Friday, 29 June 2018

आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी


आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी 
चुका नक्की होतात मग टीकाही होते, पण न थांबता पुढे पुढे जायचे असते. संपूर्ण बुलडाणा जिल्ह्यात चांगले काही घडले असे क्वचित घडते, नेते फारसे कामाचे नाहीत, त्यांना काहीतरी उभे करून त्यातून काही खायचे, हे न पटणारे त्यामुळे योजनेसाठी पैसे आले कि आधीच फस्त, गिळंकृत केल्या जातात. अलीकडे नाही म्हणायला माझ्या मूळ गावी म्हणजे जळगाव जामोदला तेथल्या आमदाराने डॉ. संजय कुटे यांनी मुख्यमंत्री त्यांना खूपच जवळचे असल्याने गावातल्या विकास कामांसाठी मोठा निधी खेचून आणला, गावाचे सुशोभीकरण केले, म्हणजे गावावर तो निधी खर्च करून, चांगला आकार आमच्या गावाला देण्याचा माझ्या आठवणीत पहिल्यांदाच प्रयत्न झाला, त्यांनी चांगले काम केले, पण काहींना ते खुपले नसावे, त्यांनी डॉ. कुटे आणि कंपूने पैसे कसे खाल्ले, काही कागदपत्रे मला आणून दिली, मी ती अडगळीत ठेवून दिलीत, आधीचे नेते देखील निधी आणायचे पण श्रीमंत स्वतः व्हायचे, डॉ कुटे यांनी निदान ते तसे तर केले नाही, चुका होत असतात, डॉ. कुटे संत तुकाराम आहेत माझे म्हणणे नाही, तळे राखी तो पाणी चाखी, तळे तयार करून थोडेसे पाणी चाखले तर लोकांचे मतदारांचे काहीही म्हणणे नसते, म्हणून कुटे यांच्या ' असतीलच चुका ' तर त्याकडे दुर्लक्ष करणे आवश्यक होते. ते उत्साही असल्याने मंत्री मंडळ विस्तार 
झालाच तर फडणवीसांचे हे विश्वासू नक्की शपथ घेणार आहेत...

एखाद्या बाईला दिवस गेले आहेत असे उगाचच अनेकांना वाटत राहते पण तसे अजिबात नसते हवा भरल्याने म्हणजे वातामुळे ते तसे वाटत राहते, दिवस गेलेले नाहीत कळले कि कुजकी माणसे म्हणतातही, हिच्या नवऱ्याचे चाकात हवा भरायचे दुकान आहे वाटते. मंत्रिमंडळ विस्ताराचे देखील तसेच आहे, पॉट फुगलेल्या पण दिवस न गेलेल्या बाईसारखे, म्हणजे उगाचच सर्वांना विशेषतः मीडियाला प्रामुख्याने कायम वाटत राहते, पुढल्या काही दिवसात मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्तार आहे, पण गेले तीन वर्षे मंत्रिमंडळ फेरबदल आणि विस्ताराचे काहीही झालेले नाही, बातम्या मात्र अमाप, त्या पोट फुगलेल्या बाईसारख्या....

बुलडाणा अर्बन पतसंस्थेचे विविध क्षेत्रात मोठे योगदान आहे, मग कधी तरी नाही म्हणायला चुका हातून घडतातही पण त्यातून काही अघटित घडेल, पतसंस्थेची ' रुपी बँक ' होईल, असे अजिबात होणार नाही, ग्राहक खड्ड्यात जाणार नाही, फसविल्या जाणार नाही याची सारे संचालक व दस्तुरखुद्द भाईजी डोळ्यात तेल घालून काळजी घेतात. एखादी पतसंस्था सामाजिक उपक्रमात किती पुढे राहून काम करू शकते याचे या देशातलेसर्वोत्कृष्ट उदाहरण म्हणजे बुलडाणा अर्बन, हि मंडळी नसती तर भाकड गाई सर्हास कापल्या गेल्या असत्या, त्यांनी केलेले गोरक्षण नक्की कौतुक करण्यासारखे आणि पहाडावर वसलेल्या बुलडाणा परिसरात त्यांचे वृक्ष रोपण व संवर्धन, वा रे वा...

भक्तीची श्रेष्ठ परंपरा लाभलेल्या हिंदुस्थानची आराध्य दैवते म्हणजे तिरुपती, माहूर, ओंकारेश्वर इत्यादी, अनेक राज्यातून हि दैवते वसलेली आहेत. महाराष्ट्रातील भाविक याठिकाणी अनेकदा दर्शनासाठी जातात. त्यांची राहण्याची उत्तम सोया व्हावी या हेतूने बुलडाणा अर्बन च्या माध्यमातून या सर्व ठिकाणी भक्त निवास उभारलेले आहेत. अत्यंत महत्वाचे म्हणजे भावी पिढीचा पाया भरभक्कम होतो तो अनौपचारिक आणि औपचारिक शिक्षणामुळे. अनौपचारिक शिक्षण तर जन्मापासून प्रत्येकाला लाभत असते. मात्र बुलडाणा अर्बन ने बुलडाणा जिल्ह्यातील मुलांच्या शिक्षणाची सोय केली आहे ती संस्थेच्या सहकार विद्यामंदिराच्या तब्बल १९ शाळांमधून. जागतिक स्तरावरचे नेमके ज्ञान मिळवण्याच्या दृष्टीने या साऱ्या दर्जेदार शाळा इंग्रजी माध्यमातून चालविल्या जातात. हो, आता माझ्या मागास जिल्ह्यातही पश्चिमेकडची पहाट उजाडली आहे. भारतभरातून या शाळांमध्ये आलेले, ज्ञानदानाचे उत्तम काम करणारे शिक्षक, आणि त्यांचे भरीव कार्य, तोंडातून भाईजींसाठी नक्की दुवा बाहेर पडतात...
अपूर्ण :


आमची बँक ३ : पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment