Saturday, 14 September 2019

घटस्फोट आणि स्फोट : पत्रकार हेमंत जोशी


घटस्फोट आणि स्फोट : पत्रकार हेमंत जोशी 
माझ्या परिचयाच्या दोन वेगवेगळ्या कुटुंबात घटस्फोट होतो आहे, ऐकून मोठे आश्चर्य वाटले अगदी काल परवापर्यंत सोशल मीडियावर एकमेकांना मिठ्या मारतानाचे यांचे फोटो मी कायम बघत होतो आणि अचानक कानावर पडते, त्यांचा घटस्फोट होतोय, आश्चर्य तर वाटलेच पण राग अधिक आला. तुमचे एकमेकांशी पटत नसेल तर निदान लोकांसमोर प्रेमाचे नाटक तरी करू नये, हे कसले उथळ प्रेम, कालपर्यंत एकमेकांना बिलगूनचिपकून मिठीत घेऊन चिअर्स करतानाचे फोटो टाकायचे नि आज कौतुकाने तुमच्याकडे बघणार्यांना सांगायचे कि आम्ही वेगळे होतोय. मुले जन्माला घातल्यानंतर भारतीय संस्कृती सांगते कि आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत तुम्हाला तुम्ही जन्म दिलेल्या मुलांसाठी त्याग करायचा आहे प्रसंगी भावभावनांना बाजूला ठेवून...

विशेष म्हणजे ज्या दोन कुटुंबातले पतिपत्नी विभक्त होताहेत ते एकमेकांशी छान परिचित आहेत एकत्र कायम चिअर्स करणारे आहेत पेज थ्री लाइफस्टाइल कायम जगणारे अर्धवटराव मराठी आहेत म्हणजे दक्षिणेतल्या बायका कशा अमेरिकेत गेल्या कि जीन्स आणि टॉपवर मोठे मंगळसूत्र घालून म्हणजे चुकीची फॅशन करून रस्त्याने फिरतांना भारतीयांचे हसे करवून घेतात ते तसे हे घटस्फोट घेणारे, त्यांना धड पेज थ्री लाईफ माहित नसते, त्यात एकत्र जमून नवरा आणि बायकोनेही दारू ढोसणे अधिक असते त्यातून फायदे काहीच नाहीत पण हे असे घटस्फोट तर होतात पण हे अर्धवटराव हमखास पुढल्या पिढीला पोटच्या मुलांना अगदी त्यांच्या लहान वयात बिघडवून ठेवतात....

रात्री उशिरापर्यंत झिंगणारे हे मराठी अर्धवट पण पैसा खुळखुळणारे नवश्रीमंत त्यांच्या मुलांमुलींना एकत्र करून ठेवून बाहेर पडतात. ते तिकडे जेव्हा मजा करतात तेव्हा इकडे त्यांची मुलं मुली देखील कधी ब्ल्यू फिल्म्स बघतात कधी थोडीशी दारू देखील पिऊन बघतात विशेष म्हणजे त्यांच्या मुली अगदी कमी वयात मोठ्या वयाच्या मुलांशी सेक्स करून मोकळ्या होतात. वयाच्या बाराव्या तेराव्या वर्षी जर पार्ट्या झोडणाऱ्यांच्या मुली नको ते करून मोकळ्या होणार असतील तर त्यांचे पुढले आयुष्य चांगले जाणे, घडणे केवळ नशिबावर परमेश्वरावर अवलंबून असते. याचा अर्थ विवाहित व मुलांना जन्म दिलेल्यांनी मौजमजा करूच नये असे अजिबात नाही किंवा मी तर असे सांगतो आहे जसे मी स्वतः माझे आयुष्य थेट तुकाराम महाराजांसारखे घालविले आहे, घालवितो आहे. अतिरेक नकरता मौजमजा करणे जोडप्यांकडून अपेक्षित आहे, मोठ्याप्रमाणावर येणारा काळा पैसा उडविण्यासाठी असतो हे दृश्य मुलांसमोर उभे केले कि सारे संपले, नेमके अलीकडे तेच घडते आहे, वाईट कामांवर पैसे उडविणारे मायबाप नेमके पुढल्या पिढीला बघायला अनुभवायला मिळताहेत त्यातून पुढली पिढी बिघडते आहे...

हिंदू किंवा भारतीय संस्कृती हि उत्तम संस्काराचे त्यागाचे प्रतीक आहे त्यामुळे एकदा का ज्या स्त्रीशी तुमचे लग्न होते, तुमचे तिच्याशी पटो अथवा न पटो, त्यातल्या स्त्री व पुरुषाने पुढल्या पिढीसाठी त्याग करीतच आयुष्य काढायचे असते. तुमचा केलेला त्याग शक्यतो वाया जात नाही, पुढली पिढी त्या त्यागाची जाणीव ठेवून असते असे मला वाटते. माझी एक बहीण ऐन तारुण्यात विधवा झाली पुढे तिने पोटच्या दोन्ही मुलांना वाढविले घडविले उत्तम संस्कार दिले, आज त्या मुलांची मुलं देखील मोठी झालीत तरीही या वयात बहिणीचे अख्खे कुटुंब तिला ज्यापद्धतीने मानसन्मान देते, आमच्या कुटुंबातल्या काही वाया गेलेल्या जोडप्यांना मी मुद्दाम सांगतो कि मुलांसाठी जगावे ते आपल्या या बहिणीसारखे. मोठ्या प्रमाणात काळे पैसे घरी आणणारा माझा एक सरकारी नोकरीतला जुना मित्र आहे. तो आणि त्याची बायको येणाऱ्या काळ्या पैशातून जवानी घालवीत होते, रात्र रात्र दोघेही कधी एकत्र तर कधी एकेकट्याने मौज मजा मारायचे त्यातून घडले असे कि मुलगी शिकली पण त्यांचा मुलगा शिकला तर नाहीच पण व्यसनी निघाला. अलीकडे जेव्हा हा मित्र भेटला, ढसाढसा रडला, मी हेच म्हणालो कि जेव्हा तुला आणि तुझ्या बायकोला असे वागू नका मी सांगत ते तुम्ही हसण्यावारी नेण्यात धन्यता मानायचे, आता त्याच पेज थ्री वृत्तीमुळे तुमच्यावर हि रडण्याची वेळ येऊन ठेपलेली आहे...

परिचयाचे जे दोन जोडपे घटस्फोट घेताहेत त्यातल्या एकाच्या बापाचे अख्खे आयुष्य इतरांना कायम फसवून लुटून लुबाडून खोटे बोलून श्रीमंत होण्यात गेले. वरून त्याचा स्वभाव कमालीचा संशयी, स्वतःचे ठेवायचे झाकून आणि दुसऱ्याचे बघायचे अगदी वाकून वाकून त्यामुळे बापाच्या या हलकट चालू स्वभावातून मुलाने शिक्षण तेवढे घेतले पण ना नोकरी केली ना व्यवसाय केला. पुढे जेव्हा लग्नाचे वय झाले, बापाने पोरास्नी कसलेसे केवळ मुलगा उद्योजक आहे हेच दाखविण्यासाठी दुकान थाटून दिले आणि लग्न जुळवून आणले. बापाचा पैसा बघून कदाचित किंवा बापाच्या उत्तम थापा मारण्याच्या स्वभावातून मुलास उत्तम देखणी लायकी नसतांना पत्नी लाभली, त्यांना मुलगा झाला, पेज थ्री लाईफ जगणाऱ्या त्या मुलाने बायकोला देखील त्यात ओढले, त्यातून तिच्या लक्षात आले कि महाशय स्त्रीलंपट आहेत, पत्नीचा संशयी स्वभाव वरून पुरुषांचे बाहेरख्याली वागणे असेल, आजकालची मुली किंवा मुले थेट घटस्फोट घेऊन मोकळे होतात. येथे देखील नेमके तेच घडले कालपर्यंत सोशल मीडियावर त्यांचे एकमेकांना बिलगून झळकणारे फोटो, आज तेच एकमेकांपासून विभक्त होताहेत. 

मित्रांनो, वास्तविक ज्ञान पाजळण्याचा मला फारसा अधिकार नाही पण अनुभवाने सांगतो, सावध असावे सावध वागावे आणि
त्यागाने जगावे तरच आपल्या आयुष्याची संध्याकाळ सुखद ठरू शकते अन्यथा जे पेरतो तेच उगवते...हा विषय विस्तृत आहे तो या नेमक्या काही ओळीतून विशद करणे अशक्य आहे. अनेक किस्से दरदिवशी माझ्या सभोवताली घडतात. अति महत्वाकांक्षा, काळे धन सतत मिळविणे हेच आयुष्याचे महत्वाचे स्वप्न, नवश्रीमंत झालेल्या कुटुंबात त्यातून मोठे थैमान घातलेले आहे, पुढे कधीतरी त्यावर विविध सत्य उदाहरणे देऊन विस्तृत सांगण्याचा लिहिण्याचा मी नक्की प्रयत्न करेल...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.

No comments:

Post a comment