Sunday, 4 March 2018

वृत्तपत्रांचा मृत्युलेख ४ : पत्रकार हेमंत जोशी


वृत्तपत्रांचा मृत्युलेख ४ : पत्रकार हेमंत जोशी 
मुख्यमंत्री महोदय,ऐकणार असाल तर एक काम करा, सामना च्या संजय राऊत यांच्या अध्यक्षतेखाली आणि बोगस नसलेले त्यांच्याच पसंतीचे सदस्य निवडून एक समिती नेमा आणि जी वृत्तपत्रे बोगस नाहीत, उत्तमरित्या चालविली जाताहेत, राऊतांची समिती पुराव्यांसहित सिद्ध करेल कृपया अशा वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिराती बंद न करता उलट या वृत्तपत्रांच्या शासकीय जाहिरातींचे दर वाढवून द्या, त्यांना मुबलक जाहिराती मिळतील असे नक्की काहीतरी करा, राम शेवडीकर, कैलास म्हापदी सारख्यांची वृत्तपत्रे जगायलाच हवीत अन्यथा आम्हीही त्यांच्या जगण्यासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरून आंदोलने करू. धडपडणारी खरी पत्रकारिता जगायलाच हवी, वृत्तपत्रे म्हणजे केवळ शेटजी मंडळींची मोनोपली असे या राज्यात घडायला नको. श्रीमान संजयजी, मी म्हणतो, ते मान्य असेल म्हणजे सच्चा वृत्तपत्रांची जर हे सरकार गळचेपी करणार असेल तर केवळ तुमचे ते लिखाण पुरेसे ठरणार नाही, तुम्ही आणि तुमच्या पक्षाने प्रसंगी आंदोलन करायला छेडायला हवे....

बंद करण्यात येणारे अनेक वृत्तपत्रे आणि त्यांचे मालक संपादक अक्षरश: लुटारू, चीटर, शासनाला गेल्या कित्येक वर्षांपासून फसवत आलेले आहे त्यामुळे जे बदनाम आणि बदमाश ते बंद होणे किंवा त्यांच्या शासकीय जाहिराती बंद करणे त्यावर उत्तम उपाय आहे. शिक्षण आणि वर्तमानपत्रे याचा एकमेकांशी अजिबात संबंध नाही, लिहिणारी चांगली माणसे भेटतात फक्त वर्तमानपत्र चालविण्याची मनापासून तळमळ पाहिजे, त्यावर मुंबईत पाच सहा दैनिके एकाचवेळी यशस्वी काढणारे, करणारे मुरलीधर शिंगोटे व त्यांच्या विविध बायकांची मुले उत्तम उदाहरण आहे. एकेकाळी दरदिवशी तब्बल सहा लाख नवाकाळ विकणार्या अंगुठाछाप विक्रेते मुरलीधर शिंगोटे यांचे नीलकंठ खाडिलकर यांच्याशी यासाठी बिनसले कि, कालनिर्णय च्या साळगावकर कुटुंबीयांनी ' कालनिर्णय वर्तमान ' हे दैनिक काढले आणि नवाकाळच्या स्पर्धेत उतरण्यासाठी त्यांनी ते एक रुपयात 
विकण्याचे ठरविले आणि विकण्याचे हक्क वृत्तपत्र विक्रेते मुरलीधर शिंगोटे यांना दिले..

इकडे खाडिलकर त्यातून शिंगोटे यांच्यावर रुसले आणि तुम्ही साळगावकर यांचे वर्तमानपत्र विकणार असाल तर आजपासून नवाकाळ तुमच्याकडे मी पाठविणार नाही, आणि तेच घडले, शिंगोटे यांचे अधिकार खाडिलकरांनी अगदी तडकाफडकी काढून घेतले, शिंगोटे यांच्या तब्बल 100 माणसांवर त्यातून नोकरीची गदा येणार होती त्यामुळे अशिक्षित शिंगोटे यांनी मुंबई चौफेर, मुंबई वर्तमान इत्यादी विविध भाषेतली पाच सहा वृत्तपत्रे सुरु केली आणि बघता बघता शिंगोटे यांच्या वृत्तपत्रांचा खप प्रचंड वाढला आणि निळूभाऊ ५० हजार प्रतींवर आले ते कायमचेच. मोठे वृत्तपत्र विक्रेते एखाद्याला घडवू शकतात आणि मोठ्यांना संपविणे देखील त्यांच्या हाती असते....

थोडक्यात, जेथे इच्छा असते तेथे मार्ग सापडतो. सांगण्याचा उद्देश हा कि या राज्यात विविध भागात वृत्तपत्रे काढणारे कदाचित माझ्यासारखे फारसे शिकलेले नसतील पण मेहनतीतून जर त्यांनी दर्जेदार वर्तमानपत्रे मोठ्या जिद्दीने सुरु ठेवले असतील तर त्यांच्यावर संक्रांत येणार नाही याची मात्र या सरकारने डोळ्यात तेल घालून काळजी घ्यावी, अशांना जिवंत ठेवावे आणि ज्यांना वर्तमानपत्रे न काढता वर्षानुवर्षे माहिती आणि जनसंपर्क विभागातील काही कर्मचाऱ्यांना, अधिकाऱ्यांना हाताशी धरून लुटले लुबाडले असेल त्यांना शासनाची घोर फसवणूक केली म्हणून योग्य शिक्षा मिळेल हेही बघितले पाहिजे. हे लफडे नेमके कसे त्यावर माहितीच्या अधिकारात माहिती घेणे गरजेचे आहे...
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment