Thursday, 27 June 2019

फडणवीसांची समृद्धी : पत्रकार हेमंत जोशी

फडणवीसांची समृद्धी : पत्रकार हेमंत जोशी 

विधान भवनातील प्रांगणात एकमेकांच्या शेजारी दोन आदरणीय महापुरुषांचे पुतळे आहेत, महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा. आम्ही महापुरुषांचे पुतळे उभे तर करतो नंतर मात्र मान वर करून देखील अशा पुतळ्याकडे आपण बघत देखील नाही. विशेष म्हणजे त्यातल्या नेमक्या कोणत्या पुतळ्याची विटंबना केली तर सजा होऊ शकते, ऍट्रॉसिटी लागू शकते अलीकडे हे त्या प्रांगणात येणाऱ्या पक्षांना देखील कळायला लागलेले आहे कारण बाबासाहेबआंबेडकरांच्या डोक्यावर म्हणजे पुतळ्यावर एकही पक्षी घाण करून ठेवत नाही पण अगदी शेजारी असलेल्या फुले यांच्या पुतळ्यावर मात्र पक्षांनी बदाबदा घाण करून ठेवलेली असते. मंत्रीमहोदय रावते साहेबांच्या केबिन मधून दोन्ही पुतळे थेट समोर दिसतात, त्यांनीच माझ्या हे नजरेस आणून दिले...

याला म्हणतात कायद्याची भीती म्हणजे देशांतर्गत कायदे एवढ्या कडक पद्धतीने राबविल्या जायला हवेत कि माणसांचे सोडा, पशुपक्षी किंवा प्राण्यांना देखील त्या कायद्यांची भीती वाटायला हवी. बघूया काय वाढून ठेवले आहे आपल्या पानात कारण दिल्लीतल्या नरेंद्रने आणि मुंबईतल्या देवेंद्रने स्वप्ने तर सुवर्णयुगाची दाखवली आहेत, हे दोघे बिघडलेल्यांना घडविणार आहेत कि स्वतःच बिघडून मोकळे होणार आहेत हे काळच ठरवेल. पण देवेंद्र यांनी अगदी अलीकडे जे स्वप्न बघितले होते ते सर्वांना अशक्य वाटत होते, सहज किंवा तत्परतेने स्वप्न प्रत्यक्षात उतरेल असे अजिबात वाटत नव्हते, ते स्वप्न होते थेट तब्बल ७०० किलोमीटर लांबीच्या अगडबंब मुंबई ते थेट नागपूर समृद्धी महामार्गाचे. जेव्हा या अवाढव्य महामार्गाची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली तेव्हा अनेकांनी त्यांची खेचली, खिल्ली उडवली होती. एकाच पंचवार्षिक योजनेत एवढा मोठा भव्य महामार्ग, सहज शक्य नव्हते म्हणून त्यांच्या घोषणेवर सारेच सुरवातीला हसले होते...

मुंबई ते नागपूर आणि नागपूर ते मुंबई तोही अष्टपदरी महामार्ग केवळ एकाच पंचवार्षिक योजनेत मार्गी लावणे म्हणजे हरिभाऊ बागडे यांना अमिताभ ऐवजी प्रमुख भूमिका देण्या सारखे किंवा अलिबागच्या जयंत पाटलांना तुमची सारी संपत्ती दान करून टाका सांगण्या सारखे किंवा आर आर पाटलांना थेट स्वर्गातून खाली आणण्यासारखे किंवा आदर्श घोटाळ्यातील प्रत्येकाला येथून नरकात पाठवण्यासारखे किंवा पत्रकार उदय तानपाठक यांना पत्रकार यदु जोशी यांनी कथक्कली नृत्य शिकविण्यासारखे हे कठीण असे काम सर्वांना वाटले होते पण देवेंद्र फडणवीस यांच्यात सर्वांना राजकारणातला सलमान खान दिसला म्हणजे त्यांनी जी कमिटमेंट दिली ती पूर्ण करवून दाखवली, भाकड गायीला जणू चार चार पिले झाली, वांझोटीची जणू कुंती झाली...

                                                            www.vikrantjoshi.com

तसे समृद्धी मार्गी लावण्याचे श्रेय जसे देवेंद्र फडणवीस यांना तसे ते अनेकांना पण समृद्धी महामार्ग मार्गी लावण्याचे मोठे श्रेय प्रशासकीय अधिकारी राधेश्याम मोपलवार आणि सार्वजनिक बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता अनिल गायकवाड या दोघांना प्रामुख्याने. सुरुवातीला फडणवीसांनी जेव्हा मोपलवार आणि गायकवाड या दोघांवर विश्वास टाकून त्यांना समृद्धी पूर्ण करण्याचे आव्हान केले जबाबदारी टाकली तेव्हा अनेकांनी पुन्हा एकदा फडणवीसांच्या नावाने बोटे मोडली आणि चुकीची माणसे निवडलीत अशीही अनेकांनी त्या दोघांवर टीका केली. जसे मी अतिशय जवळून मोपलवार आणि गायकवाड या दोघांना बघत आलोय तसे जे कोणी त्यांना जवळून ओळखत बघत होते त्या सर्वांना मात्र शंभर टक्के खात्री होते, हे वर्कोहोलिक, कामाला राक्षस अधिकारी समृद्धी महामार्गाचे स्वप्न पूर्ण करतील, नक्की प्रत्यक्षात उतारवतील...

फडणवीसांची, युतीची या राज्याला मोठी देणगी, गिफ्ट म्हणजे समृद्धी महामार्ग, तब्बल १६ भागात या महामार्गाची अतिशय नियोजनबद्ध विभागणी करून म्हणजे सोळा टप्प्यात हे काम विभागून प्रत्यक्ष महामार्ग बनविण्यास केव्हाच सुरुवात करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या महामार्गावर कितीतरी वृक्ष होते ते तोडण्याची आणि विल्हेवाट लावण्याची जबाबदारी फॉरेस्ट डेव्हलपमेंट कारपोरेशन कडे सोपविल्याने हे महत्वाचे काम सोपे आणि बिनबोभाट झाले. समृद्धी महामार्ग ज्या पद्धतीने तयार होतो आहे त्याची क्लिप मला अलीकडे जेव्हा गायकवाड यांनी दाखवली, ती बघून माझी पाचही बोटे आश्चर्याने एकाचवेळी तोंडात गेली. केवळ एकाच पंचवार्षिक योजनेत शेतकऱ्यांच्या जमिनी योग्य मोबदला देऊन ताब्यात घ्यायच्या, साऱ्या परवानग्या मिळवायच्या, मुख्य म्हणजे आर्थिक नियोजन करायचे, सारे कसे अशक्यप्राय वाटत होते पण फडणवीसांनी त्यांच्या टीमने कमाल केली, शक्य न वाटणारे असे शक्य करून दाखवले. समृद्धी महामार्ग झपाट्याने पूर्ण होतोय. जेव्हा तो पूर्ण होईल त्यानंतर जसे एक्स्प्रेस वे मुळे पुण्याचे महत्व वाढले तसे महत्व या समृद्धी महामार्गावरील आजपर्यंत दुर्लक्षित झालेल्या विदर्भ मराठवाडा किंवा तत्सम परिसराचे वाढेल, समृद्धी हि फडणवीसांची देणगी म्हणजे सुवर्णयुगाची एक नांदी असेल हे नक्की...
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment