Wednesday, 27 February 2019

नको दंगा नको पंगा पवारांशी : पत्रकार हेमंत जोशी


नको दंगा नको पंगा पवारांशी : पत्रकार हेमंत जोशी 
गम्मत नाही, याही वयात शरद पवारांचे अमुक एखाद्याला राजकारणातून संपविण्याचे नेस्तनाबुत करण्याचे कसब मानले पाहिजे. अलीकडे फलटणच्या शेखर गोरे यांना अवदसा आठवली आणि त्यांनी पवारांच्या साक्षीने पवारांच्या उपस्थितीत पवारांच्या देखत पवारांच्या समोर राष्ट्र्वादीतल्याच त्यांच्या विरोधी गटाला म्हणजे विधान परिषद सभापती रामराजे निंबाळकर यांच्या गटाच्या कविता म्हेत्रे यांना बोलू दिले नाही वरून स्वतः शरद पवार भाषणाला उभे राहिल्यानंतर देखील गोरे आणि कंपूने त्यांनी गोंधळ घातलाआणि तेथेच त्यांचा खेळ खल्लास झाला...

गोरे आणि त्यांच्या समर्थकांची बाजू योग्य असून देखील चूक झाली त्यांनी एकप्रकारे पवारांना अपमानित केले, पवारांना कमी लेखणे त्यांच्यासमोर वाट्टेल तसे बोलणे किंवा वागणे म्हणजे जंगलात वाघासमोर निघून जाण्या ऐवजी वाघाला वाकुल्या दाखविण्यासारखे किंवा मा. गो वैद्य यांना रा.स्व. संघावर बौद्धिक ऐकविण्यासारखे किंवा एखाद्या वीस वर्षाच्या तरुणीला गिरीश बापटांनी माझ्याही डोक्याचे संपूर्ण केस काळे आहेत सांगण्यासारखे. माढा मतदार संघातील फलटण, कोरेगाव व माण विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या संवाद कार्यक्रमात २१ फेब्रुवारीला शेखर गोरे आणि त्यांच्या समर्थकांनी जेव्हा थेट पवारांसमोर विसंवाद घडवून आणला तेव्हाच उपस्थित मंडळींच्या लक्षात आले कि आजपासून शेखर गोरे नक्की अडचणीत आले आहेत, त्यांनी नको ती चूक केली आहे....

परिणाम व्हायचा तोच झाला, गोंधळ सुरु असतांना शरद पवार तेथे फारसे बोलले नाही पण कार्यक्रम संपताच ते कामाला लागले, आता कानावर बातमी आलेली आहे कि शेखर गोरे यांच्यावर जे गुन्हे दाखल होते, त्यातून त्यांना मोका लावण्यात आला आहे म्हणजे राजकारणात पुढे जाण्याचा गोरे यांचा ' मोका 'तर हुकलाच उलट यापुढे त्यांच्याकडे ' मोका ' लागल्याने कायमस्वरूपी गुन्हेगार म्हणून बघितले जाईल वरून रामराजे निंबाळकर यांचे राजकीय महत्व वाढले, वाढविण्यात आले, चिडलेल्या शरद पवारांनी मग तेही केले. जे कराड मध्ये शेखर गोरे यांच्याबाबतीत घडले तीच चूक तिकडे नागपुरात भाजपाचे आमदार आशिष देशमुख यांनीही केली आहे त्यांनी एकाचवेळी गडकरी, फडणवीस आणि भाजपशी थेट पंगा उघड बंड पुकारून स्वतःचे फार मोठे राजकीय नुकसान करवून घेतलेले आहे, आशिष यांना पुढली निवडणूक मोठ्या त्रासाची कटकटीची असेल,त्यांना जिंकून येणे नक्की सहजशक्य नाही...वरून त्यांनी ज्या काकाला मागल्या विधान सभा निवडणुकीत पराभूत केले होते त्या माजी मंत्री अनिल देशमुख यांना आशिष यांनी घेतलेल्या राजकीय वैरामुळे मोठा राजकीय फायदा येत्या विधान सभा निवडणुकीत होईल किंबहुना अनिल देशमुख त्यातून अगदी सहज निवडून येतील. अनिल देशमुख यांना यावेळी पराभूत करायचे असेल तर भाजपाला देखील काटोल या देशमुखीने गाजलेल्या विधानसभा निवडणुकीत तगडा उमेदवार द्यावा लागणार आहे, कोणत्याही लल्लूपंजू उमेदवाराला यावेळी अनिलबाबू अगदी सहज पराभूत करतील कारण मागल्या विधान सभेला पराभूत झाल्यानंतर कुठेही निराश नाराज फ्रस्ट्रेट न होता अनिलबाबू तसेच त्यांचे पुत्र सलील देशमुख थेट दुसरे दिवसापासून मतदारांमध्ये मिसळून त्यांचे प्रश्न सोडवायला त्यांनी सुरुवात केली, परिणामी ते मतदारांपासून दुरावले नाहीत या त्यांच्या जनसंपर्काचा त्यांना नक्की मोठा राजकीय फायदा होणार आहे...

www.vikrantjoshi.com

घराणेशाही मागून पुढे : मागल्या अंकात राज्यातली राजकीय घराणेशाही कशी खालची पातळी गाठून आहे त्यावर पुढे रेटा ठेवायचा झाल्यास देशमुख यांच्याशिवाय बाहेरच्या मंडळींनी आमदार व्हावे हे जणू तेथल्या देशमुखांना अजिबात चालणारे नाही, अपवाद सुनील शिंदे यांचा, अलिकडल्या जवळपास पाच दशकातले काटोल विधानसभा मतदार संघातले सुनील शिंदे हे एकमेव जे १९९० च्या दरम्यान तेथे एक टर्म आमदार म्हणून निवडून आले होते, त्यानंतर ज्या रणजित देशमुख या माजी मंत्र्याने अनिल नांवे आपल्या सख्ख्या चुलत भावाला जिल्हा परिषद च्या माध्यमातून घरातलाच एक पुढे आणला पुढे त्याच अनिल देशमुखांनी आश्चर्य म्हणजे रणजितबाबुंचे राजकीय महत्व संपविले आणि जवळपास दोन तपअनिलबाबू मंत्री राज्यमंत्री म्हणून सत्ता भोगून मोकळे झाले...दिवंगत वीरेंद्र देशमुख आणि त्यांचे कुटुंब किंवा अनिल, रणजित यांचे देशमुख घराणे, सतत विधानसभा याच देशमुखांच्या हाती, बघूया यावेळी नव्याने चरण ठाकूर यांच्या सारखा एखादा नेता नव्याने जन्म घेऊन तेथे आमदारकी मिळवून जे सुनील शिंदे यांनी शरद पवारांना करून दाखविले होते ते तसे घडते कि नेहमीप्रमाणे आमदारकीची माळ 
एखाद्या देशमुखाच्याच गळ्यात पडते. दोन देशमुखांच्या भांडणाचा फायदा तिसऱ्याला होईल निदान आज तरी तसे वाटत नाही कारण नागपूर शेजारी असलेल्या या काटोल विधान सभा मतदार संघात यावेळी तरी अनिल देशमुख यांचे पारडे अधिक जड वाटते. सुनील शिंदे आता राजकारणात फारसे कुठे दिसत नाहीत पण त्यांना पवारांशी लॉयल्टी न ठेवता आल्याने त्यांचे मोठे राजकीय नुकसान झाले मात्र सत्तेत असतांनाही, नसतांनाही अनिल देशमुखांनी मात्र प्रफुल्ल पटेल यांच्याशी पर्यायाने शरद पवारांशी इमान राखले. पटेल देशमुख यांच्या मैत्रीतून दत्ता मेघे आणि सुनील शिंदे हे पवारांचे पूर्वीचे साथीदार पार राजकीय अस्ताला रसातळाला गेले, वाईट वाटते...
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment