Sunday, 11 August 2019

महाजन महाविषेशांक २ : पत्रकार हेमंत जोशी


महाजन महाविषेशांक २ : पत्रकार हेमंत जोशी 
आपण मंत्री आहोत म्हणजे असामान्य आहोत हे मानायला गिरीश महाजन आजही पाच वर्षांनंतरही तयार नाहीत, त्यामुळे सामान्यांबरोबर त्यांची धमाल मस्ती सतत सुरु असते. सार्वजनिक समारंभ किंवा अमुक एखादी निवडणूक जिंकल्यानंतर व्यक्त करायचा आनंद, त्यांचे ढोल ताशावर मग खुलेआम सामान्य जनतेबरोबर ठेका घेत नाचणे नृत्य करणे सुरु होते, काही हलकट जेव्हा महाजनांचा ' नाच्या ' असा उल्लेख करतात तेव्हा महाजन नव्हे तर त्यांच्यावर टीका करणारे सामान्यांच्या मनातून कायम स्वरूपी उतरतात. आपण वेगळे आहोत हेच तर दाखवण्याच्या नादात काही मूतरे नेते सर्वसामान्यांच्या मनातून हृदयातून डोक्यातून कायमचे उतरले आहेत. महाआरोग्य शिबिराचे जनक गिरीश महाजन इतरांपेक्षा वेगळे कसे जेव्हा मी सपुरावा सिद्ध करेल, जो तो त्यांना १००% डोक्यावर घेऊन नाचेल, जयहो म्हणेल....

एक किस्सा येथे राष्ट्रवादीच्या जामनेर तालुक्यातल्या नेत्यांविषयी आवर्जून सांगतो. एकदा झाले काय, रात्रीचा एक वाजून गेला होता. ऐन मध्यरात्री जळगाव ते जामनेर या रस्त्यावर एका कारमधून ड्रायव्हर आणि एक महत्वाची व्यक्ती असे दोघेच प्रवास करीत होते. जामनेर पासून पुढे पंधरा किलोमीटर पुढे आल्यानंतर रस्त्यावर एक मोटार सायकल रस्त्याच्या कडेला पडलेली त्या व्यक्तीला दिसली, बाजूला कोणीतरी पुरुष अपघातग्रस्त अवस्थेत पडलेला होता. मध्यरात्रीची वेळ, एकांत, त्यात जोराचा पाऊस त्यामुळे आजूबाजूला कोणीही नव्हते अशावेळी गाडीतल्या त्या व्यक्तीने ड्रॉयव्हरला कार थांबवायला सांगितली. गाडीच्या खाली उतरून त्याने आजूबाजूचा अंदाज घेतला. मनामध्ये शंका आली कि रॉबरी करण्याचा तर प्रकार नाही, म्हणून आपल्या कमरेची रिव्हॉल्व्हर काढत हवेत दोन फायर केले, खात्री पटली कि अपघात आहे लगेच त्याकडे धाव घेतली. अपघात झालेल्या माणसाला उचलून पहिले, चेहरा ओळखीचा वाटला. पण संपूर्ण चेहरा रक्ताने माखला असल्याने नेमके कोण असावे, लक्षात येत मव्हते. मागला पुढला विचार न करता त्या माणसाला उचलून आपल्या कारमध्ये घेतले, पुन्हा 
मागे फिरले, जळगाव गाठले, जिल्हा रुग्णालयात स्वतः दाखल केले, रक्त दिले, रात्र इस्पितळातच जागून काढली, सकाळी सहा वाजता तो गावकरी शुद्धीवर आला, त्याचा जीव वाचला. पुढे त्याच्या घरातले वाचवणाऱ्याला थेट परमेश्वर म्हणाले. वाचवणारे अर्थात राज्याचे जलसंपदा मंत्री, जामनेर विधानसभा मतदार संघाचे आमदार गिरीश महाजन होते, ज्यांच्या सेल्फीबद्दल अलीकडे वाट्टेल ते बोलल्या जाते. आणि ज्यांना वाचवले ते जामनेर तालुक्यातले राष्ट्रवादी पक्षाचे नेते होते....

माझ्या आयुष्यातले आता याठिकाणी सर्वाधिक महत्वाचे वाक्य लिहितो आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षाच्या नेत्याला गिरीश महाजनांनी त्या काळरात्री झालेल्या भीषण अपघातातून वाचविले, मित्रहो, आजही त्या नेत्याने त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी त्याक्षणापासून थेट देवघरात श्री गिरीश महाजन यांचा फोटो परमेश्वराशेजारी लावला आहे, तेथे त्यांना स्थान दिले आहे...घरातले, कुटुंबातले जरी कोणी आजारी असले तरी मान वाळवून बाहेर पडणारे, रोग्याला टाळणारे घरोघरी आहेत पण महाजन असे कि रंजले गांजले आणि आजारी कोणी दिसले कि ते मनातून मनापासून अस्वस्थ होतात आणि पदरचे सारे सोडून समोरच्याला आजारातून मुक्त करण्यासाठी मिशन राबवतात, महाजन आणि त्यांचे काही साथीदार अक्षरश: एखाद्या मिश्नर्यांसारखे जगतात म्हणून जो तो त्यांना डोक्यावर घेऊन मोकळा होतो. निवडणूक मग ती कोणतीही असो, ज्यात गिरीश महाजन यांचा सहभाग असतो तेथे पक्ष वगैरे सारे काही गौण असते महत्वाचे ठरते ते फक्त आणि फक्त गिरीश महाजन यांचे नेतृत्व. मतदार फक्त आपला लाडका नेता अशी मनाशी खूणगाठ बांधून मग घरचे खाऊन महाजन सांगतील तसे करतात म्हणून महाजनांचे सारे उमेदवार निवडून येतात निवडून आणले जातात. जेव्हा केव्हा काही बिकट कठीण राजकीय प्रसंग थेट फडणवीसांवर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून मागल्या साडेचार पाच वर्षात ओढवले त्यांना त्या त्या वेळी हमखास ज्या काही मित्रांची सहकाऱ्यांची सवंगड्यांची प्रकर्षाने आठवण आली, झाली त्यात सर्वाधिक आघाडीवर होते जलसंपदा मंत्री, मुख्यमंत्र्यांचे म्हणाल तर विश्वासू सहकारी म्हणाल तर मित्र श्री गिरीश महाजन....

तुम्ही वाचकहो, मी सांगतो त्यावर विश्वास ठेवा. फार कमी वेळा असे घडते जेव्हा मनात स्वार्थ, राजकारण, हेतू, फायदे, आर्थिक मिळकत, भीती, दबाव इत्यादी बाबींचा विचार न करता विरोधकांना सत्ताधाऱ्यांकडून सहकार्य केले जाते. आघाडीच्या काळातले मंत्री आणि फार कमी असे मुख्यमंत्री होते जे विरोधकांना देखील विविध कामांच्या बाबतीत सहकार्य करायचे, त्यांनी आणलेल्या विकासाच्या किंवा वैयक्तिक खाजगी कामांना देखील प्राधान्य देऊन मोकळे व्हायचे. बहुतेक मंत्री मनात खुन्नस ठेवून जगायचे, आता त्यातलेच माजी मंत्री ज्या लाचारीने जगतांना बघतो, मनातल्या मनात हेच म्हणतो, सारे येथेच भोगायचे असते, मला आणि तुम्हालाही. युतीचे एक चांगले आहे, त्यांच्या मनात सत्तेतले आणि विरोधातले,असे काहीही नसते, तो बेरकी हलकट हेकट स्वभाव त्यांच्या ठायी अजिबात नाही कारण त्यांचे मुख्यमंत्रीच, फडणवीस असे वागत नाहीत...

सर्व श्री चंद्रकांत पाटील, चंद्रशेखर बावनकुळे, सुभाष देशमुख, संजय कुटे, स्वतः देवेंद्र फडणवीस, गिरीश महाजन, सुधीर मुनगंटीवार इत्यादी कितीतरी हे सत्तेतले, युतीतले, समोरचा कोण कोणत्या जातीचा पार्टीचा गटाचा इत्यादी अजिबात न बघता आलेल्यांना सहकार्य करून मोकळे होतात, गिरीश महाजन यांची अख्ख्या खान्देशात म्हणजे नाशिक,धुळे, जळगाव जिल्ह्यात किंवा उभ्या राज्यात जी राजकीय हुकमत लोकप्रियता वाढलेली दिसते त्याचे हेच प्रमुख कारण आहे त्यामुळे जेव्हा केव्हा मीडियातले काही, न घडलेल्या महाजनांच्या चुकीला वाढवून सांगतात, राग येतो आणि वाईटही वाटते. लोकप्रियतेच्या बाबतीत सहकारी मंत्र्यांना पुढे जातांना बघून पोटात न दुखणारे, कालवाकालव होऊ न देणारे आपले हे मुख्यमंत्री, हेही लक्षात घ्यायलाच हवे, त्यांचेही कौतुक वाटते...
क्रमश: हेमंत जोशी.

No comments:

Post a comment