Monday, 5 June 2017

मेंडोन्सा विरुद्ध मेहता : पत्रकार हेमंत जोशी

मेंडोन्सा विरुद्ध मेहता : पत्रकार हेमंत जोशी 

तब्बल दहा महिन्यानंतर अलीकडे मीरा भायंदरचे माजी आमदार गिल्बर्टशेट मेंडोन्सा तुरुंगातून बाहेर आले, आल्या आल्या म्हणजे एखाद्या हिंदी चित्रपटात कसे हिरो तुरुंगाबाहेर येताच त्याची नायिका किंवा मुले किंवा गावकरी किंवा आप्त वाट पाहत असतात तसे मेंडोन्सा यांची तुरुंगाबाहेर येताच ठाणे जिल्ह्यातील तमाम शिवसेना नेते, पदाधिकारी, शिवसैनिक आणि मेंडोन्साचे पदाधिकारी वाट बघत उभे होते आणि या सर्वांनी त्यांचे जल्लोषात स्वागत केले.विशेष म्हणजे त्या गर्दीत ज्या राष्ट्रवादी पक्षाचे मेंडोन्सा एक नेते होते, त्यांचा मागमूसही नव्हता, कारण स्पष्ट होते, मेंडोन्सा हे शिवसेनेत दाखल होणार आहेत हे आधीच ठरल्याने असे घडले....

आता पुढला महत्वाचा मुद्दा. जे मेंडोन्साच्या बाबतीत घडले तेच श्रीयुत छगन भुजबळ यांच्याही बाबतीत नक्की ठरले आहे म्हणजे ज्यादिवशी भुजबळ काकापुतणे तुरुंगाबाहेर येतील, तुरूंगाबाहेरच शिवसेनेतर्फे त्यांचे रेड कार्पेट अंथरून जंगी स्वागत केले जाईल, तुमच्याही ते लक्षात आलेच असेल कि जणू भुजबळ हे आपल्या गावचेच नाहीत, पद्धतीने शरद पवार किंवा तमाम राष्ट्रवादीचे नेते त्यांचा 
साधा उल्लेख देखील टाळतात. भुजबळांनी खाल्ले हा मुद्दा वेगळ्याचर्चेचा पण ज्या भुजबळांचे सतत १५ वर्षे ओरपून ओरपून खाल्ले त्यांचे साधे नाव देखील राष्ट्रवादी चे नेते तोंडातून काढणे पाप समजतात, राजकारण आणि राजकीय नेते हे असे वेड लावण्यास भाग पाडतात...

गिल्बर्ट मेंडोन्सा यांना शिवसेनेत आणण्याचे संपूर्ण श्रेय आमदार प्रताप सरनाईक यांना जाते. तुरुंगातून सुटलेल्या मेंडोन्साला थेट शिवसेनेत घेतले अशी बदनामी होऊ नये म्हणून एकनाथ शिंदे किंवा राजन विचारे किंवा प्रताप सरनाईक इत्यादी ठाणे जिल्ह्यातले स्थानिक नेतेच त्यांचे उघड जाहीर स्वागत करून मोकळे झाले. मातोश्रीवरून कोणतीही प्रतिक्रिया आली नाही, उद्धव यांनी हे जे केले ते योग्य केले, अन्यथा तुरुंगातून बाहेर पडणाऱ्याला शिवसेनेत सन्मान मिळतो मग ते सुरेश दादा जैन असोत किंवा गिल्बर्ट मेंडोन्सा किंवा भविष्यातले छगन भुजबळ...असे का घडले म्हणजे शिवसेनेला मेंडोन्सा महत्वाचे का वाटले किंवा अतिशय धूर्त मेंडोन्सा यांना प्रचंड उपकार करून ठेवलेल्या शरद पवारांना ठेंगा दाखवून शिवसेनेत का जावेसे वाटले तर सेना आणि मेंडोन्सा या दोघांचेही दुःख समसमान आहे, दोघांच्याही वाटेतला काटा भाजपा आणि स्थानिक आमदार नरेंद्र मेहता आहे, दोघांनाही नरेंद्र मेहतांना राजकारणातून हद्दपार करायचे आहे आणि यापुढे ते तसे कठीण नाही कारण शिवसेनेकडे आणि गिल्बर्ट मेंडोन्सानकडे स्थानिक कोणत्याही विचारांचा जातीचा सामान्य माणूस थेट आपली समस्या मांडू शकतो, नेमके त्याबाबतीत नरेंद्र मेहता कमी पडले आहेत, व्यापार आणि उद्धट स्वभाव, सामान्य मतदार त्यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर अल्पावधीत दुरावल्याचे आज स्पष्ट चित्र आहे आणि त्याचाच मोठा फायदा पुढल्या प्रत्येक निवडणुकीत मेंडोन्सा आणि शिवसेनेला होणार आहे, यापुढे मोदी लाट भलेही आणखी मोठी असो, नरेंद्र मेहता आणि त्यांचा व्यापारी वृत्तीचा कंपू अमुक एखाद्या निवडणुकीत निवडून येईल असे आता मीरा भायंदर मध्ये अजिबात वातावरण नाही. आपण चुकीच्या नेत्याला नको तेवढे मोठे केले असे जर आज मुख्यमंत्र्यांना वाटत असेल तर त्यात फारसे आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही, एक मात्र तेवढेच खरे, भाजपमध्येही एक मुख्यमंत्री सोडले तर मेहता यांना जवळ घेणारे ज्येष्ठ नेते औषधाला देखील सापडणार नाहीत. थोडक्यात मेंडोन्सा यांना मेहतांचे महत्व संपविण्यासाठी त्यांची एकट्याची ताकद पुरेशी नव्हती आणि तसेही अमुक एखादा नेता राष्ट्रवादीतून बाहेर पडला कि त्या त्या भागातली राष्ट्रवादी मग त्याठिकाणी औषधाला देखील सापडत नाही, मेंडोन्सा म्हणजे राष्ट्रवादी आणि राष्ट्रवादी म्हणजे मेंडोन्सा असे जे चित्र होते ते आता मेंडोन्सा यांच्या सेनेत जाण्याने झिरो ठरले आहे, आता मीरा भायंदर भागात दूर दूर पर्यंत राष्ट्रवादी पक्षाचे साधे दर्शन देखील घडणार नाही. शिवसेना आणि मेंडोन्सा एकत्र येणे, मेहता पुढल्या टर्मला आमदार नसतील, हे माझ्याकडून आजच लेखी घ्या...

विषयांतर : 
एखाद्या लब्बाड मुलाला अमुक एखादी वस्तू हवी असेल तर तो मनापासून प्रयत्न करतो, वस्तू मिळविण्यासाठी वाट्टेल ती आमिषे मित्रांना भावंडांना दाखवतो तरीही ती वस्तू मिळाली नाही तर प्रचंड आदळआपट करतो. पण आदळआपट करून देखील उपयोग झालेला नाही त्याच्या लक्षात आल्यानंतर तो अचानक शांत होतो, गप बसतो, मला ती वस्तू नकोच होती असा काही काळ चेहऱ्यावर आव आणतो, मात्र पुन्हा काही दिवसांनी त्याचे प्रयत्न सुरु होतात..आगामी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीशी वरील परिच्छेदाचा अजिबात संबंध नाही. हि वाक्ये केवळ योगायोग समजावा....
अपूर्ण :

No comments:

Post a comment