Friday, 16 March 2018

व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी


व्यक्ती आणि वल्ली २ : पत्रकार हेमंत जोशी 
अलीकडेच वाचण्यात आलेल्या एक झक्कास किस्स्याने पुढल्या लिखाणाला 
सुरुवात करतो...पुण्यातल्या गोखले आजोबांचा शतकमहोत्सवी वाढदिवस होता, केक कापला, टाळ्या झाल्या, सगळे हॅपी झाले, पण आजोबांच्या शतकाचे गूढ नेमके काय, सगळ्यांना हवे होते, आपल्या पंचाण्णव वर्षांच्या पत्नीची अनुज्ञा घेऊन आजोबा सांगू लागले, माझ्या पंचविसाव्या वर्षी आमचे लग्न झाले. लग्नानंतर मी आणि बायको बाहेर पडलो, वेगळे राहू लागलो. आमचीही तुमच्यासारखीच भांडणे होऊ लागली. भांडणाला कंटाळून आम्ही एक निर्णय घेतला. ज्याची चूक असेल त्याने घराबाहेर पडायचे व पाच किमी चालून परत यायचे. तेव्हापासून मी दररोज पाच किमी चालत आलो आहे. माझ्या उत्तम तब्बेतीचे हेच रहस्य, गुपित आहे...अहो पण आजी देखील स्लिम निरोगी ठणठणीत आहे त्याचे काय? आजोबांना विचारल्यावर ते पुढे सांगू लागले, हे पहा, माझ्यावर विश्वास नसणे हेच तर आम्हा दोघांतल्या भांडणाचे कारण होते, कारण असे. मी पाच किमी जातो कि वाटेत हॉटेलात जातो हे पाहण्यासाठी हि सुद्धा माझ्या पाठोपाठ येत असे, त्यामुळे तिचीही तब्येत उत्तम आहे, ठणठणीत आहे...

सेना भाजपा युतीचे सरकार आणि गोखलेदाम्पत्य या दोघात खूपच साम्य आहे, दोघांचा विशेषतः उद्धव ठाकरे यांचा फडणवीस किंवा भाजपातल्या अख्ख्या मंत्र्यावर विश्वास नसल्याने उद्धव यांची ' गोखले आजी ' आणि देवेंद्र फडणवीस यांचा ' गोखले आजोबा ' झाला आहे, म्हणूनच दोघांचे उत्तम चालले आहे, हे गोखल्यांसारखे निरोगी सरकार असल्याने त्या दोघात काहीही होणार नाही, युती तुटणार नाही आणि निदान हि पंचवार्षिक योजना संपेपर्यंत तरी फडणवीस सरकार गडगडणार नाही, समजा गोखले आजोबांना जे त्यांच्या आप्तांनी विचारले, ते तसे पवारांच्या आघाडीने विचारले तर उद्धव आणि फडणवीस हेच म्हणतील, आमचे गोखले दाम्पत्यासारखे....त्यामुळे उत्तम चालले आहे, उद्धव हे गोखले आजीच्या भूमिकेत आणि माझे गोखले आजोबांसारखे हुबेहूब, त्यामुळेच आमचे युती सरकार दीर्घायुषी ठरले आहे, इतरांना काळजी नसावी...

व्यक्ती आणि वल्ली मथळ्याखाली मला संपत आलेली पंचवार्षिक योजना जेव्हा सुरु झाली तेव्हाच त्या तिघांविषयी नेमके काय घडते, अगदी जवळून बघायचे होते कारण त्या तिघांचेही राजकीय बळ, राजकीय भवितव्य यावेळी बदलणारे असेल, मला वाटलेच होते, तसेही ते तिघे तरुण नेते मला मनापासून आवडणारे, अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि धनंजय मुंडे हे ते तिघे, याठिकाणी हे तिघे नेमके कसे किंवा या पंचवार्षिक योजनेत म्हणजे युती सरकार सत्तेत आल्यानंतर आणि अजित पवार व धनंजय मुंडे विरोधी बाकावर बसल्यानंतर त्यांचे काय झाले, त्यावर काही सांगायचे आहे, लिहायचे आहे, काही महत्वाचे पुरावे सांगायचे मांडायचे आहेत...

गोखले आजी म्हणजे ठाकरेजिंचे हे असे सतत संशयाने बघणे व वागणेही, त्यातून फडणवीस चालताहेत चालताहेत, एवढे काम करताहेत कि त्यांचा नागपुरातील मित्र मला सांगत होता कि त्याने अलीकडे कुठलेसे काम होते म्हणून फडणवीसांना मेसेज केला त्यांनी त्यावर त्याला रात्री अडीच वाजता उत्तर दिले. नंतर या मित्राने पुन्हा सकाळी सात वाजता मुख्यमंत्र्यांना मेसेज केला, त्याला लगेचच साडेसात वाजता पुन्हा उत्तरही आले, तो म्हणाला फडणवीसांचे नेहमीचेच हे असे,जेव्हा केव्हा त्यांच्यावर मोठी जबाबदारी असते, हे महाशय फारतर चार तास झोप घेतात आणि उठले कि लगेच नेहमीच्या उत्साहात कामाला लागतात....

परफेक्ट जन्मवेळ आणि त्याआधारे अभ्यास असल्याने तयार केलेली कुंडली, भारतीयांच्या या ज्योतिष शास्त्रावर माझा अतिशय विश्वास आहे. राशी स्वभाव हे या नेमक्या कुंडलीतूनच योग्य पद्धतीने नक्की सांगितल्या जाते, थापाडे उपाध्ये म्हणजे राशी शास्त्र असा मात्र तुम्ही उगाचच समज करवून घेऊ नका, उपाध्येपलीकडे कितीतरी अभ्यासू चांगली माणसे या क्षेत्रात आहेत. मध्यंतरी प्रकाश बापट यांनी काही छान लिहून पाठविले होते, त्यांच्या मते, देवेंद्र फडणवीस यांना गुरुचे पाठबळ असावे, त्यांचा गुरु प्रबळ असावा कारण या साडेतीन वर्षांच्या कालखंडात फडणवीसांना सर्वांनी मिळून जेवढे अडचणीत आणण्याचे प्रयत्न केले याआधीच्या कोणत्याही मुख्यमंत्र्यांच्या बाबतीत एवढे घडले नाही अगदी पंतांच्या किंवा दिवंगत सुधाकरराव नाईकांच्या बाबतीतही विशेषतः त्यांची अति भयावह कोंडी करण्याचे काम जसे विरोधकांकडून झाले किंवा होते आहे त्यात अनेकदा शिवसेनेने, कुटुंब सदस्यांनी, स्वकीयांनीही हातभार लावल्याचे स्पष्ट चित्र दिसते. उद्धव ठाकरे आणि जाणते राजे हे तर एकही संधी न सोडलेले, प्रत्येक वेळी असे वाटते, यावेळी देवेन्द्रजी अडचणीत येतील, राजीनामा देतील किंवा राजीनामा घेतल्या जाईल...

शेतकऱ्यांची कर्जमाफी असो कि मराठ्यांचे मोर्चे आणि मेळावे, भीमा कोरेगाव प्रकरण असो कि बहुतेक मंत्र्यांचे अत्यंत बेशिस्त व भ्रष्ट आचरण किंवा लाल बावट्याचा परवाचा मोर्चा, असे वाटते दरदिवशी कोणतीतरी शक्ती हे घडवून आणते आहे, आगीत तेल ओतते आहे, आणि हे काम या राज्यात कोणाला मस्त जमते, तुम्हाला माहित आहे. ते मुख्यमंत्री झाल्यापासून त्या हेलिकॅफ्टर्सनी देखील त्यांना सोडले नाही, हे बसले कि ते शिवसेनेसारखे भरकटते. तेथेही मुख्यमंत्री सहीसलामत बाहेर पडतात, फारतर असे म्हणता येईल कि परमेश्वर पाठीशी आणि त्यांचे जनतेच्या सतत भल्यासाठी काम करणारे हात, फडणवीसांना हेच आशीर्वाद वाचवताहेत किंवा त्यांच्या कुंडलीत गुरुचे पाठबळ असावे, ब्राम्हणेतर त्यांना पेशवे म्हणून सारखे चिडवतात, हा पेशवा साऱ्यांना अद्याप तरी पुरून उरतोय....
क्रमश:

पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment