Thursday, 27 December 2018

भानगडी आवडे कार्यालय तावडे २ : पत्रकार हेमंत जोशी
भानगडी आवडे कार्यालय तावडे २ : पत्रकार हेमंत जोशी 

परवा मला नको ते दृश्य मुंबईत बघून फार वाईट वाटले. झाले असे मला एका व्यक्तीकडून काही कागदपत्रे घ्यायची होती म्हणून मी बांद्रा पश्चिमेला लकी हॉटेल च्या सिग्नल नंतर लगेच जे दोन पेट्रोल पंप्स आहेत ते ओलांडून लगेच असलेल्या एका पान टपरीजवळ माझी कार साईडला उभी करून वाट पाहत होतो तेवढ्यात माझे त्या पान टपरीकडे लक्ष गेले आणि आश्चर्याचा धक्का बसला कारण त्या टपरीवर रजनी गंधा नावाच्या गुटक्याचे पाऊच असे काही अगदी समोर टांगलेले होते कि जणू या राज्यात गुटका बंदीच नाही. तसेही उभ्या राज्यात विशेषतः मुंबईत तर गुटका बहुतेक साऱ्याच पान टपऱ्यांवर अगदी सहज उपलब्ध असतो, महागड्या दराने विकल्या जातो. मला वाटते या खात्याशी संबंधितांच्या मोठ्या आणि रेग्युलर हप्त्यांची सोय जणू या गुटका बंदीने करून दिलेली आहे, मंत्री गिरीश बापटांनी लक्ष न घालणे म्हणजे अप्रत्यक्ष या अंधाधुंद अधिकाऱ्यांना पाठीशी घालणे असे आता समजण्यास हरकत नाही...

विनोद तावडे यांच्याशी सलगी असलेल्या कोणकोणत्या ' महान व्यक्तींवर ' लिहावे म्हणजे नेमकी सुरुवात शार्दूल बायस पासून कि अजिंक्य देव पासून, मधू चव्हाण यांच्या पासून कि शिवाजी देबावकरांपासून मनाचा गोंधळ उडाला आहे, माझ्या पुराव्यांची यादी लामलचक आहे, पण शेवटी ठरविले कि शिक्षण मंत्र्यांचे विशेष कार्यकारी अधिकारी, म्हणे सध्या फरार असलेले डॉ. चारुदत्त शिंदे यांचे प्रकरण अगदी ताजे आहे, सुरुवात तेथूनच करावी, डॉ. शिंदे नेमके कोण कसे, लिहायला घेतले...

काही मुले मुली जोपर्यंत देशात आईवडिलांबरोबर असतात तोपर्यंत व्यवस्थित वागतात, परदेशात गेली आईवडिलांपासून दूर गेली कि वाम मार्गाला लागतात तसेच काही नेते आमदार असेपर्यंत अत्यंत चांगले असतात, नामदार झाले रे  झाले कि त्यांच्या डोक्यात कोणती हवा जाते कोण जाणे पण ते आपले नाव खराब करून घेतात, अपेक्षाभंग करतात, नको त्या मार्गाला लागून आपले चांगले चाललेले राजकीय करिअर संपवतात, संपुष्टात आणतात, त्यातलेच एक विनोद तावडे आहे, त्यांचे तसे मंत्री झाल्यानंतर वागणे बोलणे बिनसले आहे असे मला वाटते, मनापासून वाईट वाटते, तावडे यांच्यावर कधी टीका करण्याची वेळ येईल असे वाटले नव्हते पण तावडे पूर्वीचे न राहिल्याने नाईलाज होतोय, त्यांनी जर विधानसभा निवडणूक लढविली तर मला यावेळी आक्रमक व्हावे लागेल, विनोद तावडे नेमके कसे सांगावे लागेल...

पेशाने शासकीय वैद्यकीय अधिकारी, संरक्षण मंत्री सुभाष भामरे यांचे जवळचे नातेवाईक आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांचे त्यांच्या कार्यालयातले विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे यांच्यावर त्यांच्या सहकाऱ्यांवर धुळ्यातबनावट कागदपत्रांद्वारे दोन कोटींचा गंडा घातला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला आहे, यापूर्वी देखील डॉ. शिंदे यांचे असेच एक प्रकरण घडले होते ते तावडे यांना ठाऊक असतांनाही त्यांनी डॉ शिंदे यांना आपल्या कार्यालयात स्थान दिले, मानाची जागा दिली, विशेष कार्यकारी अधिकारी म्हणून नेमले...

शासकीय योजनेचा बेकायदेशीररीत्या लाभ मिळवून देण्याच्या उद्देशाने वाहनांची खोटी व बनावट कागदपत्रे तयार करून शासनाला सुमारे दोन कोटींचा गंडा घातल्याचा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. धुळ्याचे सामाजिक कार्यकर्ते श्री संजय रामेश्वर शर्मा यांनी याप्रकरणी फिर्याद दाखल केली आहे, अन्य शासकीय अधिकारी किंवा व्यावसायिक याप्रकरणी अडकलेले असून २०१३ ते १५ दरम्यान धुळे येथे शासकीय रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असलेले आणि सध्याचे शिक्षणमंत्री विनोद तावडे यांचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ. चारुदत्त शिंदे हे देखील त्यातले एक प्रमुख आरोपी आहेत, त्यांना कोणत्याही क्षणी अटक होऊ शकते म्हणून ते फरार आहेत तरीही तावडे यांनी त्यांना त्यांच्या कार्यालयातून अद्याप काढलेले नाही. डॉ. शिंदे यांच्या विरोधात मोहाडी, धुळे पोलीस स्टेशन मध्ये कलम ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल होऊनही अद्याप त्यांना आणि सामील झालेल्या अन्य अधिकाऱ्यांना, संबंधितांना अटक झालेली नाही, स्थानिक नागरिकांना जनतेला वारंवार आश्चर्य वाटते आहे. थेट केंद्रीय सौरंक्षण मंत्र्याच्या भाच्यानेच शेण खाल्याने डॉ. चारुदत्त शिंदे यांना अद्याप अटक झालेली नसावी असे दिसते आहे....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment