Tuesday, 6 June 2017

मेंडोन्सा विरुद्ध मेहता २ : पत्रकार हेमंत जोशी


मेंडोन्सा विरुद्ध मेहता २ : पत्रकार हेमंत जोशी 

राजकारणात कोणीही कोणाचे नसते. ज्याने आपल्याला घडविले वाढविले मोठे केले तो अगदी नजरेसमोर राजकारणातून उध्वस्त उजाड अस्तंगत गारद गायब गडप खाक छिन्न नाहीसा नेस्तनाबूत विध्वस्त लुप्त समाप्त सत्ताहीन समूळ नष्ट बरबाद नाबुद सफा ध्वस्त खतम होत असला तरी घडलेल्या नेत्याला घडविणाऱ्या नेत्यांविषयी कवडीचीही काळजी किंमत नसते उलट वरून तेल ओतण्याचे काम सारेच नेते सारेच संधीसाधू नेते करीत असतात त्यामुळे ज्या पवारांनी एकाक्षणी फार मोठ्या संकटातून गिल्बर्टशेट मेंडोन्सा यांना मुक्त करून आणले होते त्याच शरद पवारांची सत्ता गेल्यानंतर मेंडोन्सा यांनी पवारांकडे फिरवलेली पाठ, त्यांचा त्यागलेला पक्ष, सारे बघून यत्किंचितही आम्हाला आश्चर्य वाटले नाही. येथे कोणीही कोणाचे नसते....

आता तर मीरा भायंदर महापालिकेच्या निवडणुकीचे पडघम वाजू लागल्याने भाजपा आमदार मेहतांकडून दुखावलेले दोघेही म्हणजे मेंडोन्सा आणि सेना एकत्र आले आहेत, मेंडोन्सा यांनी राष्ट्रवादी सोडून थेट शिवसेनेत प्रवेश केला आहे. ज्या राष्ट्रवादी पक्षाने किंवा थेट शरद पवार यांनी त्यांच्या पक्षाच्या माध्यमातून मेंडोन्सा यांच्या दिवंगत पत्नी व मुलीला महापौरपद बहाल केले, किंवा मीरा भायंदर नगरपालिका असतांना मेंडोन्सा यांना मिळवून दिलेले नगराध्यक्षपद किंवा भायंदरचा पहिला आमदार होण्याचा मान मिळवून दिला त्या शरद पवारांचे जेथे मेंडोन्सा झाले नाहीत ते शिवसेनेत टिकून राहतील वाटत नाही, दगाफटका त्यांचा स्थायी स्वभाव आहे आणि तीच वस्तुस्थिती आहे. कालपर्यंत वसंत डावखरेंच्या केबिनमध्ये ठिय्यामारून बसणारे मेंडोन्सा यापुढे मंत्री एकनाथ शिंदेंच्या केबिन मध्ये दिसतील किंवा भविष्यात आणखी कोणाच्यातरी. तसेही आम्हा सामान्यांना किती किती म्हणून छान वाटते ते दृश्य बघतांना कि तुरुंगातून बाहेर आलेल्या कैद्याला देशाचा खासदार राजन विचारे आणि राज्यातल्या एक जवाबदार आमदार प्रताप सरनाईक कौतुकाने जवळ घेऊन बसले आहेत, अगदी सहज याठिकाणी प्रकाश झा यांच्या गंगाजल सारख्या सिनेमांची आठवण होते नाही का....

तसेही आपल्या या महा राष्ट्रात अगदी बोटावर मोजण्याइतके लोकप्रतिनिधी असतील कि जे अमापसमाप काळ्या कमाईपासून दूर आहेत, अन्यथा बहुतेक सारेच बाबा सिद्दीकीसारखे म्हणजे वाममार्गाने २५ कमवायचे त्यातले चार दोन वाटून गरिबांचा सामान्यांचा मसीहा बनून आमदार खासदार व्हायचे. ज्या शरद पवार यांनी काँग्रेस मध्ये असतांना मेंडोन्सा यांच्यासाठी खास वजन वापरून स्थानिक नेते मुजफ्फर हुसेन यांना अडगळीत टाकून त्यांना बाजूला सारून मेंडोन्सा यांना नगराध्यक्ष केले होते त्या गिल्बर्टशेट यांनी एक मात्र तेवढे चांगले केले म्हणजे राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर त्यांनी घड्याळाला पसंती दिली, राजकीय दूरदृष्टी असलेल्या लबाड आणि धूर्त मेंडोन्सा यांना त्या पाठिंब्याचा पुरेपूर आर्थिक आणि राजकीय फायदा पुढे नक्कीच झाला, तो इतिहास वर नमूद केला आहेच....

एक मात्र नक्की कि मीरा भायंदर परिसरात मेंडोन्सा अगदी सुरुवातीपासून सामान्य माणसात लोकप्रिय आहेत, त्यांची स्वतःची मोठी ताकद असल्यानेच ते भायंदर ' ग्रामपंचायत ' असतांना देखील अगदी तरुण वयात त्या गावचे सरपंच म्हणून त्यांनी पद सांभाळले आहे. एकाचवेळी गुन्हेगारी जगतात आणि सर्वसामान्य मतदारांत लोकप्रियता मिळविणारे खऱ्या अर्थाने त्या भागातले ते डॉन आहेत, म्हटल्यास वावगे ठरू नये. त्यांना आणि शिवसेनेला मेहता यांनी केलेला विधान सभा निवडणुकीतील पराभव जिव्हारी लागलेला आहे म्हणजे नरेंद्र मेहतांच्या राजकारणातील प्रवेशानंतर मेहता यांनी मेंडोन्सा यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून काँग्रेस नेते मुजफ्फर हुसेन यांना राजकारणातून आधी बऱ्यापैकी हुसकावून लावले नंतर हळूच मेंडोन्साचेही राजकीय वजन संपवून थेट विधानसभा जिंकली. एकाचवेळी मेंडोन्सा आणि शिवसेना विधानसभेत पराभूत झाल्याने हा पराभव त्या दोघांच्याही जिव्हारी लागला. आता सेना आणि मेंडोन्सा यांचे एकत्र येणे त्याचवेळी मेहता यांची लोकप्रियता झपाट्याने ओसरणे, पुन्हा एकदा त्या भागात साऱ्यांच्याच मनासारखे होईल, मेहता यांचा भाजपामधला ' विवेक पंडित ' होईल....

No comments:

Post a comment