Monday, 5 March 2018

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी


वृत्तपत्रांचा मृत्युलेख ५ : पत्रकार हेमंत जोशी 
राऊत तुमचे काहीही...म्हणे राज्य सरकारने आपली वैयक्तीक मालमत्ता समजून ७०० वृत्तपत्रांचा गळा घोटण्याचे काम केले आहे. साफ चूक, असे कोणीही करू शकत नाही, वृत्तपत्रांवर राज्य सरकारने अजिबात बंदी आणलेली नाही फक्त सरकारच्या पर्यायाने जनतेच्या खिशातून जे तद्दन भामटे भंकस फसवे आणि लिखाणात कवडीचेही ज्ञान नसलेले जे पत्रकार वर्षानुवर्षे माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना लाच देऊन शासकीय जाहिरातींच्या माध्यमातून कायम लुटत होते ते या सरकारने रोखले आहे, ज्यांची वृत्तपत्रे चांगली, त्यांच्या जाहिराती कोणीही कधीही थांबवणार नाही, थांबवू शकणार नाही. विशेष म्हणजे केवळ बोगस वृत्तपत्रांच्या जाहिराती बंद केल्यानंतर म्हणजे या तमाम बोगस मंडळींना रोखल्यानंतर हे पत्रकार युतीला किंवा भाजपाला असहकार करतील आणि त्याचा विपरीत परिणाम येणाऱ्या निवडणुकांवर होईल, असे अजिबात होणार 
नाही घडणार नाही, कावळ्याच्या शापाने गाय मारत नसते. या अशा वृत्तपत्रांची पाने देखील न उलटणारे वाचक आहेत उलट जे झाले ते योग्य घडले, जे ते, सारेच म्हणतील....

शासकीय जाहिराती घेणाऱ्यांच्या बहुसंख्य बोगस वृत्तपत्रातून छापण्यात येणाऱ्या बातम्या मनोरंजक असतात, स्थानिक प्रश्नांवर लेख किंवा बातम्या नव्हेत तर दिल्लीच्या किंवा जगभरातल्या विस्कळीत पेस्ट केलेल्या बातम्या वाचून मनोरंजन तर होतेच पण अनेकदा असे वाटते, सारे केंद्रीय मंत्री यांच्या खिशात असतील आणि नरेंद्र मोदींकडे यांची नेहमीची उठबैस असेल. तळपायाची आग मस्तकात पोहोचविणारी हि शासनाच्या तिजोरीवर दरोडा घालणारी वृत्तपत्रे, एखाद्या सरकारचा बाल देखील यांच्यामुळे बाका होणे अशक्य आहे. कधीतरी एकदम पाच सहा वृत्तपत्रे काढायची किंवा न काढता माहिती आणि जनसंपर्क खात्यात काम करणाऱ्यांना संबंधित मंडळींना २० टक्के कमिशन देऊन जाहिरातीची मोठी रक्कम पदरात पडून घ्यायची, हि असली वृत्तपत्रे जेवढ्या लवकर लोकांपासून दूर जातील तेवढे या लोकशाहीला चांगले. शासकीय जाहिराती मिळविण्यासाठी सुरुवातीला संबंधित मंडळींना आत घुसण्यासाठी संबंधित शासकीय मंडळींना लाख दोन लाख रुपये लाच द्यायची तदनंतर पिढ्यान पिढ्या सतत सरकारला लुटणारे हे असे बोगस पत्रकार या राज्याच्या भल्यासाठी अजिबात उपयोगाचे नाहीत आणि संजय राऊत यांनी बोगस पत्रकारांची केवळ द्वेषासाठी द्वेष या शिवसेनेच्या नेहमीच्या भूमिकेतून अशांची बाजू देखील घेऊ नये. विशेष म्हणजे राऊतांनीच लिहून ठेवले आहे कि हि वृत्तपत्रे सरकारी जाहिरातीचे आश्रित होते व फार मोठे दिवे पाजळत होते असेही नाही...मग राऊतांनी या अशा लूटपाट करणाऱ्या पत्रकारांची वृत्तपत्रांची बाजू घेणे म्हणजे निठारी हत्याकांडाचे वकीलपत्र घेण्यासारखे चुकीचे आहे. चांगले लिखाण करून योग्य बातम्या देऊन समाजसेवेचे व्रत हाती घेतलेल्यांना त्यांच्या व्यवसायात मरण येणे अशक्य आहे, अशा पत्रकारांच्या वृत्तपत्रांच्या पाठीशी दानशूर मंडळी नक्की उभे राहतात, त्यांना पुढे जाण्यासाठी आर्थिक मदत कायम करतात, असा माझा स्वतःचा अनुभव आहे, चांगले काम करणाऱ्यांना कशाचीही कमी पडत नसते....

गम्मतच आहे, राऊतांनी म्हटले आहे, या वृत्तपत्रांकडून कदाचित समाजप्रबोधनाचे मोठे काम होत नसेल व त्यातील अनेकजण राजकारण्यांच्या ताटाखालचे मांजरेही बनली असतील, तरीही हि वृत्तपत्रे मरु नयेत....उद्या हि अशी, समाजात खंडणी घेणाऱ्यांची बाजु राऊत घेतील कि काय, आता वाटू लागलेले आहे. अरे, काहीही छापायचे आणि शासनाने अर्थहीन कामांसाठी भरमसाठ वर्षानुवर्षे पैसे मोजायचे, राऊत तुम्ही कोणाची बाजू घेताय, अक्षरश: ओकारी यावी एवढी पातळी सोडून हि अशी तमाम वृत्तपत्रे निघतात, छापल्या जातात आणि जनतेला सतत लुटून मोकळे होतात. वाचकांनो, तुम्हाला हे माहित आहे का कि मुंबईतील जेमतेम खप असलेले दैनिक नवशक्ती पण या दैनिकात छापून येणाऱ्या विविध शासकीय कार्यालयातील मोठमोठ्या जाहिराती, मला न उलगडलेले एक कोडे आहे, काय असावे बरे हे गौडबंगाल म्हणजे जी दैनिके अजिबात किंवा फारशी वाचली जात नाहीत अशा वृत्तपत्रातूनच शासकीय टेंडर्स किंवा जाहिराती छापून आणणारे एखादे रॅकेट त्या माहिती आणि जनसंपर्क कार्यालयात कित्येक वर्षांपासून काम करते आहे कि काय...


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment