Sunday, 23 July 2017

विषय वेगवेगळे २ : पत्रकार हेमंत जोशी


विषय वेगवेगळे २ : पत्रकार हेमंत जोशी 

त्या दोघात बऱ्यापैकी साम्य आहे, ते दोघेही तब्बेतीने एकदम खात्यापित्या घरचे, त्यांच्याकडे बघणाऱ्या प्रत्येकाला तेच वाटते, पण त्यातला एक सत्तेत आल्यानंतर अमाप समाप संपत्तीचा मालक बनला तर दुसरा उत्तम संस्कारातून आल्याने संपत्तीपेक्षा समाजसेवेला अधिक प्राधान्य देणारा. दोघानांही मांसाहार प्रिय. दोघेही अपत्यांच्या बाबतीत आदर्श असे म्हणजे सारख्याच विचारांचे, एकच अपत्य आणि तीही एकुलती एक मुलगी. दोघेही भाषा प्रभू आणि उच्चशिक्षित. त्यातले पहिले तोंडातल्या तोंडात बोलून, काय बोललो हे बायकोलाही कळू देत नाहीत, दुसरे मात्र सुधीर फडक्यांच्या गाण्यातील स्पष्ट उच्चारांसारखे भाषण करून मोकळे होणारे. ते काल मुख्यमंत्री होते, हे आजचे मुख्यमंत्री आहेत, त्यातले पहिले एकदम डेंजरस,दुसरे तर पहिल्यांपेक्षा अधिक डेंजरस. पहिले राग आला कि खडूस बोलून मोकळे होतात, दुसऱ्यांना राग आला तरी ते मनात ठेवतात, वरकरणी गॉड गॉड बोलतात पण नंतर असे काही करून ठेवतात कि समोरच्याला वाटते, आधीचे बरे होते, हे त्यांचे आजोबा शोभतात. लक्षात आलेच असेल, पहिले आहेत, शरद पवार आणि दुसरे आहेत देवेंद्र फडणवीस. पवारांना राग आला किंवा त्यांना एखाद्याचा बदला घ्यायचा असेल तर ते त्यांच्या देहबोलीतून आणि त्याच त्या बोलण्यातून लक्षात येते, फडणवीसांचे तसे नाही, तुम्ही त्यांना अंडर एस्टिमेट करायला जाता, तुम्ही त्यांना इझी घेता पण जेव्हा तुम्हाला तुमची जागा ते दाखवून देतात, तेव्हा तुमच्या ते लक्षात येते, फडणवीस पवारांच्या कित्येक पावले पुढे, एकदम मोदी यांच्या जवळपास. मनात आले कि समोरचा मग राजकीय दृष्ट्या कितीही बलवान ताकदवान असो, फडणवीस त्याला काही कळायच्या आत त्याला त्याची जागा दाखवून मोकळे होतात, प्रसंगी अगदी घरातला असला तरी. जे सतत भासवतात आम्ही फडणवीसांचे जवळचे, क्लोज, आहोत, त्यांच्यावर अजिबात विश्वास ठेऊ नका, उदाहरणार्थ समजा तुम्हाला वाटत असेल कि शायना एन सी त्यांच्या खूप जवळच्या, त्यातून तुम्ही शायना यांना एखाद्या कामाचे आगाऊ पैसे देऊन मनातल्या मनात, आपले काम झाले असे मनोरथ रचून मोकळे होत असाल तर तो असतो तुमचा करून देण्यात आलेला गैरसमज. अर्थात शायना हे एक सहजच उदाहरण दिले, कदाचित ते खरे असेल किंवा नसेलही. जोडलेला, जोडल्या गेलेला एखादा मित्र छुटपूट फायदा घेऊन मोकळा होत असेल तर कदाचित 
फडणवीस दुर्लक्ष करतील, पण अमुक एखादा, मी मुख्यमंत्र्यांच्या ताटात जेवणारा आहे असे सांगून त्यांच्या नावाने उठसुठ गैरफायदा घेणारा असेल तर मग फडणवीस प्रसंगी मोदी यांच्यापेक्षाही लै भारी, म्हणजे बोलतील गॉड, पण तुमच्या नकळत तुमची हवा अशी काही काढून घेतील कि त्या मित्राला वाटेल, अरे आपलाही खडसे झालाय, थोडक्यात हेच महत्वाचे, ऊनसे पंगा ना लेना मेरे भाई. एकच सांगतो, प्रसंगी शरद पवार होणार नाहीत एवढे हे मुख्यमंत्री कठोर निर्णय घेऊन मोकळे होतात, राज्याच्या हितासाठी वाट्टेल ते त्यामुळे सभोवतालचे वाट्टेल ती मोकळीक दिल्यानंतर उद्याचे अजितदादा निर्माण होणार नाहीत हि सोज्वळता मनाशी उराशी बाळगून फडणवीस पुढे पुढे जातात त्यामुळे जे पवारांनी केले ते फडणवीस करणार नाहीत म्हणजे राज्य विकून खा रे, असे ते कोणत्याही तटकरेंना सांगून मोकळे होणार नाहीत. त्यांच्या पार पडलेल्या वाढदिवसाच्या निमित्ताने ते नेमके आत बाहेर कसे येथे थोडक्यात तुम्हाला सांगितले, गोड करून घ्या, त्यांना दीर्घायुष्याचा शुभेच्छा 
मनापासून मनातून मन:पूर्वक देऊन मोकळे व्हा...

No comments:

Post a comment