Friday, 8 February 2019

होय, फडणवीसांनी बुडवला महाराष्ट्र माझा : पत्रकार हेमंत जोशी


होय, फडणवीसांनी बुडवला महाराष्ट्र माझा : पत्रकार हेमंत जोशी 

सध्या मी हे लिखाण करतांना दोह्याला आहे म्हणजे तुम्ही मला आता म्हणू शकता, आप कतार में है...एनी वे, अलीकडे आनंद देवधर यांची एक छान पोस्ट फेसबुकवर वाचण्यात आली, ' टिपिकल फोटो ' या मथळ्याखाली, काही फोटो असे असतात कि ते न चुकता पेपर मध्ये छापून येतात, आपण वर्षानुवर्षे असे फोटो पाहत आलोय..

उदा. ३१ डिसेंबर चा सूर्यास्त, भर पावसाने तुंबलेला हिंदमाता चौक, यशस्वी बंद च्या दिवशी रस्त्यावर रंगलेली क्रिकेट ची मॅच, कडक उन्हाळ्यात गेटवे वर समुद्रात उडी मारणारी मुले, दिवाळीच्या आदल्या दिवशी गर्दीने फुललेला दादरचा रानडे रोड, मोठ्या विकेंडला टोल नाक्यावर लागलेल्या रांगा, अनंत चतुर्दशीला चौपाटीवर पोहोचलेला लालबागचा राजा, बजेटवर शेवटचा हात फिरविणारा आणि कधी नव्हे तो बंद गळ्याचा सूट घातलेला अर्थमंत्री, इफ्तार पार्टीत जाळीदार टोपी घालून ' सेक्युलर हाडूक ' चघळणारे नेते, आता या यादीत आणखी तीन फोटोंची भर पडलेली आहे, मोदीभयगंडाच्या अदृश्य छत्रीखाली एकवटलेले, हातात गुंफलेले हात उंचावणारे हताश नेते, लोकसभेत डोळा मारणारे राहुल गांधी आणि मोसंबीचा रस पिऊन आमरण उपोषण संपविणारे अण्णा हजारे..सुनिलजी, आणखी काही फोटो आपण अलीकडे बघत आलोय, त्यातलाच एक,घसा ताणून ताणून फाडून फाडून, मला राज्याचे भले साधायचे आहे असे सांगणारा भाषण करतांनाचा मुख्यमंत्री देवेंद्र यांचा फोटो...

वाचक मित्रहो, मला हाच एकमेव मुख्यमंत्री हवा, असे माझे येथे सांगणे नसते पण मुख्यमंत्री किंवा प्रधानमंत्री हा असाच हवा हे मात्र नक्की. आधी कुटुंबाचे भले करा नंतर देशाचे, हे असे अगदी जाहीरपणे सांगणारे नितीन गडकरी देखील कधी कधी वाटते, या देशाचे किंवा या राज्याचे प्रमुख व्हावेत, मनाला वाटत नाही किंवा पटत नाही. केवळ आठ दिवस आधी मी जे याठिकाणी लिहिले होते कि गडकरी हे केवळ त्यांच्या सभोवताली असलेल्या दलालरूपी मित्रांचे आणि स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक भले साधण्यात अधिक व्यस्त आहेत तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या पण काल परवा जेव्हा गडकरी यांनी अगदी जाहीर सल्ला दिला कि आधी कुटुंबाचे भले करा, साधा मग देशाचे, त्यानंतर मात्र मी प्रत्येक नेत्यांच्या मनोवृत्तीवर तंतोतंत मते मांडत असतो हे पुन्हा एकवार सिद्ध झालेले आहे...

अहो, या राज्याचे भले करू बघणारे पृथ्वीराज, शंकरराव, यशवंतराव, वसंतदादा किंवा देवेंद्रच हवेत, अशोक चव्हाणांसारखे दळभद्री नकोत, मी सारे अतिशय जवळून बघतो म्हणून जीव तोडून सांगतो. अलीकडे समाजमाध्यमात फडणवीसांवर आरोप करणारा लेख मोठ्या प्रमाणावर त्यांच्या हितचिंतकांनी पसरविलेला आहे. देवेंद्र यांनी हे राज्य नक्की बुडवायला हाती घेतले आहे कि काय, क्षणभर फडणवीस विरोधकांनी दिलेल्या माहितीवर मी पण विचार केला, आरोप मनाला पटले नाहीत आणि नेमके उत्तरे शोधण्याचा मग प्रयत्न सुरु केला...राज्यावर कर्जाचा डोंगर वाढलाय, हे राज्य कर्जत बुडाले आहे, हे सरकार राज्यबुडवे आहे, असे अनेकविध आरोप नक्की केल्या जाणार आहेत पण मेट्रो किंवा समृध्दीसारखे अतिशय झपाट्याने उभे राहिलेले राहणारे असे विविध असंख्य प्रकल्प फुकटात उभे राहणे नक्की शक्य नाही, नसते. हे एखादे शेम्बडे पोर देखील पटकन झटक्यात सांगेल. फडणवीसांच्या काळात घेतल्या गेलेले कर्ज हे मर्यादेच्या आतच आहे हे मला अर्थ खात्याच्या एका जबाबदार आणि भाजपा विरोधी अधिकाऱ्याने सांगितले. घेतलेले कर्ज फक्त आणि फक्त विकासप्रकल्पांवरच खर्च केल्या जाते आहे अन्यत्र कुठेही रक्कम वळविण्यात आलेली नाही हेही त्यांनीच सांगितले. जागतिक स्तराच्या सुविधाही हव्यात आणि त्या पैसे खर्च न करता, कसे शक्य आहे? बदनामीविरोधकांनी नक्की करावी पण तोंड आणि लेखणी सांभाळून...

ते लिहितात, २०१४ साली ज्यावेळी आघाडीचे सरकार गेले त्यावेळी राज्यावर एकूण कर्ज २.६९ लाख कोटी तेही गेल्या ६० वर्षातील होते पण फडणवीस सरकार आल्यानंतर फक्त चार वर्षात महाराष्ट्रवरील एकूण कर्ज ५.३ लाख कोटी झाले आहे म्हणजे केवळ चार वर्षात हे राज्य कर्ज बाजरी करून ठेवले आणि नेमका हा पैसे कुठे गेला? विरोधकांच्या या आरोपाला येथे मी उत्तर मांडलेले लिहिलेले आहेच पण घेतल्या गेलेल्या कर्जाचे वाटप कसे आणि किती कोणकोणत्या प्रकल्प योजनांवर खर्च होते आहे, झाले आहे, होणार आहे, त्यांचेही उत्तर मला वाटते शासनाने, या सरकारने द्यायला हवे आणि ते पुरावे मांडतील, मनोमन खात्री वाटते. कोणतेही सरकार हे सीतेसारखे असते त्यांची सत्व परीक्षा घेणारे विरोधक हवेतच आणि देवेंद्र हे सीतेसारखे निष्कलंक कायम बाहेर पडत राहतील, मनाला मनातून वाटते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment