Saturday, 21 July 2018

मंत्रिमंडळाची पोलखोल ३ : पत्रकार हेमंत जोशी


मंत्रिमंडळाची पोलखोल ३ : पत्रकार हेमंत जोशी 
फारतर बैलजोडीच्या तोंडाला फेस येईपर्यंत शेतकरी त्यांच्याकडून कामें करवून घेतात, तोंडाला अक्षरश: फेस येईपर्यंत तेही लोकांसाठी कामें करणारे फार कमी आहेत, त्यातलेच एक ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे ज्यांना सुरुवातीला, ' आपला कृपाभिलाषी ' च्या वर सही करणारा अडाणी मंत्री म्हणून काहींनी चिडविले हिणविले होते, आजचे सर्वाधिक यशस्वी मंत्री. त्यांना फारतर त्यांच्या विरोधकांनी आधुनिक द्रौपदी म्हटले असते तर हरकत नव्हती कारण बावनकुळे यांची अवस्था गडकरी आणि फडणवीस यांच्या मध्ये बसून बसून किंवा त्या दोघातला नेमका समानव्य साधता साधता नक्की द्रौपदीसारखी झालेली आहे पण येथे महाभारतातल्या द्रौपदीसारखे त्यांचे नाही म्हणजे रोटेशन पद्धतीने सहा महिने गडकरींसंगे आणि सहा महिने फडणवीस यांच्याबरोबर, त्यांना एकाचवेळी या दोघांनाही सांभाळावे लागते म्हणजे राहुल गांधी पद्धतीने फडणवीसांना त्यांनी सकाळी डोळा मारला रे मारला कि संध्याकाळी लगेच गडकरींना कडेवर घेऊन ' गोल गोल राणी ' म्हणावे लागते, पण ते त्यांना मस्तपैकी यासाठी जमले आहे कि बावनकुळे यांचा हेतू शुद्ध आहे, फुक्काचे राजकारण त्यांना खेळायचे नाही, मंत्री, पालकमंत्री म्हणून त्यांना आलेल्या, पडलेल्या जबाबदाऱ्यांचे निपटारे करायचे असतात, पेंडिंग काहीही न ठेवता...

कदाचित प्रेमापोटी नागपूरकर त्यांना चांगले म्हणतील किंवा त्यांना मस्तपैकी फ्लाईंग किस देऊन मोकळे होतील किंवा धाकापोटी कदाचित त्यांच्या ऊर्जा किंवा उत्पादन शुल्क खात्यातले झक्कास मंत्री म्हणून मोकळे होतील पण तसे अजिबात नाही, खरे वास्तव असे आहे कि या राज्यातले मग ते कोणत्याही राजकीय पक्षाचे किंवा अन्य राजकीय विचारांचे, ज्यांनी ज्यांनी म्हणून आजपर्यंत अमुक एखाद्या कामानिमित्ताने बावनकुळे यांची भेट घेतलेली आहे, त्यांनी कोणीही सांगावे कि बावनकुले हे फेल्युअर कुचकामी बिनकामाचे काम न करणारे मंत्री आहेत, हे असे सांगणारे, मला शंभर टक्के खात्री आहे, कोणीही पुढे येणार नाही, एवढेच काय, मागल्यावेळी जे कोणी उमेदवार विधान सभेला त्यांच्या विरोधात निवडणूक लढविणारे होते ते देखील त्यांच्याकडे एक मंत्री म्हणून समस्या घेऊन येतात आणि बावनकुळे त्या तेथल्या तेथे सोडवून मोकळे होतात म्हणजे उद्या जर एकाचवेळी त्यांच्याकडे अमुक एखाद्या कामासाठी गिरीश महाजन आणि एकनाथ खडसे हे एकमेकांचे कट्टर विरोधक आले तर बावनकुळे दोघांचीही कामे करून मोकळे होतील, चावट भाषेत किंवा गिरीश महाजनांना आवडणाऱ्या भाषेत सांगायचे झाल्यास, बावनकुळे एकाचवेळी खडसेंना मिठीत घेतील आणि महाजनांना मांडीवर बसवून मोकळे होतील...

एक बरे आहे कि माननीय मुख्यमंत्री आणि अर्थमंत्र्यांना विजेमधले सारे काही कळते, त्यामुळे बावनकुळे यांच्या ऊर्जा मंत्री म्हणून अमुक एखाद्या प्रस्तावावर त्यांदोघांचे एकाचवेळी एकमत होऊन ते यांना पुढे जा, सांगतात किंवा अलीकडे झालेली वीज दरवाढ त्यातलाच एक प्रकार, बसता उठता आघाडी सरकारला बेदम ठोकणार्या मंडळींनी देखील वीज दरवाढीवर फारशी बोंब ठोकली नाही कारण वीजदरवाढ आवश्यक होती, वीजखात्याला वाचविणारी होती. एक मात्र नक्की विशेषतः गरीब शेतकऱ्यांना शाश्वत व सुलभ दराने वीज देणे हे बावनकुळे यांच्यासमोर मोठे आव्हान होते ते त्यांनी लीलया पेलले आहे, नक्की दिसते. केवळ रात्री नव्हे तर शेतकऱ्यांना दिवसा देखील वीज मिळायलाच हवी, बावनकुळे यांचे ते स्वप्न बऱ्यापैकी पूर्ततेकडे वाटचाल करून आहे, त्यासाठी सौर उर्जेवर त्यांचा भर आहे, अमेरिकेसारखे इकडेही लवकरच घडेल, बावनकुळेंना विश्वास आहे म्हणजे घराघरांवर सौर ऊर्जेचे उपकरण, त्यांचे हे स्वप्न नक्की पूर्ण होईल. एक समस्या मात्र आजही अतिशय गंभीर आहे येथे या राज्यात मोठ्या प्रमाणावर विजेची चोरी केल्या जाते आणि विजेची गळती देखील फार मोठ्या प्रमाणावर होते, त्यांनी यावर बऱ्यापैकी नियंत्रण आणले आहे पण ते आजही अद्याप अपुरे आहे, बावनकुळे यांनी आणखी कठोर पावले उचलणे गरजेचे आहे त्यातून वारंवार मग विजेची दरवाढ सर्वसामान्यांना सोसावी लागणार नाही....

विजेच्या दरवाढीचे समर्थन त्यावर नागपूरचे पत्रकार गजानन निमदेव यांनी जे नेमके विश्लेषण केलेले आहे, ते ' ऑफ द रेकॉर्ड ' पुढल्या अंकात नक्की वाचा, तुमचे त्यावर नेमके काय म्हणणे आहे तेही आम्हाला कळवायला विसरू नका..
तूर्त एवढेच.

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment