Saturday, 24 November 2018

बोलणे एक कला : पत्रकार हेमंत जोशी


बोलणे एक कला : पत्रकार हेमंत जोशी 
काही नेते डिफेक्टिव बोलतात तरीही इफेक्टिव्ह ठरतात जसे किरीट सोमय्या, काही नेते बोलतात त्याच्या नेमके उलटे करतात जसे शरद पवार, काही माणसे क्षणार्धात जगातल्या कुठल्याही व्यक्तीला आपलेसे करू शकतात जसे पत्रकार हेमंत जोशी ( आत्मस्तुती करणारा तो एक मूर्ख जाणावा ) काही पत्रकार केवळ हसविणे हाच आमचा धंदा मानून क्षणात एखाद्याला खिशात घालतात जसे उदय तानपाठक काही माणसे लोकमान्य टिळक वि. दा. सावरकर देशभक्ती इत्यादी महान विषयांच्या खाली उतरतच नाहीत जसे पत्रकार यदु जोशी काही नेत्यांचे बोलणे आकर्षकही असते आणि आश्वासकही जसे देवेंद्र फडणवीस काही नेते त्यांना गुरुस्थानी असलेल्या नेत्यांची बोलतांना वागतांना हुबेहूब नक्कल करतात जसे राज ठाकरे आणि धनंजय मुंडे किंवा पंकजा मुंडे, होय, पंकजा मुंडे भाषण करतांना ऐका, असे वारंवार जाणवते कि स्त्रीच्या वेशातले जणू गोपीनाथ मुंडे बोलताहेत. काही नेत्यांनी बोलायला सुरुवात करायचा अवकाश ते ज्ञानी हुशार अभ्यासू आहेत लगेच जाणवते जसे पृथ्वीराज चव्हाण, अनंत गाडगीळ किंवा काही नेत्यांची भाषा काहीशी शिवराळ काहीशी अश्लील असल्याचेही लगेच जाणवते जसे दिलीप सोपल किंवा ब्राम्हण अतुल भातखळकर....

विशेषतः भ्रमणध्वनीवर थोडक्यात नेमके बोलणे, नेमके सांगणे केव्हाही चांगले. जे प्रत्यक्ष भेटीत किंवा भ्रमणध्वनीवर देखील बोलण्याचा अतिरेक करतात त्यांना सुरुवातीला जोडलेले बहुसंख्य मित्र पुढे त्यांच्या बडबडीतून टाळायला लागतात, अशांची लोकप्रियता झपाट्याने कमी होते. जगप्रसिद्ध विचारवंत पास्कल यांनी एके ठिकाणी असे म्हटले आहे कि जर आम्ही मानवांनी अकारण बडबड वायफळ बोलणे थांबवले टाळले तर जगातले ९० टक्के प्रॉब्लेम्स आपोआप कमी होतील. आपल्यातले बहुतेक अनेक दिवसभरात अनावश्यक बोलत असतात. विशेष म्हणजे मानसशास्त्र असे सांगते कि वेड्यांना बोलायला खूप आवडते. किंबहुना अति बडबड केल्याने अति बोलण्यानेच ते वेडे झालेले असतात. माझे सांगणे खोटे वाटत असेल तर एकनाथ शिंदे यांची ओळख काढून मुद्दाम ठाण्यातल्या वेड्यांच्या इस्पितळात जाऊन या, तुमच्या ते लक्षात येईल कि ठार वेडी माणसे खूप बोलतात किंवा आधी ते खूप बोलायचे म्हुणुन वेडे झाले. अर्थात सारेच वेडे वेड्यांच्या इस्पितळात असतात असेही नाही कारण वेड्यांच्या इस्पितळात भरती न झालेल्या वेड्यांना उगाचच वाटत असते कि ते वेडे नाहीत. मनातले सांगतो, ज्यांना वाटते आपले घर उध्वस्त होऊ नये अशा अति बोलणाऱ्यांनी मानसोपचार तज्ज्ञांचा सल्ला घेऊन योग्य उपचार करवून घेणे गरजेचे असते, त्यात लाज वाटून घेऊ नये....

काही माणसे वायफळ प्रश्न विचारून समोरच्याला हैराण करून सोडतात. जसे मधुचंद्र साजरा करायला आलेल्या अनेकांना विचारणारे असतात, हनिमून साजरा करायला आलात वाटते, आता तुम्हीच सांगा, नवपरिणीत जोडपे मधुचंद्र साजरा कारण्यासंही येतील कि ब्रम्हचाराचे फायदे या विषयावर अभ्यास करायला येतील, स्मशानात येऊन विचारणारेही असतात कि कोणी गेले वाटते, अशावेळी विचारणाऱ्या व्यक्तीला काय उत्तर द्यावे कि नाही कुणी गेलेले, घरी वेळ जात नव्हता म्हणून येथे आम्ही बिड्या फुंकायला आलोत, थोडक्यात काहीही करून सतत तोंडाची वाफ गमावणारे, अशांची गणना केवळ वेड्या माणसात करून मोकळे व्हावे....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment