Sunday, 20 January 2019

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ : पत्रकार हेमंत जोशी


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ४ : पत्रकार हेमंत जोशी 
माझी अवस्था एकाचवेळी तिळे झालेल्या लेकुरवाळ्या स्त्रीसारखी झालेली आहे. म्हणजे एखाद्या स्त्रीला तिळे असले कि एकतर तिला हवी तशी झोप मिळत नाही कारण एक लेकरू शरीराच्या उजव्या बाजूला लटकलेले असते दुसरे लेकरू डाव्या बाजूला लटकलेले असते, तिसरे पाठीमागून येऊन त्रास देत असते आणि पुढलेही मूल लवकर हवे म्हणून उतावीळ नवरा त्रास देत असतो, गाल ओढत असतो, नको नको त्या खाणाखुणा करीत असतो ते वेगळेच. वयाच्या साधारणतः सतराव्या वर्षांपासून सकाळी ५ ते रात्री ९ माझे आयुष्य हे असेच तिळे झालेल्या स्त्रीसारखे अतिव्यस्त झालेले आहे. पण तरीही जे भगवी टोपी घातलेले भाजपा कार्यकर्ते, काळी टोपी घातलेले संघस्वयंसेवक किंवा भगवे उपरणे खांद्यावर ओढून अभिमानाने सांगणारे, होय आम्ही सच्चे शिवसैनिक, जर सरकार दरबारी किंवा मंत्री दरबारी काम करवून घेतांना येथे केवळ फसवणूक आणि अडवणूक होऊन माघारी फिरत असतील, अमुक एखादा त्यांना दाद देत नसेल तर जरी मी नेता नसलो तरी ज्यांनी या राज्यात या देशात शिवसेना किंवा भाजपा आणि रा.स्व. संघ उभे केले त्यांच्यासाठी मी नक्की धावून येईन. कारण मी अट्टल मराठी आहे आणि कडवा हिंदू आहे. इतर धर्मांशी माझे  काहीही अजिबात वाकडे नाही पण मी जहाल हिंदुत्ववादी आहे हेही तेवढेच खरे. रांगड्या, गावरान कार्यकर्त्यांची लाज बाळगणाऱ्या त्यांना टाळणार्या मंत्र्यांना किंवा अन्य सत्तेत बसलेल्या असलेल्या पदाधिकाऱ्यांना वास्तविक त्यांच्या वरिष्ठांनीच घरचा रस्ता दाखविणे गरजेचे असते पण तसे अजिबात घडत नसते, आपल्या येथे कावळे मोती वेचतात आणि हंस मात्र मालकाने नको असलेले उकिरड्यावर फेकलेले धान्य वेचतांना दिसतात, आढळतात...

या राज्यात इतर कोणत्याही संघटना, राजकीय पक्ष, सामाजिक व राजकीय संघटना समजावून घेणे किंवा त्यांचा अभ्यास फारसे अवघड नाही, अवघड नसते, कठीण नाही पण ज्या रा.स्व. संघाच्या विविध विस्तारलेल्या फांद्या जगभर जाऊन अतिशय खुबीने किंवा प्रसंगी एखाद्या गुप्तचर एजन्सी सारख्या काम करताहेत, वडाच्या झाडाच्या फांद्यांसारख्या खोलवर जाऊन रुजल्या रुतल्या आहेत तो रा. स्व. संघ नेमका समजावून घेतल्याशिवाय त्यावर बोलणे किंवा लिहिणे म्हणजे अननुभवी तरुणाने अनुभवी तरुणीसंगे मधुचंद्राला जाण्यासारखे किंवा कोणती दारू कशी प्यावी, कोणती वाईन विकत घ्यावी, बिअर केव्हा प्यावी किंवा व्हिस्की केव्हा किती कशी घ्यावी हे निरुपणकार धर्माधिकारींनी प्रेस क्लब जाऊन सांगण्यासारखे किंवा एखाद्या मुलाने त्याच्या वडिलांना सेक्स कसा करावा समजावून सांगण्यासारखे.... 

संघाची विचारसरणी त्यांच्या कामाची पद्धत त्यांचे कार्य, संघात जाऊन तेथे अनेक वर्षे कार्यमग्न किंवा कार्यव्यस्त राहिले तरच संघाचे नेमके काय चालले आहे, काम कसे सुरु असते थोडेफार सांगता येते, जसे मशिदीमध्ये नेमके काय सुरु असते बाहेर येत नाही, कळत नाही त्यापलीकडे कितीतरी पुढे रा. स्व. संघ. या कानाचे त्या कानाला कळू न देता कोणतेही अवडंबर न माजविता हिंदूधर्माचे पालन संगोपन आणि वाढ विस्तार करणे तेथे अतिशय खुबीने सुरु असते. जगभरात अतिशय पिटुकला असलेला हिंदुधर्म जर जिवंत राहावा टिकावा त्याचे अस्तित्व टिकावे असे जर हिंदूंना मनापासून वाटत असेल तर हिंदूंशी जोडल्या गेलेल्या रा. स्व. संघ किंवा शिवसेनेसारख्या संघटना येथे वाढल्याच पाहिजे, टिकल्या पाहिजे...

संघाची हिंदू राष्ट्रावर श्रद्धा आहे. हिंदुस्थान हिंदुराष्ट्र नाही याचे प्रत्येक संघस्वयंसेवकाला अतीव दुःख असते किंवा जगातल्या एकमेव नेपाळ ने जेव्हा ' हिंदुराष्ट्र ' शब्द कायम काढून फेकला तेव्हा जेवढे नेपाळमधल्या हिंदूंना दुःख झाले नाही त्यापेक्षा कितीतरी अधिक पटीने या देशातले संघवाले दुःखी झाले अस्वस्थ झाले. संघस्थापनेत जरी ब्राम्हण आघाडीवर होते तरी अस्पृश्यता संपण्यासाठी संघाचे प्रयत्न असतात त्यासाठी गावोगाव संघस्वयंसेवक अधून मधून एकदिवशीय शिबिरे भरवून सारेच घरचे जेवण आणतात ते एकत्र ठेवतात आणि वाटून खातात. थोडक्यात अमुक काही जातींची संघटित टोळी संघाला कधीही तयार करायची नव्हती पण हे हिंदुराष्ट्रच असावे या संकल्पनेवर त्यांचे कार्य सुरु असते. अत्यंत महत्वाचे म्हणजे संघ, स्वयंसेवकाला सांगतो कि हे राष्ट्र हा समाज हा हिंदुस्थान हा देश तू आपला मानतोस ना मग स्वतःहून त्यासाठी कार्य कर तेही स्वतःचे पैसे टाकून त्यामुळे संघाने देणगी घेतल्याचे जगात एकही उदाहरण नाही. समर्पण बुद्धीने भगव्या झेंड्याला गुरु समजून दक्षिणा अर्पण करणारे संघस्वयंसेवक कोणत्याही व्यक्तीला नव्हे तर त्याग समर्पण पराक्रम हिंदुत्वाचे प्रतीक असलेल्या भगव्या झेंड्याला आपला गुरु मानतात आणि त्यालाच प्रणाम करून मोकळे होतात...

संघातल्या कोणत्याही सेवकाने भगव्या झेंड्या व्यतिरिक्त मग व्यक्ती ती कितीही मोठी असो म्हणजे अटल बिहारी वाजपेयी असोत कि दीनदयाळ उपाध्याय, गोळवलकर गुरुजी असोत कि डॉ. केशव बळीराम हेडगेवार किंवा आजचे मोहन भागवत, एखाद्या बुवाच्या पाया पडावे तसे तुम्ही आम्ही कोणीही कधीही बघितले अनुभवले नाही. संघशिस्त अत्यंत कडवी असते आणि 
त्या शिस्तीचे पालन केल्या जाते संघात व्यक्तिपूजेला अजिबात स्थान नाही. हिंदुत्व हेच त्यांचे राष्ट्रीयत्व आहे आणि केवळ भगवा झेंडा दिसला कि संघवाले नतमस्तक होतात...
क्रमश:

 पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment