Monday, 27 November 2017

पाटणकरांचा स्वर्गवास : पत्रकार हेमंत जोशी

पाटणकरांचा स्वर्गवास : पत्रकार हेमंत जोशी 
काल संपूर्ण ३३ कोटी देवांना हात जोडून म्हणालो, मला तुमच्याकडून काहीही नको, फक्त एक एक रुपया हवा आणि २५ नोव्हेंबरला आमचे अरुण पाटणकर तुमच्याकडे आले आहेत, त्यांची तेवढी काळजी घ्या. वाचकहो, नेमके कोणत्या अँगल मधून तुम्हाला, चुकून आठवत नसेल तर अरुण पाटणकर कोण होते कसे होते काय होते, सांगू, नेमके येथे मला सुचत नाही, त्यांच्याविषयी खूप काही सांगता सांगता राहून गेले तर स्वर्गातूनही त्यांचा मला नक्की नेहमीप्रमाणे फोन येईल, हेमंतराव, तुमचा अंक हातात पडला, अख्खा एका दमात वाचून काढला, तुमचे आमच्या अमुक मुद्द्यावर लिहिणे राहून गेले. आणखी एक सांगायचे आहे, आमच्या बाबाकडे लक्ष ठेवा बरं...त्याच्याशी बोलत चला...

बाबा म्हणजे अभिजित पाटणकर, अरुण पाटणकरांचे चिरंजीव, आयकर खात्याचे आयुक्त असूनही अतिशय जमिनीवर, एरवी देव माणूस पण खुर्चीवर बसलेत कि समोर कोणीही असो, अतिशय कठोर निर्णय घेणारे. सहज शक्य असूनही, पगार एके पगार, नको त्या पैशांकडे ढुंकूनही न बघणारे, न शिवणारे. अरुणभाईंना अभिजितची मोठी काळजी, त्यांचे तसे घरातल्या साऱ्यांवर अतिशय प्रेम, वयाच्या आठव्या दशकाला टेकलेले ते दोघेही म्हणजे विजयाताई आणि अरुणभाई दोघेही, पण त्या दोघांशी गप्पा मारतांना असे वाटायचे त्यांचे लग्न कालच झाले आहे, एकमेकांवर जीवापाड प्रेम आणि ताईंची या वयातही थट्टा करण्याची अरुणभाईंची मनमुराद पद्धत, तसेही पाटणकर म्हैसकर कुटुंबाशी गप्पा मारतांना वेळ कसा निघून जातो, काळत नाही, फक्त त्या मनीषाताईशी बोलतांना जीभ अतिशय सांभाळावी लागते, त्यांना अमुक एखाद्या मुद्द्यावर न पटलेली भूमिका, पुढचे सांगत नाही, एवढेच सांगतो, त्या त्यांच्या आईसारख्या प्राध्यापिका व्हायला हव्या होत्या. प्राध्यापक, प्राचार्य, शिक्षक, मुख्याध्यापक कसे खडूस असतात ना, पण एक बरे आहे, तेथल्या तेथे त्या बोलून मोकळ्या होतात, मनात ठेवत नाहीत. पण विजयाताई मात्र नागपूर विद्यापीठातल्या प्रेमळ प्राध्यापिका होत्या..

गेले सात आठ महिने या राज्याचे माजी प्रशासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी मिलिंद म्हैसकर यांचे सासरेबुवा अरुण पाटणकर तसे कर्करोगाने आजारी होते पण तरीही त्यांनी हे महिने हसत खेळत काढले, ते घाबरले नाहीत, शेवटपर्यंत नेहमीच्या गप्पांमध्ये रंगलेले, आणि वडिलांची सेवा कशी करायची असते, अभिजितबाबा आणि मनीषाताईंनी ते दाखवून दिले, इतरही म्हैसकर पाटणकर कुटुंबातले एकमेकांच्या हातात हात धरून, त्यामुळेच तर अरुणभाईंना घरातल्या सार्या सदस्यांचा अभिमान होता. त्यांचे नोकरीतले अनुभव आणि त्या वयातही दांडगी स्मरणशक्ती, प्रचंड उत्साह, अघळपघळ पक्का वर्हाडी स्वभाव, काय सांगू मित्रांनो, अपना तो मूड गया. दुसऱ्यासाठी कायम धावून जाणे, अपेक्षाविरहित सहकार्य करणे हे अरुण पाटणकरांचे स्वभाव वैशिष्ट्य. त्यांच्याशी अनेकदा मारलेल्या गप्पा, तेथून बाहेर पडलो कि ज्ञानाने मी समृद्ध होऊन, माझ्या लिखाणात भर पडे...

अरुणभाईंची आई १९१२ च्या दरम्यान तेही विदर्भातल्या खामगाव सारख्या गावातून मॅट्रिक होऊन बाहेर पडलेली आणि वडील देखील वन खात्यातून उच्च पदावरून निवृत्त झालेले. म्हणजे पाटणकर घराणे सुरुवातीपासून, पिढीजात उच्चपदस्थ, त्यांना हे सारे नवीन नाही. नागपुरात पाटणकरांचा मध्यवस्तीतला जुना बंगला साधा पण बघण्यासारखा, अरुणभाईंच्या पश्चातही पुढल्या पिढीला तो तसाच ठेवायचाय, कारण अरुणभाईंनी तो मनापासून जपलाय, कित्येक कोटी रुपये तो विकून मिळाले असते पण एखाद्या घनदाट जंगलात शोभावी अशी ती प्रशस्त पण साधी वास्तू, पुढल्या पिढीसाठी ती अरुणभाईंची आठवण आहे...

स्वर्गवासी अरुण पाटणकरांचे नोकरीतले त्यांचे अनुभव येथे सांगणे लिहिणे अशक्य पण सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री आणि हे राज्याचे मुख्य माहिती संचालक, दोघांचाही एकमेकांवर भारी जीव, आपल्या मुख्यमंत्री पदाच्या कालखंडात ज्यांच्यावर ते हमखास विश्वास टाकून मोकळे व्हायचे त्या पंचातले एक होते अरुण पाटणकर, सुधाकररावांना पाटणकर हे साक्षात लक्ष्मणाच्या रुपातले ' मनोहर नाईक ' वाटायचे, जसे आजचे मुख्यमंत्री मनीषा आणि मिलिंद पाटणकरांवर विश्वास टाकून मोकळे होतात आणि हे दोघेही जसे खुबीने मेहनतीने टाकलेल्या जबाबदाऱ्या पार पडतात, अरुण पाटणकरांच्या बाबतीतही त्यावेळेच्या मुख्यमंत्र्यांचे म्हणजे नाईकांचे हे असेच विश्वासाने विसंबून राहणे असायचे. सहजच म्हणून सांगतो, नागपुरात महाविद्यालयात, मला वाटते, हिस्लॉप कॉलेज मध्ये शिकतांना फडणवीसांच्या मनीषाताई एकवर्षे पुढे होत्या आणि अभिजित पाटणकर एक वर्षे मागे होते, तेव्हापासूनच या तिघांचे तसे आपुलकीचे संबंध. स्वतः मुख्यमंत्र्यांनीच मला हे सांगितलेले आहे, आज तिघेही टॉपला, मीही त्या महाविद्यालयात या तिघांच्या आसपास असतो तर, अर्थात असे काही नसते, स्विमिंग शिकतांना, माझ्याही बॅचला आलिया भट होती, मला तर अलोकनाथ देखील होता आले नाही...

स्वर्गवासी अरुण पाटणकर सुखी समाधानी होते कारण शंभर कौरवानच्या बापासारखे ते नव्हते तर होते पाच पांडवांच्या बापासारखे भाग्यवान, उच्च पदस्थ सुनबाई, टॉपच्या पदाला पोहोचलेले अभिजितबाबा, उच्चशिक्षित पत्नी विजयाताई, पॉवरफुल कपल मनीषाताई आणि मिलिंदजी म्हैसकर, हे सारे त्यांच्या घरातले, असे भाग्य, यश, समाधान, ऐश्वर्य फार कमी लोकांच्या वाटेला येते त्यातले ते एक, कधीकाळी आमची जमून येणारी गप्पांची मैफिल, आता यापुढे ती जमणे शक्य नाही. पाटणकर म्हैसकर घराणे केवळ चार महिन्यात मला त्यांनी दोनवेळा रडवून सोडले आहे, माझी हि अवस्था तर त्यांचे मन कसे आणि किती अस्वस्थ असेल, कल्पनाही करवत नाही, लढणारे बहाद्दर कुटूंब ते दोघेही, नक्की यातूनही बाहेर पडतील आणि नेहमीचे धमाल आयुष्य जगायला सुरुवात करतील, देवा, आता एवढे तरी कर, या साऱ्यांना सुखी ठेव, दुष्टांची त्यांना नजर लागणार नाही, देवा, तूच आता काळजी घे...

शेवटी एकच सांगतो, या जगात जन्म आणि मृत्यू यांची जोड आहेच, जन्मलेले सारेच मृत्यू पावतात, हे एक कटू सत्य. पण ज्या कुलात जन्म घेतला, त्या वंशाची जे भरभराट करतात, त्यांचा जन्म खऱ्या अर्थाने सफल झाला असे म्हणावे लागेल, स्वर्गातच पोहोचलेल्या अरुणजींचे जीवन नक्की सार्थकी लागले, त्यांचे जाणे मनाला हुरहूर लावून गेले...
तूर्त एवढेच.


पत्रकार हेमंत जोशी 

No comments:

Post a comment