Wednesday, 5 September 2018

फडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी


फडणवीस आडनावाची मिसळ ५ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडे या राज्यातले आम्ही पोक्त वयाचे पण रोमँटिक असलेले मराठी व्यवसायिक मराठी उद्योगपती स्वतःवर जाम खुश आहोत, सारखे सारखे ती मालिका जशी जशी पुढे सरकते आहे अगदी ७-८ दिवसाआड पार्लर मध्ये जाऊन येतो आहोत, अर्थातच छान छान दिसण्यासाठी. तुला पाहते रे मालिका सुरु झाल्यापासून आम्हा पोक्त पण तरुण असणाऱ्या तरुण भासणाऱ्या तरुण दिसणाऱ्या कायम फ्लर्ट करायला आवडणाऱ्या व्यावसायिकांचे उद्योगपतींचे चांगले दिवस आलेले आहेत आता त्या ईशासारख्या मस्त मस्त दिसणाऱ्या मुली आमच्याही प्रेमात पडू लागलेल्या आहे, गम्मत नाही वस्तुस्थिती सांगतो आहे, माझ्या आयुष्यात शपथेवर सांगतो मी एकही मालिका बघितलेली नाही पण तुला पाहते रे मालिका डोळ्यात तेल घालून बघतो कारण मला आम्हाला आता भेटणाऱ्या भेटलेल्या विविध ईशांशी त्या विक्रांत सरंजामे सारखे वागणे बोलणे जमायला हवे ना. मी सांगतो ते खोटे असेल तर तुम्ही विश्वास पाठक यांना निरखून बघा त्यांनी केस काळे करायचे तर सोडून दिलेले आहेच वरून आता ते चुकून एखादी ईशा पुढ्यात आलीच तर एरवी हसतमुख विश्वासजी उगाचच गंभीर मुद्रेने बघत बघत म्हणे पुढे जातात. अर्थात असे विक्रांत सरंजामे कितीतरी दरदिवशी दिसायला लागलेले आहेत त्या प्रसाद लाड किंवा विवेक जाधव किंवा अविनाश भोसले यांच्यासारखे. अविनाश यांनी तर म्हणे चक्क पांढर्या आणि काळ्या रंगाचा केसांचा विग अलीकडे युगांडा मधून बनवून आणला आहे आणि सांगलीचे जयंत पाटील हे देखील सुटाबुटात वावरायला लागलेले आहेत...

माफ करा, विषयांतर झाले, फडणवीसांची मिसळ सांगायचे राहून गेले अर्थात तेही विक्रांत सरंजामे यांच्या वयाकडे झुकलेले आहेतच, बघूया अमृताला बाजूला सारून एखादी इशा तेथे जागा घेते का, शक्यता कमी आहे, यावेळी अशोक चव्हाण मुख्यमंत्री असते तर चित्र नक्की वेगळे दिसले असते. स्त्री दाक्षिण्याच्या बाबतीत देवेंद्र नेमके आणि नक्की त्या शंकरराव चव्हाण किंवा यशवंतराव चव्हाण किंवा बॅरिस्टर अंतुले यांच्या रांगेत बसू शकणारे केवळ एकपत्नीव्रत सांभाळणारे त्यामुळे एक बरे झाले त्यांचा वेळ वाचतो जो सत्कर्मी लागतो. मैत्रिणींसाठी प्रेयसीसाठी गायब होणार्यातले ते या राज्याच्या काही माजी मुख्यमंत्र्यासारखे नक्की स्त्रीलंपट नाहीत...

येथे महत्वाचे असे कि केवळ काही वाक्यांमध्ये देवेंद्र फडणवीस यांचे त्या त्या वेळेच्या मुख्यमंत्र्यांशी साधर्म्य साम्य दाखविणे अजिबात शक्य नाही त्यावर एक पुस्तक निघेल कदाचित कादंबरीही, हि अतिशयोक्ती नाही. आणि हो, वाईट याचे वाटते कि कौस्तुभ धवसे श्रीकांत भारतीय सुमित वानखेडे अभिमन्यू पवार केतन पाठक प्रिया खान निधी कामदार संदीप जोशी यांच्यासारखे असे कितीतरी कि जे या ना कारणाने सतत कायम बहुतेकवेळा देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवती सभोवताली असतात विशेष म्हणजे या साऱ्यांना नेमके ठाऊक आहे कि फडणवीस यांचे नेमके कोणते कार्य लोकांसमोर साध्या साध्या उदाहरणातून पुढे यायला हवे जेणेकरून देवेंद्र फडणवीस यांचा शरद पवार होईल म्हणजे त्यांचे नेमके जे चांगले गूण आहेत ते घराघरात पोहचून त्याचा मोठा फायदा फडणवीस यांचे व्यक्तिमत्व आणखी उंचावण्यासाठी होईल पण त्यांना हे का करावेसे वाटत नाही, नेमके कळलेले नाही. त्यावर माहिती आणि जनसंपर्क विभागाचे अधिकारी कर्मचारी आणि त्यापेक्षा त्यांचे महासंचालक आयपीएस ब्रिजेश सिंग ज्या छोट्या छोट्या घटनांमधून फडणवीसांचे व्यक्तिमत्व फुलविण्यात मेहनत घेतात त्यावर करावे तेवढे कौतुक कमी. त्यांचे ते कामच आहे त्याचा त्यांना पगार मिळतो असे काही वाचाळवीर म्हणतीलही पण इतरांना देखील मुबलक आर्थिक फायदे मिळतात त्यातल्या काहींनी तर आर्थिक बस्तानासाठी थेट अमेरिका गाठलेली आहे फक्त माझे डोके फिरायचे त्या विषयावर बाकी आहे आणि ते फिरू नये असे मी देवाला वारंवार सांगतो आहे...

एकच सांगतो यशवंतराव चव्हाण हे आधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार होते आणि देवेंद्र फडणवीस हे अत्याधुनिक महाराष्ट्राचे शिल्पकार आहेत असे अगदी मनापासून म्हणावेसे वाटते. स्वाभिमान शालीनता व नम्रता या ज्या त्रिसूत्रीवर यशवंतराव जगले ते तसे हुबेहूब वागणे आणि बोलणे या मुख्यमंत्र्यांचेही. विशेष म्हणजे दोघांनाही वैचारिक अधिष्ठान लाभलेले आहे, दोघेही ज्ञानाचे उपासक ते होते हेही आहेत त्यातले एक दुर्दैवाने हयात नाहीत आणि देवेंद्र फडणवीस जणू यशवंतराव यांच्याच पावलावर पाऊल ठेवून हे राज्य हाकताहेत. मोठे कठीण असे हे काम आहे कि या दोघांनाही ज्ञानाचे आकर्षण आणि दुबळ्या अशक्त जनतेविषयी लोकांविषयी प्रेम होते प्रेम आहे. जसे यशवंतराव एक अभ्यासू व सुसंस्कृत व्यक्तिमत्व होते, जसे ते एक यशस्वी राजकारणी आणि निस्सीम देशभक्त होते. जसे साहित्य कला क्रीडा संस्कृती राजकारण आणि समाजकारण इत्यादी बहुरंगी विषयांना आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत धरून चिकटून होते कार्यरत होते अगदी हुबेहूब देवेंद्र फडणवीस देखील जणू यशवंतरावांचे डुप्लिकेट...
तूर्त एवढेच :

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment