Wednesday, 21 June 2017

मुख्यमंत्र्यांच्या मनातले : पत्रकार हेमंत जोशी

मुख्यमंत्र्यांच्या मनातले : पत्रकार हेमंत जोशी 

तुम्हाला लोकांच्या मनातले ओळखता येते कि नाही मला ठाऊक नाही पण मी मात्र बऱ्यापैकी समोरच्या व्यक्तीच्या मनात काय सुरु आहे, ओळखू शकतो दीक्षितांची माधुरी तिच्या लग्नापूर्वी आणि मी एकाच ठिकाणी म्हणजे जुहूच्या सन अँड सॅण्ड या पंचतारांकित हॉटेल मध्ये पोहण्याच्या निमित्ताने एकत्र येणे होत असे, भटांची आलिया तिच्या बालमैत्रिणीसंगे म्हणजे नीना गुप्ताच्या मसाबा सांगे येत असे, आलिया तेव्हा फारतर जेमतेम ४-५ वर्षांची असावी, तेव्हा अगदी आमच्यासमोर कपडे बदलवून पटकन पूलमध्ये उतरायची, आता ती तसे करणे शक्य नाही, अन्यथा मी सकाळी पाच वाजेपासून पूलमध्ये उतरून बसलो असतो. मला अनेकदा वाटते विदर्भातल्या माझ्या मित्राला म्हणजे अनिल गावंडे यास पोहायला घेऊन जावे, पण नकोच, विदर्भातला ना तो, आळशी आहे, त्यात डायबेटिक असल्याने वारंवार त्याला लघवीला जावे लागते, जाऊ द्या नकोच तो अंगावर थरकाप येणे, तसेही स्विमिन्ग पुलमधले पाणी आधीच मिठासारखे असते....तर लोकांच्या मनातले मला समजते म्हणून मी माझ्या मनात जे होते ते कधीही माधुरीला विचारले नाही हे माहित असूनही कि ती विवाहित पुरुषाच्या प्रेमात पडू शकते, अर्थात समोरून येणारे उत्तर मला ठाऊक होते, ती हेच म्हणाली असती, हेमंत, मी तर तुझ्यात मोठा भाऊ बघते. थोडक्यात मला लोकांच्या मनातले कळते...

अलीकडे मात्र नेता असूनही देवेंद्र फडणवीसांच्या मनातले नेमके कळले, नेत्यांच्या मनातले सहजासहजी कळत नाही, हसतमुख देवेंद्र यांच्या मनातले तर अजिबात कळत नाही त्यामुळेच ती पत्रकार देवेंद्रचे लग्न ठरल्यानंतर कशी हिरमुसली होती, तुम्हाला मी तेही सांगितले आहे. देवेंद्र म्हणजे साखर वाटणारा माणूस, त्यांच्या मनातले तसे नेमके सांगणे त्यांच्या आईला देखील कठीण, मग अमृताबाई तर फार नंतर आलेल्या. हसमुखलाल एक सुशीलकुमार होते, ते तर एखाद्याच्या दारावर जरी बसायला गेले तरी हसत हसत श्रद्धांजली वाहायचे, त्यामुळे काही क्षणापुर्वी विधवा झालेली बाई देखील त्यांना त्या अवस्थेतही हसत हसत थॅक्यू म्हणायची.हसमुखलाल दोन देवेंद्र यांना मात्र नेमके तेवढे कळते कि हसतमुख चेहऱ्यावरही गंभीर भाव नेमके केव्हा आणायचे. गम्मत म्हणजे कधीही न हसणारे अजित पवार आणि पृथ्वीराज चव्हाण दोघेही उभ्या आयुष्यात कधीही न हसले पण ते दोघे समोरासमोर आले रे आले कि हजर असलेले तोंडाला पदर 
किंवा रुमाल लावून लावून हसत सुटायचे....

मुख्यमंत्र्यांच्या मनातले नेमके कळले आहे, ' द्रष्टा ' या विशेषांकामुळे. अलीकडे केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांना वयाची साठ वर्षे पूर्ण होऊन त्यांनी ६१ व्या वयात पदार्पण केले असले तरी त्यांचा उत्साह मात्र १६ वर्षाच्या तरुणाला लाजवेल असा आहे, त्यानिमीत्ते नागपुरात ऊर्जा खात्याचे मंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि नागपुरातील जुनेजाणते समाजसेवक गिरीश गांधी इत्यादींच्या मार्गदर्शनाखाली विशाल अशा कस्तुरचंद पार्कवर गडकरींचा जाहीर सत्कार करण्यात आला, समजा उद्या असा सत्कार पृथ्वीराज चव्हाणांचा करायचा असेल तर मला वाटते दादरच्या महिला मंडळाचा हॉल पुरेसा असेल, नाही म्हणायला ५०-६० खुर्च्या तेथे सहज मावतात. तर,देशातले अनेक मान्यवर गडकरींच्या षष्ट्यब्दपूर्ती सोहळ्याला उपस्थित असल्याचे तुम्हाला स्मरत असेलच. आणि या सत्कार सोहळ्याचे निमित्त साधून ' द्रष्टा ' हा सर्वांगसुंदर भरगच्च वाचनीय विलोभनीय विशेषांक त्यांच्यावर काढण्यात आला. तुम्हाला तो हवाच असेल तर माननीय गिरीश गांधींशी ९८२३०७७७९७ भ्रमणध्वनीवर संपर्क साधण्यास हरकत नाही...

परवा नागपूरवरून येतांना अगदी सावकाश विमानात गडकरी भेटले, द्रष्टा वाचला का, ते म्हणाले कामाच्या गदारोळात वाचणे झाले नाही, मी म्हणालो, अख्खा अंक जमेल तेव्हा वाचा पण देवेंद्र फडणवीसांनी लिहिलेले अगदी वेळात वेळ काढून वाचा, गेल्या दहा वर्षात एवढा मनमोकळा सडेतोड लेख निदान माझ्या तरी वाचण्यात आलेला नाही. मला खात्री आहे, रावसाहेब दानवेंच्याही असा लेख वाचण्यात आला असेल असे मला वाटत नाही कारण भाऊ कदमांच्या भाषेत सांगायचे झाल्यास दानवे काही वाचतच नाहीत. मी फडणवीसांनाही म्हणालो, सलाम तुमच्या लेखणीला, गडकरींवर तुम्ही लिहिलेले, कायम स्मरणात ठेवावे असे, फडणवीसांनाही माझी दाद मनापासून भावली असावी, ते धन्यवाद म्हणाले....

वाचक मित्रहो, तुम्हीही तो लेख वाचावा म्हणून मुद्दाम मी ऑफ द रेकॉर्ड मध्ये जसाच्या तसा घेतलाय, अगदी बारकाईने वाचल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल कि त्या दोघांचे आपापसात संबंध कसे आहेत आणि मतभेद किंवा मनभेद कदाचित अनेकदा होत असूनही ते दोघे विकास साधतांना, समाजहित आणि पक्षहित बघतांना मात्र कसे एकमेकांना घट्ट चिटकून आणि चिपकून असतात फेव्हिकॉल सारखे. महत्वाचे म्हणजे त्या दोघात आपापसात सत्तेची स्पर्धा असणाऱ्या नेत्यांमध्ये नाते मी अलीकडे गेल्या कित्येक वर्षात बघितलेले नाही, विशेष म्हणजे त्यातला नेमका कोण आज सांगता येणार नाही, पण दोघातला एक, एक दिवस नक्की या देशाचा पंतप्रधान होईल, असे राहून राहून वाटते, स्पर्धा तशी टोकाची पण त्या दोघांच्या आपापसातल्या प्रेमाचीही, अर्थात मनात राष्ट्रप्रेम असले कि नटे हे असे टिकून राहते....विशाल हृदयाचा नेता या मथळ्याखाली द्रष्टा या विशेषांकातला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलेला हा लघुलेख नक्कीच संग्रही ठेवण्यासारखा, जे वाचतात त्यांनी तो अवश्य वाचावा, जमलेच तर पाठ करावा, राज्यमंत्री मदन येरावरांना अर्थात मी हे सांगत नाही, त्यांचे पाठांतर म्हणे कच्चे आहे....

No comments:

Post a comment