Thursday, 11 May 2017

अतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी


अतुलनीय लोकमत १ : पत्रकार हेमंत जोशी 

आता कायद्याने बंदी आहे म्हणून सरदारजींवर विनोद करणे थांबले आहे, कुठेतरी यापुढे पुण्यातल्या ब्राम्हणांवर देखील विनोद करणे थांबले पाहिजे. जेव्हा सरदारजींवर विनोद केल्या जायचे तेव्हा एक जोक अनेकदा सांगितल्या जात असे, एकदा दिल्लीत मेंदूचे प्रदर्शन भरविण्यात येते. विविध भारतीयांचे मेंदू त्याठिकाणी ठेवण्यात येतात आणि दर देखील वेगवेगळे असतात. सर्वाधिक स्वस्त ब्राम्हणांचे मेंदू आणि सर्वाधिक महाग सरदारजींचे मेंदू असतात. असे का, बघणारे गृहस्थ आयोजकांचा विचारतात, म्हणजे ब्राम्हणांचे मेंदू सर्वाधिक स्वस्त आणि सरदारजींचे मेंदू सर्वाधिक महाग, असे का, त्यावर आयोजक म्हणतो, ब्राह्मणांचे मेंदू अगदी सहज उपलब्ध असतात, ज्या त्या ब्राम्हणाला मेंदू असतो, सरदारजींच्याबाबतीत मात्र तसे होत नाही, आम्हाला खूप शोधाशोध करावी लागते, मग कुठेतरी एखादा मिळतो...अर्थात येथे दोन बाबी या चुटक्या निमित्ताने, एक तर मी समस्त सरदारजींची माफी मागतो त्यांच्यावर विनोद केलाय म्हणून आणि ब्राह्मणांनाही मेंदू असतोच असे नाही, त्यासाठी माझे स्वतःचे उदाहरण पुरेसे आहे, ब्राम्हणांना मेंदू असतोच असे नाही....

येथे हा चुटका, विषय देवेंद्र फडणवीस यांचा आहे म्हणून घेतलाय, म्हणजे चुटक्यातल्या सरदारजींचे जसे असते तेच या राज्यातल्या राजकारणात ब्राम्हणांचेही आहे, लाखो ब्राम्हण जन्माला आल्यानंतर त्यातून एखादाच देवेंद्र फडणवीस असतो, जो राजकारणात उतरतो आणि यशस्वीही होतो, विदर्भात तर हे उदाहरण फारच विरळ, म्हणजे एखादा दुसराच फडणवीस किंवा गडकरी, बहुतेक सारे, सकाळी वरणावर फोडणी, संध्यकाळी फोडणीला वरण, या वृत्तीचे किंवा या महिन्यात तू साडी घे पुढल्या महिन्यात मी शर्ट घेतो, एवढे अयशस्वी..मोठ्या मुश्किलीने उत्तम संस्कारातून राजकीय वाटचाल करणाऱ्या आमच्या विदर्भातल्या देवेंद्र फडणवीस यांच्यावर काही चुकीचे टाकल्या गेले कि माझ्या तळपायाची आग मस्तकात पोहोचते, हे मात्र तेवढेच खरे आहे कि एखादी भयंकर चूक जर का उद्या त्यांच्याही हातून घडली तर विविध भावना गेल्या खड्ड्यात, मी देखील मग माझ्या लेखणीतून त्यांच्यावर तुटून पडायला कमी करणार नाही, चुकलेल्या गडकरींना मी किती छळलंय, हे एकदा त्यांना किंवा नागपूरकर गिरीश गांधींना विचारा, तेच तुम्हाला सांगतील, चुकलेला माणूस कोणत्या जातीचा, त्यावर मग भीक घालणे आम्हालाही शक्य नसते....

मला वाटते, अलिकडल्या काळातील म्हणजे शरद पवार यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस हे असे मुख्यमंत्री आहेत कि ते नेमके कसे हे या राज्यातील बहुतेक मंडळींनी अगदी जवळून बघितले आहे, थोडक्यात सर्वसामान्य माणसाचा देखील प्रेमाने त्यांनी हातात हात घेतलेला आहे, एवढे ते लोकांत मिसळणे पसंत करतात, त्यामुळे देवेंद्र नेमके कसे, हे मला याठिकाणी विस्तृत सांगण्याची तशी आवश्यकता नाही, हा प्रश्न 
मला किंवा इतरही पत्रकारांना नेहमी त्या पृथ्वीराज चव्हाणांच्या बाबतीत ते मुख्यमंत्री असतांना नेहमीच पडायचा कारण ते एखाद्या कर्मठ ब्राम्हणांच्या घरातल्या विटाळशीला म्हणजे पिरियड्स सुरु असलेल्या बाईसारखे होते, सारखे लागू लागू नका पद्धतीने, वागायचे, बोलायचे. मला तर नेहमी त्यांच्याकडे बघून आमच्या लहानपणी, आमच्या शेजारी राहणाऱ्या संध्याची आठवण यायची, म्हणजे ती आणि मी वयात येईपर्यँत अनेकदा एकत्र खेळत असू, कधी लगोऱ्या, कधी अंगत पंगत तर कधी कधी आई बाबा आई बाबा इत्यादी इत्यादी पण पुढे आम्ही वयात आल्यानंतर जेव्हा केव्हा मी समोर आलो कि ती लाजून आत पाळायची, पृथ्वीराज यांचेही ते मुख्यमंत्री असतांना हे असे त्या लाजणाऱ्या संध्यासारखे होते, म्हणजे कार्यकर्ता किंवा काम घेऊन येणारा माणूस दिसला रे दिसला कि ते आत पाळायचे, आता नेमके उलटे झाले आहे म्हणजे पृथ्वीराज चव्हाण समोर दिसले रे दिसले कि माणसे पळ काढतात, चालायचेच, काही दिवस सासूचे काही दिवस सुनेचे...

१९९० नंतर झाले काय, जो तो सत्तेत आला त्यातल्या बहुतेकांनी पुढल्या दहा पिढ्यांचे भले करण्यासाठी अमाप समाप कमाई करून ठेवली किंवा ठेवताहेत म्हणजे बहुतेक सारेच राजकारणी कदम कदम पर भ्रष्टाचारी रामदासी पण देवेंद्र फडणवीस यांचे तसे नाही पोटच्या एकुलत्या एक पोरीसाठी खूप काही कमावून ठेवायचे असे ते नीच वृत्तीचे राजकारणी, नेते नाहीत. असेही नाही कि ते राजकारणातले पतंगराव कदम, डी. वाय. पाटील किंवा दत्ता मेघे आहेत कि घरात एक असतांना बाहेरही चार चार बायका करून तेथेही खंडीभर मुले जन्माला घालून अमाप संपत्ती मिळविण्याकडे ओढा ठेवायचा, हा मुख्यमंत्री कमी गरजा ठेवणारा, निर्व्यसनी आणि २४ तास स्वतःला समाजकारणात गुंतवून ठेवणारा म्हणजे या राज्यातला विवाहित असलेला जणू स्वामी आदित्यनाथ, या राज्याचे हातून भले व्हावे मगच प्राण त्यागावे या बापाकडून मिळालेल्या सुविचारी वृत्तीचा आणि रक्ताचा. त्यांच्या बापाला म्हणजे गंगाधरराव फडणवीस यांनाही मी बऱ्यापैकी जवळून बघितले आहे, घरासाठी काही करून ठेवायचे, त्यांना जणू हे माहित नव्हतेच, असे ते विधान परिषद सदस्य होते, ते गेल्यानंतर देवेंद्रच्या मातोश्रींनी पोटच्या मुलांना कसे मोठे केले असावे, हा प्रश्न मला अनेकदा पडतो. ते अलिकडल्या काळातले तोडपाणी करणारे जे अनेक विधान परिषद सदस्य आहेत, तसे अजिबात नव्हते, उत्तम संसकारातून पुढे आलेले गंगाधरपंत फडणवीस खरे, वास्तवातले कट्टर असे संघ स्वयंसेवक होते, तोच स्वभाव तीच वृत्ती मी देवेंद्र यांच्यातही बघतो किंवा कोणतीही लाज किंवा तमा न बाळगता जेव्हा केव्हा देवेंद्र मला रा. स्व. संघाच्या पोशाखात दिसतात, आश्चर्य वाटत नाही, गंगाधरपंतांची आठवण होते, मनात म्हणतो, बापाच्या कित्येक पाऊल पुढे हे महाशय, बापसे बेटा सवाई, उत्तम असे संघ स्वयंसेवक....
अपूर्ण :

No comments:

Post a comment