Saturday, 12 January 2019

मुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशीमुख्यमंत्री आणि सडकी संत्री : पत्रकार हेमंत जोशी 
७ जानेवारीला मी सहजच म्हणून मंत्रीमहोदय अर्जुन खोतकर यांच्याशी मंत्रालयात गप्पा मारायला गेलो होतो, परततांना म्हणजे तिसऱ्या माळ्यावरून दुसऱ्या माळ्यावर येतांना अचानक एक माणूस पॅसेजमधल्या जाळीवर उतरतांना आणि हातातले बॅनर्स पत्रके फडकवितांना दिसला, मी त्याला बघण्यासाठी म्हणून कठड्यापाशी उभा राहिलो, तेव्हा त्याच्या सभोवताली फारशी गर्दीही जमलेली नव्हती. या राज्याची महिला मुख्यमंत्री करायला हवी अशी त्या लक्ष्मण चव्हाण यांची मागणी होती, त्यासाठी त्याला देवेंद्र फडणवीसांना भेटायचे होते, मागणी तद्दन फाल्तुक होती, त्यासाठी मुख्यमंत्री नात्याने फडणवीसांना भेटणे हास्यास्पद होते, तरीही मी त्याला किमान ८-१० वेळा ओरडून सांगितले कि याक्षणी मुख्यमंत्री सह्याद्री राज्य अतिथीगृहावर कामात व्यस्त आहेत, तू बाहेर ये, मी लगेच तुझी त्यांच्याशी भेट घालून देतो, पण त्याने ते ऐकले नाही, चव्हाणचा तो एक भिक्कारडा स्टंट होता, विनाकारण त्याने साऱ्यांना वेठीस धरले आणि मुख्यमंत्र्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न केला. खरी कमाल पुढे होती, ज्याचा या प्रकरणाशी काडीचाही संबंध नव्हता तो वन खात्यातील चालक राजेश नामदार मागचा पुढचा अजिबात विचार न करता त्या चव्हाण याला पकडण्यासाठी थेट जाळीवर चढला आणि त्याने अथक प्रयत्न करून चव्हाणला बाहेर आणले, काढले. पोलीस हवालदार बाळासाहेब रणखांबे हे देखील त्या जाळीवर जीवाची पर्वा न करता चढलेले होते, अहो, शासकीय जाळी ती, केव्हा तुटेल भरवसा नव्हता, तरीही त्या प्रकरणाशी अजिबात संबंध नसतांना राजेश नामदार याने जीव धोक्यात घातला होता, वनमंत्री मुनगंटीवार, मुख्यमंत्री फडणवीसांनी त्या चालकाचा नक्की अगदी जाहीर सत्कार करायला पाहिजे...

येथे हा प्रसंग सांगण्याचे प्रयोजन म्हणजे काहीही करून कसेही करून दररोज त्या मुख्यमंत्र्याच्या काळजाचा विनाकारण ठोका चुकविणारे हे असे बिलंदर दररोज त्या मश्रुमसारखे उगवायला लागलेले आहेत आणि तुम्हाला हे माहित आहे कि जे चक्क उकिरड्यावर उगवतात त्यांचे विचारही उकिरड्यासारखेच असतात. दररोज काहीतरी उकरून काढायचे मग अतिशय थंड डोक्याने फडणवीसांनी त्यावर उत्तर देण्यासाठी वेळ घालवायचा, विकासाची काही कामे बाजूला ठेवायची किंवा रात्री तीन तीन वाजेपर्यंत जागे राहून, तब्बेतीकडे दुर्लक्ष करून मागे पडलेल्या निर्णयांचा निपटारा करायचा मग केवळ चार पाच तास झोप काढून लगेच सकाळी सात वाजता पुन्हा पुढल्या कामांना जुंपून घ्यायचे, हे असेच त्यांचे मुख्यमंत्री झाल्या दिवसापासून सुरु आहे, त्यात फारसा खंड पडलेला नाही...

www.vikrantjoshi.com

मागे मराठा आरक्षणाच्या निर्णयाला स्थगिती दिल्यानंतर देखील फडणवीसांना लक्ष्य करून महाराष्ट्रात दरदिवशी त्यांच्याविरोधात राज्यातल्या कानाकोपऱ्यात मुद्दाम जाणूनबुजून रणकंदन माजविले जात होते, या मोर्चाचे नेतृत्व करणाऱ्या एकानेत्याला मी तो इतरवेळी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये ऍक्टिव्ह असल्याने ओळखत होतो, विचारले, हे असे का घडते म्हणजे तुम्हाला माहित आहे कि मराठा आरक्षणाचा चेंडू कोर्टात आहे, तरीही, त्यावर तो म्हणाला, भाऊ आम्हाला आमच्या नेत्यांचे तसे आदेश आहेत कि राज्यात कुठेही शांतता आहे, असे दिसत कामा नये, म्हणून आमचे हे असे आंदोलन पेटविणे पेटत ठेवणे सुरु असते. लोकाभिमुख कामातून मुख्यमंत्री लोकप्रिय ठरले, हा निरोप कुठेही जाता कामा नये. पुढे तो हेही म्हणाला कि फडणवीसांना त्रास देण्याचे आदेश फक्त आमचेच नेते देतात, काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आंदोलन चिघळत ठेवण्याचे कधीही त्यांच्या वरिष्ठांकडून सांगितल्या जात नाही....

हि अशी या राज्यातल्या काही नारदछाप नेत्यांची वृत्ती आढळली कि असे वाटते जाळीवर विनाकारण चढून बसलेल्या त्या चव्हाणांस देखील असे मुद्दाम कोणीतरी ब्रेन वॉश करून भडकविले गेले कि काय, आपोआप तसे वाटायला लागते. म्हणजे देवेंद्र फडणवीसांवर डूख धरण्याचे खरे कारण वेगळेच असते त्यामागे अनेकदा लोकांचे हित साधणे हा उद्देश नसतो तर फडणवीसांचा राजकीय बळी घेण्यासाठी अमुक एखादा भावनिक मुद्दा उपस्थित करून लोकांची माथी भडकावली जातात किंवा फडणवीसांना येनकेनप्रकारेण बदनाम केले जाते. बॅटिंग करणाऱ्या निष्णात बॅट्समन सारखे देवेंद्र यांचे झाले आहे म्हणजे मैदानावर चहू बाजूंनी निष्णात खेळाडू वरून फास्ट बॉलरचा मारा तरीही एखादा तेंडुलकर कसा अनेक शतके झळकावून मैदानाबाहेर नॉट आऊट राहून बाहेर पडतो हे असेच यशस्वी बॅट्समन सारखे फडणवीसांचे आहे. नॉट आऊट राहून ते बाहेर पडतील, तुम्हाला यात शंका आहे ? 
तूर्त एवढेच:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment