Wednesday, 16 January 2019

असावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशीअसावे तसे दिसावे : पत्रकार हेमंत जोशी 

२०१८ चा ३१ डिसेंबर साजरा करण्यात मला फारसा रस नव्हता, मूड पण नव्हता कारण माझ्या एका अतिशय जिवलग मित्राची प्रेयसी त्याला नेहमी प्रमाणे सोडून गेली होती. गेल्या दहा वर्षात मी बघतोय, हा तिच्यावर अतिशय प्रेम करतो, ती त्याच्यावर विनाकारण संशय घेते, संशयातून जे इतर बहुतेक स्त्रिया करतात तेच तीही करते म्हणजे त्याला दरदिवशी न चुकता एवढे टोचून बोलते, एवढा त्रास देते, हैराण करते कि त्याला वाटते एकतर तिला सोडून द्यावे किंवा या जगातून निघून जावे पण हे प्रकार त्याच्या हातून घडणे शक्य नसते मात्र हि त्याची प्रेयसी मग विनाकारण संशयातून त्याला अचानक मध्येच सोडून जाते, हा एकटा पडतो, सैरभैर होतो पण ती एकदा का त्याला अशी सोडून गेली कि एक मात्र त्याच्या बाबतीत चांगले घडते, तो तिच्या व्यापातून विरहातून बाहेर येण्यासाठी पुन्हा आम्हा काही मित्रांमध्ये रमतो, ती तिकडे नवा प्रियकर शोधत असते हा मात्र ती आयुष्यात असो अथवा नसो कायम तिच्या आठवणीत रमलेला वेडा प्रियकर असतो, सहज शक्य असूनही त्याला इतरांच्या प्रेमात पडायचे नसते. नवीन प्रेयसी शोधायची नसते, ती मात्र तिकडे एखाद्याच्या प्रेमात पडते, फसवणूक करवून घेते, सर्वार्थाने फसवणूक झाली कि पुन्हा मित्राकडे परत येते, हा मोठ्या मनाचा, केवळ नितळ प्रेमापोटी तिला पुन्हा जवळ घेतो, यावेळी तरी ती त्रास देणार नाही असा स्वतःचा विनाकारण चुकीचा समज करवून घेतो, तिने त्याच्यापाठी केल्या गंभीर चुका पदरात घेतो आणि तिला पुन्हा एकवार पूर्वीच्याच प्रेमाने मिठीत घेतो, हे असे गेली अनेक वर्षे मी बघत आलोय, एखाद्याच्या नशिबात उत्तम स्त्रीचे,हळव्या मनाच्या स्त्रीचे सुख आणि प्रेम कसे नसते त्यावर माझ्या या सरकारी अधिकारी असलेल्या मित्राचे ' एकतर्फी ' उदाहरण...

www.vikrantjoshi.com

२०१८, थर्टी फर्स्ट डिसेम्बरला मी घरीच बसलो होतो तेवढ्यात माझया आणखी एका जिवलग मित्राचा, शासकीय अभियंता असलेल्या अविवाहित मित्राचा म्हणजे मिलिंद बच्चेवार यांचा फोन आला, आज काय करताय, मी म्हणालो, घरीच आहे, कुठेतरी जाऊया घटकाभर, तो म्हणाला. त्यावर मी, सार्वजनिक समारंभात जगात कुठेही खाणे आणि पिणे दर्जाहीन असते म्हणून सहसा असे समारंभ टाळतो. तरीही जाऊया, तो म्हणाला, माझ्याकडे सहारा स्टार या पंचतारांकित हॉटेल चे महागडे पासेस आहेत तेथे जाऊया, मी म्हणालो, तो संध्याकाळी घरी आला, क्वचित प्रसंगी मी एखादा पेग घेतो, बच्चेवार मात्र घेत नाहीत, मग मी ब्ल्यू लेबल चा पेग घेतला, जेवण केले आणि आम्ही सहारा मधल्या ज्या रेस्टॉरंट मध्ये गेलो, शेजारीच आम्हा दोघांचेही पूर्वीपासून असलेले मित्र वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार परिवारासह, होणाऱ्या नवीन जावयासह होते, त्यांचे चार दोन मित्र होते, मला, आम्हाला भेटल्यानंतर मुनगंटीवार जरासे देखील डिस्टरब होणार्यातले ते नव्हते कारण एकतर त्यांना व्यसने नाहीत त्यांना बायको आहे पण प्रेयसी नाही, त्यांनी बायकांच्या बाबतीत आपल्या आयुष्याचा ' विनोद ' करवून घेतलेला नाही. मग त्यांच्याशी थोड्या गप्पा झाल्या, म्हणाल तर यावेळची थर्टी फर्स्ट त्यांच्यासंगे हा असा अचानक साजरा झाला. ते म्हणाले, गेली वीस वर्षे मी येथेच सहकुटुंब येतो, जेवतो नंतर ठीक पावणेबारा वाजता पार्ले पूर्वेला अगदीच रस्त्याच्या कडेला असलेया एका मंदिरात दर्शनाला जातो नंतर सिद्धी विनायकाचे दर्शन घेतो, घरी जातो. पुढे त्या छोट्या मंदिरात मग आम्हीही होतो, तेथेच त्यांना नववर्षाच्या शुभेच्छा दिल्या नंतर लिंकिंग रोड वर असलेल्या दि बेला कॉफी शॉप मध्ये जाऊन कॉफी घेतली आणि आपापल्या घरी जाऊन झोपलो. नेत्यांनी हे असे मंत्री मुनगंटीवार यांच्यासारखे कोणतेही गूण दोष न लपविता कायम जगावे म्हणजे अशांचे आयुष्य सामान्य लोकांना आवडते, नेतृत्व लयाला जात नाही पण हे असे पारदर्शी वागणे बोटावर मोजण्या एवढ्या नेत्यांचे समाजसेवकांचे किंवा अन्य कुठल्याही क्षेत्रातल्या मान्यवरांचे असते, विशेषतः आम्ही मीडियावाले तर मी नाही त्यातली आणि काडी लावा आतली किंवा दुसर्या सांगे ब्रम्हज्ञान स्वतः कोरडे पाषाण, पद्धतीने जगणारे असतात, म्हणून या अशा भामट्यांना मी लेखणीतून धरून धरून बदडून काढतो....

अनेकदा मी माटुंगा पूर्वेला स्टेशन लागत असलेल्या रमा नायक खानावळीत साधे पण रुचकर दाक्षिणात्य पद्धतीचे जेवायला जातो. मागल्या महिन्यात केव्हातरी गेलो तेव्हा कोणताही लवाजमा सोबत न घेता अगदी एकटे एका कोपऱ्यात मला पार्ल्याचे आमदार पराग अळवणी भेटले, ते म्हणाले, मी येथे अनेकदा येतो, जेऊन जातो. रमा नायक ची पुढली तरुण पिढी माझा मित्र आहे त्याला दि बेला कॉफी शॉप आवडते, मला तेथे तो अनेकदा भेटतो म्हणून त्याच्याशी ओळख आहे, मग मीच त्याची पहिल्यांदा आमदार पराग अळवणी यांच्याशी ओळख करून दिल्यानंतर त्याने तोंडातच बोटे घातली, तो म्हणाला हे अनेकदा येथे येतात पण एवढे साधे कि रांगेत उभे राहून नंबर आला कि जेवतात आणि निघून जातात, नेते हे असेच असावेत म्हणजे त्यांचे नेतृत्व टिकते... खर्या अर्थाने, ना खाऊंगा ना खाने दूंगा पद्धतीने आचरण करणारे सत्तेतले फार कमी असतात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे याच पंक्तीला बसणारे हे मी अगदी खात्रीने सांगू शकतो. येणाऱ्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी दोन्हीकडे त्यांचे पोस्टर्स लावून म्हणजे, आमचे पुढले मुख्यमंत्री, अशी जाहिरात आघाडीने कॉमन करावी बघा, मतांची टक्केवारी वाढली नाही तर मला हेमंत जोशी म्हणू नका, वाटल्यास करप्ट मनोवृत्तीचा पत्रकार म्हणून मोकळे व्हा किंवा पत्रकारांमधला अशोक चव्हाण असे हिणवून बाजूला व्हा. मी नेहमीच सांगत आलोय, जर आघाडीच्या काळात सोनिया गांधी यांना सुचले नसते आणि त्यांनी पृथ्वीराज चव्हाण यांना मुख्यमंत्री म्हणून येथे या राज्यात बसविले नसते तर आघाडीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, आमच्याच मालकीचे आहे, सांगून ते देखील विकून आघाडीतले बहुतेक सारेच अति करप्ट मंत्री मोकळे झाले असते. येत्या काही दिवसात जे तुम्ही न ऐकलेले न वाचलेले, नेमके पृथ्वीराज मी त्यावर विस्तृत लिहिणार आहे, असे नेते जन्माला यावेत, जगायला हवेत, सर्वत्र हवेत...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment