुटुंब सदस्यांना देखील, विशेषतः विरोधकांना वाटायचे आता येथे अमुक एका राजकीय आपत्तीमध्ये सापडल्याने देवेंद्र संपले पण दुसऱ्यादिवशी वर्तमानपत्र उघडले कि वाचायला मिळायचे फडणवीस अमुक आपत्तीमधून संकटामधून सहीसलामत बाहेर पडले आहे याचे प्रमुख कारण म्हणजे जे काय करतो आहे ते पारदर्शी आणि राज्याच्या हितासाठी, त्यामुळे ते अलगद बाहेर पडतात, पूर्वीपेक्षा अधिक जोमाने कामाला लागतात. लोकसहभाग हा त्यांचा आवडता सदगुण त्यामुळे देवेंद्र झोप काढताहेत अमुक एखाद्या व्यसनात व्यस्त आहे असे ना कधी कानावर पडले ना पडेल, सतत कुठल्यातरी माणसांच्या घोळक्यात, मला वाटते एकटेपण त्यांना अजिबात आवडणारे नाही...

पुन्हा एकवार देवेंद्र हि राज्याची काळाची गरज आहे जे नक्की नेमके घडणार आहे. विरोधक नक्की सभागृहात असावेत पण पुढली पाच वर्षे श्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मंत्रिमंडळ सत्तेत असावे. चाकोरीबाहेरचे लोकहितकारी निर्णय घेणारे आणि भ्रष्टाचारमुक्त निर्णयांची अंमलबजावणी, सत्तेतल्या त्याच त्या हितसंबंधांना फाटा देऊन नव्या तरुण तडफदार नेतृत्वाला सहकार्य हे फडणवीसांचे स्वभावैशिष्ट्य. महाराष्ट्राच्या विकासासाठी दूरदृष्टीच्या योजना आधी आखायच्या त्यावर प्रत्यक्ष तीही वेगाने अंमलबजावणी करायची पारदर्शकता ठेवायची, देवेंद्र फडणवीस यांची याचपद्धतीने सतत पाच वर्षे वाटचाल सुरु होती. आज बघू, उद्या करू, नंतर भेटू, जमले तर करू, विचार करू, विचार करून सांगतो, पुढल्यावेळी नक्की करतो, भेटले म्हणजे सांगतो, असे थापेबाज वृत्तीचे दर्शन ना त्यांच्यात घडले ना दिसले. जे काय ते स्पष्ट थेट तोंडावर सांगून मोकळे होणारे फडणवीस म्हणजे आश्वासक शब्दांचे उंच मनोरे, त्यामुळेच ते कोणत्या जातीचे, कोणत्या विचारांचे, कुठल्या पक्षाचे, कोणत्या प्रदेशातले, असले काहीही संकुचित न बघता या राजतल्या जनतेने आधी प्रस्थापित नेत्यांच्या ढुंगणावर पराभवाची लाथ घातली आणि त्यानंतर फडणवीसांना डोक्यावर उचलून घेतले...
क्रमश: हेमंत जोशी

No comments:

Post a comment