Wednesday, 3 July 2019

मुंडे के फंडे : पत्रकार हेमंत जोशी

मुंडे के फंडे : पत्रकार हेमंत जोशी 
विधान भवनातील विधान सभा आणि विधान परिषद हे अनेकांचे चरण्याचे कुरण आहे, विधानभवनात काळा बाजार केवळ सभेचे आणि परिषदेचे अध्यक्षच आटोक्यात आणू शकतात जर त्या त्या अध्यक्षांचे स्वतःचे मॉरल जागेवर असेल तरच, अन्यथा लागलेली कीड नष्ट करणे शक्य नाही. शेट्ये आडनावाचा एक व्यक्ती आहे तो नेमका कोण आहे म्हणजे विधान सभेतले कामकाज बघतो कि अध्यक्षांकडे नोकरी करतो कि नाही नेमके मला ठाऊक नाही पण सभेत किंवा परिषदेत अमुक एखाद्यावर आलेले बालंट निपटायचे असले कि त्याच्या म्हणे तो हातचा मळ असतो, करोडो रुपये त्यातून त्याने मिळविलेले आहेत. विधान भवन म्हणजे न्यायदेवता पण तीच भ्रष्ट असेल तर खेळ खल्लास....विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याकडून या राज्याला, राज्यातल्या जनतेला विशेषतः त्याच्या ज्ञातीला फार मोठ्या अपेक्षा आहेत कारण गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने साऱ्यांचा हिरमोड केला. पुढल्या विधानसभेत जरी पंकजा मुंडे निवडून आल्यात तरी त्या नक्की मंत्री होणार नाहीत, फडणवीस सरकारला भ्रष्टाचाराच्या गटारगंगेत ढकलण्यात पंकजा यांचा दुर्दैवाने सिंहाचा वाटा आहे, हे तुम्हाला सांगणे म्हणजे पत्रकार महेश पवार हे विवाहित आहेत असे त्यांच्या बायकोला सांगण्यासारखेकिंवा बबनराव लोणीकरांनी नेमक्या किती बायका केल्या आहेत हा विषय अर्धवट सोडलेल्या काँग्रेसचे प्रवक्ता सचिन सावंत यांना सांगण्यासारखे. दिवंगत गोपीनाथ मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे आपापसातले संबंध बिघडले नसते तर धनंजय यांच्याबाबतीत यापूर्वीच फार वेगळे राजकीय चित्र बघायला मिळाले असते पण धनंजय यास राजकीय दृष्ट्या ताकद देणे म्हणजे आपल्याच पायावर कुर्हाड मारून घेण्यासारखे हे राजकीय चतुर गोपीनाथ मुंडे यांच्या चाणाक्ष नजरेने हरल्यामुळे त्यांनी पंडितराव आणि धनंजय या दोघांनाही काट्यासारखे दूर केले...

www.vikrantjoshi.com

विधान सभा निवडणुका तोंडावर आहेत त्यात जर राष्ट्रवादी काँग्रेसला अपेक्षित यश मिळाले नाही तर धनंजय मुंडे यांच्याविषयी जी चर्चाच मध्यंतरी  रंगली होती ती त्यांनी प्रत्यक्ष कृतीतून उतरावी म्हणजे त्यांचे पुढे फारसे राजकीय नुकसान होणार नाही, त्यांनी जवळचे जिवलग मित्र मिलिंद नार्वेकर यांचा मध्यस्थीने थेट शिवबंधन बांधून मोकळे व्हावे. अजिबात गरज नसतांना पंकजा मुंडे यांनी मंत्री म्हणून जो आर्थिक घोळ घातला आहे, त्यांचा समाज सध्या तरी त्यांच्या पाठीशी असल्याने गैर काही घडले नाही म्हणजे पंकजा यांचा ' प्रकाश मेहता ' झाला नाही, पुढल्या वेळी मात्र मोठ्या प्रमाणावर आर्थिक घोळ घालणारे मंत्री राज्यमंत्री सत्तेत नसावेत, ती काळजी शिवसेना आणि भाजपा दोहोंनाही घ्यावी...

सध्याचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांच्याबाबतीत नेहमी असे वाटते कि नेता स्मार्ट आहे, असे नेते शरद पवारांना फार मोठे होऊ द्यायचे नसतात त्यामुळे शरद पवार मुंडे यांची गरज संपल्यानंतर त्यांचे राजकीय वर्चस्व अस्ताला आणून मोकळे होतील असे वाटते. दुसरे अत्यंत महत्वाचे म्हणजे ज्या पद्धतीने पंकजा मुंडे पैसे मिळविण्यावरून बदनाम झाल्या, त्यांच्याविषयी नेता म्हणून आकर्षण संपले ते तसे जर धनंजय मुंडे यांना बिघडवून घायचे नसेल तर सभोवताली जमलेले नेमके कोणत्या भानगडी केवळ पैसे मिळविण्यासाठी करतात त्यावर त्यांनी काळजी घ्यायला हवी. विशेष म्हणजे नेता दीर्घायुषी आणि आरोग्यसंपन्न असेल तरच अमुक एक ध्येय साध्य करणे सोपे जाते, धनंजय यांनी तंदुरुस्त असावे, अधिक भावनिक स्वभावाला मुरड घालून आपले प्रकृतिस्वास्थ्य जपावे....

जाता जाता : अलीकडे एक दिवस उपवास केला होता, त्याचदिवशी एका समवयस्क मैत्रिणीकडे जाणे झाले. जेवणार नाही म्हटल्यावर ती म्हणाली किस ( बटाट्याचा ) देऊ का, तुझे पोट भरेल. तसाही मी केलेला किस तुला नेहमीच आवडत आलाय.  मी लाजत नाही म्हणालो, तेवढ्यात तिची मुलगी म्हणाली, आई तू हो बाजूला, साहेबांना मी किस देते. मी पुन्हा लाजून नाही म्हणालो. पुढे मुलीचे वडील म्हणाले, तुम्ही दोघीही व्हा बाजूला, मी करतो किस. तेवढ्यात आतून कोणे एकेकाळी आचारी असलेले तिचे सासरे ओरडून म्हणाले, माझा केलेला किस त्यांना नक्की आवडेल. क्षणार्धात मी घामाघूम झालो...

तूर्त एवढेच : हेमंत जोशी

No comments:

Post a comment