Tuesday, 3 September 2019

पवारांचे पेच व डावपेच : पत्रकार हेमंत जोशी

पवारांचे पेच व डावपेच :  पत्रकार हेमंत जोशी 

माझे एक शिक्षक होते वर्गात येताच ते आधी अगदी विनाकारण जे विद्यार्थी जरासे मस्ती करणारे आहेत, ज्यांच्या पाठीशी कुटुंबातले त्यांच्या घरातले कोणी फारसे प्रभावी उभे नाही त्यांना आधी बेदम मारायचे नंतर शिकवायला सुरुवात करायचे, मी किंवा माझे इतरही तिघे भाऊ तर त्यांचे सॉफ्ट टार्गेट होतो, आम्ही चौघांनी त्यांच्या हातचा विनाकारण मार खाल्ला आहे, आठवणींचे अश्रुंचे ते व्रण अद्यापही आम्हाला तीव्रतेने झोंबतात. तुम्ही व्यक्तिगत मित्र म्हणून माझ्या आवडत्या व्यक्तीचा नटाचा म्हणजे त्या आदेश बांदेकर यांचा होम मिनिस्टर कार्यक्रम बारकाईने नियमित बघा, त्यातल्या बायकांविषयी हीच तक्रार कायम केली जाते कि विनाकारण संतापते,होय, बहुतेक स्त्रिया नवरा थकूनभागून आल्यानंतर त्याने घरी पाय ठेवताच त्याला त्रास देणे सुरु करतात, विशेष म्हणजे बहुतांश स्त्रिया अतिशय जीवघेणे बोलतात प्रसंगी नवऱ्याला मारतातही, नवऱ्याने आवाज उठवला तर सिम्पथी तरुण पत्नींनाच अधिक मिळत असल्याने तो सारे मुकाट्याने सहन करतो, अनेक घरातून हे घडते...

माझे वडील आम्हाला कायम सांगायचे कि सर्वात आधी गल्लीतल्या पहिलवानालाच दम भरून यायचा कि मग अख्खे गाव तुम्हाला घाबरून असते, वचकून दचकून असते, मी त्यांचे सांगणे अनेकदा फॉलो करतो, वडिलांनी सांगितलेले घडते, बदमाश माणसे देखील तुमच्यापासून वचकून असतात. अर्थात हे सारे जीवावर उदार होऊन करायची तयारी ठेवावी लागते. शरद पवार यांच्यावरून हि उदाहरणे नजरेसमोर तरळलीत. पवारांचे हे नेहमीचेच आहे कि ते अनेकदा पत्रकार परिषदेत आले कि पहिल्या पाच मिनिटात एखाद्या तेथल्या प्रभावी पत्रकाराला सर्वांदेखत झापून त्याचा पाणउतारा करून मोकळे होतात त्यामुळे पुढल्या प्रश्नांवर इतर मीडिया आक्रमक न होता त्यांना मिळमिळीत प्रश्न विचारतात जे अजिबात अडचणीचे नसतात....

मला व्यक्तिगत देखील शरद पवारांचा हाच अनुभव आहे पण भय माझ्या स्वभावातच नसल्याने मी त्यावेळी त्यांच्या तोंडावर हसून मोकळा झालो होतो. अलीकडे जय महाराष्ट्र वाहिनीचे प्रमुख आशिष जाधव हे देखील अँकरिंग करतांना तेच म्हणाले कि त्यांना देखील पवारांनी कसे बोल सुनावले होते, वास्तविक पत्रकारांनी अजिबात घाबरून जायचे नसते, अर्थात प्रसंगी बलिदान करण्याची, सबकुछ गमावण्याची तयारी पत्रकारांना ठेवावी लागते जे अनेकांना मीडिया मध्येही शक्य नसते. हि अशी पत्रकारांवर दहशत आल्या आल्या निर्माण करण्याची आणखी एका नेत्याला वाईट सवय आहे पण त्याचा विषय आज येथे नको. सध्या शरद पवार जेवढे त्यांच्याच लोकांकडून एवढे परेशान झालेले आहेत कि त्यांना नेमके कोणते प्रश्न विचारून आणखी अडचणीत आणले जाईल सांगता येत नाही म्हणून श्रीरामपूरला ते नेहमीच्या स्टाईल ने दहशत निर्माण करून विनाकारण मोकळे झाले. वास्तविक एकी आम्हा मीडिया मध्ये असावी कि पवार अमुक एखाद्या पत्रकार परिषदेला आल्या आल्या त्यांना सांगून मोकळे व्हायचे कि मीडिया ला अपमानित करणार असाल तर तुम्ही पत्रकार परिषद न घेतलेली बरी...

पवार त्या वादग्रस्त पत्रकार परिषदेत जे म्हणाले त्याला मोठा अर्थ आहे. ते म्हणाले, आम्हाला नेते सोडून जाताहेत कार्यकर्ते नाही आणि हे विधान खरोखरी विशेषतः सेना भाजपा नेत्यांनी ध्यानात घेणे गरजेचे आहे. विशेषतः ज्यांच्या खांदयावर निवडणुकांची मोठी जबाबदारी आहे त्या उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी पवारांचे सांगणे सिरियसली लक्षात घ्यावे त्याकडे कानाडोळा करू नये. शेवटी या राज्यात पवारांचा मोठा चाहता वर्ग आजही आहे त्या चाहत्या मतदारांना जर असे वाटले कि पवारांना दगा देऊन बाहेर पडलेल्यांना धडा शिकवायचा आहे तर त्याचा फार मोठा फटका सेना आणि भाजपा उमेदवारांना विधानसभेला बसू शकतो ती शक्यता मोठी आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे केवळ भीतीपोटी राष्ट्रवादी आणि काँग्रेस मधून बाहेर पडलेले व पडणाऱ्या नेत्यांविषयी त्यांनी हे राज्य लुटल्याने मतदारांत फारशी त्यांच्याविषयी सिम्पथी नाही, त्यांना धडा शिकविण्याचे मतदारांच्या नक्की मनात आहे अशावेळी सेना व भाजपाचा राजकीय प्रभाव या बाहेर पडलेल्यांना तरुन नेईलच याची अजिबात खात्री नाही, मतदार ऐनवेळी तोन्डावरपडून भल्याभल्यांना निवडणुकीच्या आखाड्यात चारी मुंड्या चित करतात, तुम्हा आम्हा सर्वांना ते चांगले ठाऊक आहे...

जे शरद पवार यांनी फार पूर्वी करायला हवे होते ते त्यांनी यावेळी केले, करताहेत ते करण्याला तसा त्यांना उशीर झाला आहे किंवा नियतीने त्यांना ते तसे करण्यास वाकविले आहे, भाग पाडले आहे म्हणजे पवारांकडे यावेळी पूर्वीचे नेहमीचे नेते नसल्याने त्यांनी ठरविले आहे कि राज्यातले अमोल कोल्हे धनंजय मुंडे यांच्यासारखे प्रभावी ठरू पाहणारे आक्रमक नवीन चेहरे निवडणुकीच्या रिंगणात उतरवून मोकळे व्हायचे. बहुसंख्य मतदार संघातून निदान राष्ट्रवादीतून तरी तेच केल्या जाणार आहे, नवीन तरुण चेहऱ्यांना संधी दिली जाणार असल्याने विशेषतः भाजपा, फडणवीसांना येणारी विधानसभा निवडणूक वाटते तेवढी सोपी नक्की नाही. पवार म्हातारे झालेले असले तरी ते जखमी झालेले सिंह आहेत ते यावेळी अधिक चवताळून उठतील आणि त्यांचे चिडणे आक्रमक होणे जर मतदारांना आवडले तर त्याचे मोठे परिणाम फडणवीसांना भोगावे लागू शकतात, त्यामुळे सर्वाधिक सावधगिरी फडणवीसांना घायची आहे. जखमी शेर कुछभी कर शकता है, पवारांचा तो इतिहास आहे म्हणून जपून असावे...
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment