Thursday, 20 July 2017

विश्वास पाटलांचे काय झाले : पत्रकार हेमंत जोशी


विश्वास पाटलांचे काय झाले : पत्रकार हेमंत जोशी 

हा अंक तुमच्या हाती पडेल तेव्हा मुंबईत पावसाळी अधिवेशन सुरु झालेले असेल. या पावसाळी अधिवेशनात मागच्या महिन्यात निवृत्त झालेल्या लेखक आणि प्रशासकीय अधिकारी विश्वास पाटील यांचे काही खरे नाही असे जो तो भेटतो तो मला हेच सांगतो. कारण विश्वास पाटील यांच्यावर एसआरए प्रकल्पात विविध भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले आहेत. त्यावर मी हेच म्हणतो, पावसाळी अधिवेशनात विश्वास पाटील यांना त्रास होईल, ते चौकशीच्या गंभीर कचाट्यात सापडतील असे अजिबात घडणार नाही, माझे हे वाक्य लिहून घ्या कारण गेली सहा वर्षे म्हणजे आधीच्या दोन मुख्यमंत्र्यांनी आणि त्यानंतरच्या देवेंद्र फडणवीस यांनीही जवळपास सहा वर्षे विश्वास पाटील हे सिनियर मोस्ट प्रशासकीय अधिकारी असूनही त्यांना अडगळीत टाकले होते, विश्वास पाटील यांनी जंग जंग पछाडूनही त्यांना हवे तसे पोस्टिंग मिळत नव्हते, शेवटी त्यांच्या म्हणे विधान परिषदेचे अध्यक्ष श्री रामराजे निंबाळकर मदतीला धावले आणि दस्तुरखुद्द एकप्रकारे न्यायधीशच विश्वास पाटलांच्या मदतीला धावल्याने त्यांना निवृत्त होण्याच्या आधी, साधारण दिड वर्षे आधी जेथे वादग्रस्त प्रशासकीय अधिकारी पोस्टिंग घेण्या धडपडतात त्या झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पाठविण्यात आले, त्यांची त्याठिकाणी नियुक्ती करण्यात आली. जे पुरावे इतर कोणाकडेही नसतील ते माझ्याकडे आहेत पण अद्याप ती वेळ आलेली नाही कि प्रसिद्ध न झालेले ते पुरावे मी येथे मांडावेत कारण विश्वास पाटीलांच्या चुका झाल्या नाहीत असे अजिबात नाही पण अत्यंत अत्यंत महत्वाचे असे कि गेली सहा वर्षे अडगळीच्या जागी खितपत पडलेल्या विश्वास पाटलांना प्रकाश मेहता यांच्यासारख्या सत्तेत असणाऱ्या आणि सत्तेच्या अतिशय जवळ असलेल्या नामचीन नेत्यांना, वरिष्ठ अधिकाऱ्यांना, राजकीय दलालांना अजिबात दुखवायचे नव्हते, त्यांना कायम भीती वाटायची कि सत्तेशी जवळीक असलेल्या या प्रभावी मंडळींना दुखावले, दूर ठेवले, त्यांच्या मनासारखे वागले नाही, त्यांना दूर ठेवून त्यांच्या मनासारखे निर्णय घेतले नाहीत तर आपली तडकाफडकी उचलबांगडी होऊ शकते हि भीती विश्वास पाटलांना कायम असायची आणि पैशांचे आकर्षण असलेल्या विश्वास पाटलांना झोपू मधून बाहेर पडून पुन्हा एकदा निवृत्त होतांना अडगळीत पडायचे नव्हते, त्यांना शेवटपर्यंत या क्रीम पोस्टवरच चिटकून राहायचे होते त्यामुळे त्यांचा गैरफायदा घेण्यात सत्तेच्या जवळ असणाऱ्या नेत्यांनी, दलालांनी, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी हवे तेवढे हात विश्वास पाटलांकडून धुवून घेतले. आणि हीच वस्तुस्थिती आहे. एरवी अतिशय कणखर वागणारा हा मर्द मराठा आमचा हा रांगडा पाटील या साऱ्या प्रकारातून झोपू मध्ये आल्यानंतर अतिशय हळवा झाला होता, त्यांनी स्वतःसाठी काही केले नाही असे मी अजिबात म्हणणार नाही पण यावेळी विश्वास पाटलांनाही झोपूशी संबंधित सर्वांनी खूप खूप वापरून घेतले....

आता राहिला पावसाळी अधिवेशनाचा प्रश्न, तर विश्वास पाटलांच्या मित्रांनी काळजी करावी असे अजिबात घडणार नाही, धनंजय मुंडे असोत कि दस्तुरखुद्द रामराजे निंबाळकर किंवा वादग्रस्त संभाजी झेंडे पाटलांचे बायकोचे भाऊ राधाकृष्ण विखे पाटील असोत कि माणिकराव ठाकरे आणि नेहमीचेच असे असंख्य विधानसभा सदस्य किंवा विधान परिषद सदस्य जे प्रश्न टाकतात नंतर एकतर सभागृहातून गायब होतात किंवा विचारलेल्या स्वतःच्याच प्रश्नाची स्वतःच हवा काढून घेतात, त्यातला एकही विश्वास पाटलांना अडचणीत आणेल असे अजिबात घडणार नाही, हे भविष्य मी आजच तुम्हाला सांगून मोकळा होतोय, चुकून असे घडलेच म्हणजे या सभागृहामुळे विश्वास पाटलांना तुरुंगात जायची वेळ आलीच तर मी कोणत्याही वाहिनीवर येऊन अगदी जाहीर थेट नाक घासून दोन्ही सभागृहाची माफी मागेल...

अहो, विश्वास पाटलांना इतरांसारखे सभागृह सांभाळून घेण्याची अजिबात गरज नाही, सभागृहातल्या ज्यांनी त्यांना लुटले किंवा ज्या ज्या राजकीय दलालांनी त्यांचा गैरफायदा घेतला, तेच त्यांच्या मदतीला सरसावले आहेत, त्यामुळे विश्वास पाटलांची अजिबात काळजी करणे नको. एक मात्र नक्की, विश्वास पाटलांना त्या संभाजी झेंडे पाटलांसारखे बेरकी वागता आले नाही, ते हळवे झाले त्यातून त्यांनी आपले नुकसान करवून घेतले...

जाता जाता : 
मित्रहो, तुम्ही सारे अतिशय सामान्य माणसे. सत्ता फक्त आमच्या हातात आहे, आणि आम्ही आहोत मीडिया, नेते, मंत्री, आमदार, खासदार, विधानसभा आणि विधानपरिषद,सत्तेशी जवळीक असलेले राजकीय दलाल, शासकीय अधिकारी आणि प्रशासकीय अधिकारी. होय ! सत्ता फक्त आमच्या हाती आहे आणि आम्ही सतत तुम्हाला फक्त आणि फक्त बेवकूफ बनविण्याचे काम करतो, पैसेच खातो. पण होते काय, या अशा सततच्या घरी येणाऱ्या काळ्या पैशातून एक मात्र नक्की आमच्या घरातले वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे, आम्ही जे तुमच्यासमोर पेश होतो, तो आमचा मुखवटा आहे, आमचा असली चेहरा फक्त आमच्या घरच्यांना पाहायला मिळतो, आमच्या प्रत्येकाच्या घरातले वातावरण अतिशय गढूळ झालेले आहे, येणाऱ्या सततच्या काळ्या पैशांनी आमच्या घरातले कौटुंबिक सुख देवाने केव्हाच हिरावून घेतले आहे. एक उदाहरण देतो. सध्या देशाला पूर्णवेळ सौरंक्षण मंत्री नाही, मनोहर पर्रीकरांनी राजीनामा दिल्याने ती अतिशय महत्वाची जागा अद्याप रिक्त आहे आणि त्याचवेळी पाकिस्थान व चीन या दोन्हीही देशांनी आमची झोप घालविली आहे, अशावेळी दिल्लीत किंवा देशाला संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांची अगदी सतत म्हणजे २४ तास गरज असतांना डॉ. भामरे मात्र अतिशय महत्वाच्या दिवसांमध्ये इकडे राज्यातल्या मंत्रालयात एवढ्या येरझाऱ्या घालतात कि त्यांनी स्वतःचे महत्व त्यातून घालविले आहे, अनेकदा डॉ. भामरे हे मुख्यमंत्र्यांच्या किंवा मंत्र्यांच्या केबिन बाहेर ताटकळत बसलेले आम्ही अनेकांनी बघितले आहे, या दिवसात बघतो आहोत. देशाचा संरक्षण राज्यमंत्री येथे मंत्रालयात येतोय कळल्यानंतर अख्खे मंत्रिमंडळ आणि मंत्रालय त्याच्या सभोवताली जमा व्हायला हवे, येथे मात्र नेमके उलटे घडतेय, एखाद्या सामान्य मनासारखे देशाचे हे संरक्षण राज्यमंत्री देशाचे रक्षण करायचे सोडून जेव्हा छुटपूट कामे घेऊन येथे मंत्रालयात फिरतांना दिसतात, मान खाली जाते. उद्या फक्त हे कळू द्या कि नितीन गडकरी मंत्रालयात यायचे आहे, बघा त्यांचे जर मंत्रालयात एखाद्या फिल्मी हिरो सारखे स्वागत झाले नाही तर मला पत्रकार म्हणू नका, वाटल्यास हलकट म्हणा, बदमाश म्हणा, संभाजी झेंडे पाटील म्हणून मोकळे व्हा...
अपूर्ण :

No comments:

Post a comment