Monday, 22 January 2018

अकोल्यातील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी


अकोल्यातील रणजीत पाटील : पत्रकार हेमंत जोशी 
आम्ही भारतीय कसे बावळट हे आपणहून जगाला दाखवून देत असतो. तुम्ही आम्ही जे अनेकदा करतो अनुभवतो तेच येथे सांगतो. मला एक सांगा, विमानातून उतरल्यानंतर विमानतळावरील संडासमध्ये बसल्यानंतर काय गरज आहे तेथून बायकोशी, प्रेयसीशी, घरच्यांशी बोलण्याची. बाहेर पडायला फारतर पुढले १०-१५ मिनिटे लागतात, आपल्याला तेवढाही धीर धरवत नाही, आपण भ्रमणध्वनीवरून तेही मोठ्यांदा बोलत सुटतो आणि तेही वाट्टेल ते, एकतर विमानतळावरचे किंवा सारेच सार्वजनिक शौचालये एकमेकांना बिलगून बांधलेले असल्याने तुमचे तसेही गुदद्वारातून विविध निघणारे आवाज शेजारी बसलेल्यांना बेजार करणारे असतात, अनेकदा त्याचे रूपांतर स्पर्धेतही होते, कोणाचा आवाज अधिक मोठा, अशी ती स्पर्धा असते पण जेव्हा केव्हा भारतीय, परदेशातल्या शौचालयात हे असे भ्रमणध्वनीवरून बोलतात, नाचक्की होते...मी घरी येतोय, गरम गरम भजी कर. आलोच घरी पलंगावरची चादर बदलवून घे, पिंकीचा अभ्यास घेतला का. चल, दारू पिने बैठते है. एक पप्पी दे कि. चिकन बनव. देवाची पूजा झाली का. लग्नातले जेवण मस्त होते. मी काल पिठल्यावर ताव मारला, आईने तुला पुरणाच्या पोळ्या दिल्या आहेत. असे एक ना अनेक वाक्ये आम्ही अधीर भारतीय, काहीसे आजही अडाणी भारतीय त्या सार्वजनिक संडासातून हमखास बोलत सुटतो. त्यामुळे इज्जतीचा भाजीपाला होतो, किमान मराठी लोकांनी तरी हे असे सार्वजनिक संडासातून बोलणे टाळावे,संडासातून बाहेर पडल्यानंतर वाट्टेल ते बोलत सुटावे...

मूळ विषयाकडे वळतो, अकोल्यातले राजकारण हा येथे विषय आहे आणि भाजपा श्रेष्ठींनी वेळीच दाखल घेतली नाही तर ठाणे जिल्ह्यात एकेकाळी अतिशय टॉपवर पोहोचलेल्या राष्ट्रवादी पक्षाची जी वाताहत झाली ते तसेच उद्या भाजपाच्या बाबतीत अकोल्यातही घडेल, मिळालेले यश त्यांच्यापासून दुरावेल, फायदा प्रकाश आंबेडकरआणि काँग्रेसला देखील होईल...अकोल्यातल्या भाजपाचे माझ्यासारखे झाले आहे म्हणजे एका जमान्यात माझे वयाने मोठ्या असलेल्या हेलनवर खूप प्रेम होते, पण तिने कधी ढुंकूनही मजकडे बघितले नाही, ऑन स्क्रीन सुद्धा ती एखाद्या खलनायकाला किंवा हिरोला डोळा मारायची पण मला कधीही नाही...ते तसेच काहीसे रणजीत पाटलांचे झाले आहे म्हणजे त्यांना अगदी मनापासून वाटते आमदार रणधीर सावरकर किंवा आमदार गोवर्धन शर्मा किंवा आमदार संजय धोत्रे यांना जाऊन बिलगावे, घट्ट मिठीत घ्यावे, पण हे सारे आजही एकतर्फी, गोवर्धन शर्मा हे धोत्रे पोहरे किंवा सावरकरांच्या इशाऱ्यावरून रणजीत पाटलांपासून दूर आहेत कारण शर्मा यांचे ते निवडणुकीतले मतदानाचे गणित आहे, अकोला शहरात अकोला तालुक्यात अकोला जिल्ह्यात तसे मतदारांमध्ये खासदार धोत्रे समर्थक मोठ्या प्रमाणावर असल्याने भलेही रणजीत पाटील सत्तेत असलेत, राज्यमंत्री असलेत तरी नेते म्हणून अधिक महत्व नक्कीच विदर्भातील अकोल्यात आजही धोत्रे गटाकडे आहे आणि येथेच धोत्रे आणि समर्थक मुख्यमंत्र्यांवर यासाठी नाराज आहेत कि त्यांचे वर्चस्व असूनही मंत्रिपद त्यांच्याकडे चालून आले नाही आणि नेमके हेच नाराजीचे उघड कारण आहे जी नाराजी रणजीत पाटलांना सतत कायम एखाद्या खाष्ट दुष्ट सासूसारखी भोवत आली आहे, भोवते आहे. 

प्रतुल हातवळणे हे अकोला शहरातील भाजपामधले एक प्रस्थ आहे, ते शहराध्यक्ष होते किंवा त्यांच्या पत्नी महापौर होत्या, राजकीय दृष्ट्या प्रभावी असलेल्या धोत्रे गटाची प्रसंगी नाराजी ओढवून हातवळणे यांचे अगदी उघड दोन्हीकडे जाणे होते, जाणे आहे पण अलीकडे विधान परिषदेवर रणजीत पाटील निवडून गेल्यानंतर ज्या हातवळणे यांनी प्रचाराची धुरा समर्थपणे सांभाळून रणजीत पाटलांना निवडून आणण्यात महत्वाची भूमिका बजावली होती, निकालानंतर मात्र याच राज्यमंत्र्यांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली, असे दिसते आहे, घडले आहे. असे का घडले म्हणजे राज्यमंत्री गरज सरो वैद्य मरो पद्धतीने वागताहेत कि प्रतुल यांचे काही व्यवहार त्यांना भोवले, नेमके अद्याप स्पष्ट झालेले नाही. पण प्रतुलही जर पाटलांपासून दूर गेलेत तर मात्र पाटलांना स्थानिक राजकारण काहीसे जड जाईल, असे दिसते आहे....

राज्यमंत्री म्हणून अतिशय प्रभावी ठरलेले रणजीत पाटील, त्यांच्या या लोकप्रिय होण्याने एक मात्र नक्की, त्यांचे स्थानिक पातळीवर खच्चीकरण करणे, तेवढे एकच काम जणूकाही त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांना उरले आहे, असे उघड चित्र तेथे निर्माण झाले आहे. साऱ्या पाटलांनी हातात हात घट्ट पकडून भाजपा वाढविण्यापेक्षा, भाऊबंदकीला जणू प्राधान्य देऊन भाजपाचे अकोला जिल्ह्यात वाटोळे करणे वेगाने सुरु केले आहे, मोठा फायदा त्यातून नक्कीच काँग्रेस, आंबेडकर किंवा शिवसेनेला होईल, हे नक्की आहे....

अकोल्यात प्रकाश पोहरे हे एक मोठे प्रस्थ आहे, दैनिक लोकमत ला तशी स्पर्धा निर्माण केली ती पोहरे यांच्या देशोन्नती या दैनिकाने. मध्यंतरी पोहरे बाप लेकात फारसे पटत नसल्याने हे वृत्तपत्र रसातळाला जाईल, अशी अफवा म्हणे लोकमत परिवाराकडून पसरविल्या गेली होती, तरीही देशोन्नती अद्याप सुरु आहे, खप देखील चांगला आहे, या जिल्ह्यतले ते प्रभावी दैनिक आहे आणि नेमके पोहरे हे धोत्रे परिवाराचे मित्र आणि आप्तेष्ट असल्याने तेथेही रणजीत पाटलांना प्रसिद्धी माध्यमांकडून फारसे सहकार्य होत नाही, अशी ओरड आहे. चहूबाजूंनी आपल्याच पक्षातल्या राज्यमंत्र्यांची अशी ज्येष्ठ श्रेष्ठ नेत्यांकडून होणारी सततची कोंडी, हे योग्य नाही....
क्रमश:


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment