Wednesday, 15 March 2017

सुज आलेली भाजपा : पत्रकार हेमंत जोशी


ये दाग अच्छे है, पद्धतीने मी म्हणतो हा मुख्यमंत्री चांगला आहे, कशाला रे उठसुठ बोंब मारत सुटलाय कि देवेंद्र फडणवीस लवकरच देशाचे पुढले सरंक्षण मंत्री असतील. लहान बाळासारखी हेअर स्टाईल किंवा पूर्वी साधनाची जशी हेअर स्टाईल होती त्या पद्धतीने आपली वेगळी हेअर स्टाईल जपणारे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जर लागोपाठ आपल्या राज्याला मुख्यमंत्री म्हणून लाभले नसते तर या राज्यातल्या सुपर अधिकाऱ्यांनी,दिवंगत आर आर पाटील किंवा गणेश नाईकांसारखा एखादा अपवाद सोडल्यास काँग्रेस, राष्ट्रवादीच्या जवळपास साऱ्याच थर्डग्रेड मंत्र्यांनी, दलालांनी हे राज्य आणखी एवढे पोखरून ठेवले असते कि महाराष्ट्र हे देशातले प्रथम क्रमांकाचे भ्रष्ट राज्य ठरले असते, आणि हे मी तुम्हाला नेहमीच सांगत आलोय. फक्त पृथ्वीराज यांना त्यांचा एकच बावळटपणा नडला तो म्हणजे त्यांना या राज्यातली एखाद्याला उंचीवर नेऊन ठेवणारी मीडिया त्या दिवंगत आर आर आबा पाटील यांच्यासारखी सांभाळता आली नाही, एखादा दुसरा अतुल कुलकर्णी सारखा आर्थिक फायदा करून घेणारा दिवटा पत्रकार सोडल्यास आबांकडून अन्य कुठल्याही मीडियाला कधीही आर्थिक अपेक्षा नव्हती, थोडक्यात आम्ही आबांच्या चहाचे देखील लिंपित नव्हतो तरीही त्यांच्यावर राज्यातल्या साऱ्याच मीडियाचे शेवटपर्यंत अतूट प्रेम होते, सामान्य घरातून आलेल्या आबांना या राज्यातली मीडिया, शरद पवार आणि आबांच्या भावुक स्वभावातुन व हातून घडलेल्या कामांनी मोठे केले. हे पृथ्वीराज चव्हाण यांच्या ते लक्षात आले नाही. एखाद्या विटाळशी बाई सारखे ते मीडियाची मीडिया जवळ येताच, शिवू नका शिवू नका, म्हणायचे, त्यामुळेच आज ते जवळून गेलेत तरी पूर्वी ते बोलत नव्हते, आता त्यांच्याशी बोलावेसे वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांचे नेमके उलटे आहे, त्यांना चार ओळी धड लिहिता न येणारा मंत्रालय प्रेस रूम मधला एखादा वार्ताहर जरी भेटायला गेला तरी ते प्रेमाने चांगले शब्द त्याच्याशी असे काही बोलतात कि त्या वार्ताहराला क्षणभर असे वाटते कि त्याचे स्थान गडकरी, केतकर, गोखले, परुळेकर यांच्या रांगेतले आहे, प्रेस रूम मध्ये बोटावर मोजण्याएवढे वार्ताहर किंवा वाहिन्यांचे प्रतिनिधी धर्मेंद्र जोरे, योगेश नाईक, अभिजित मुळे,किरण तारे, श्यामसुंदर सोन्नर, प्रशांत हमीने, संतोष प्रधान यांच्या पंक्तीला बसण्याच्या लायकीचे आहेत, इतर अनेकांविषयी न बोललेले बरे. मंत्रालय प्रेस रूम मध्ये बसून देखील विवेक भावसार सारखे दीर्घ अनुभवी वार्ताहर जेव्हा आर्थिक ऐपत नाही म्हणून बदलापूर वरून दररोज ये जा करतात, तेव्हा असे वार्ताहर आजही मंत्रालयात आहेत, बघून डोळे आनंदाश्रूने भरून येतात. अमुक एखाद्याने घरात टीव्ही फ्रिज घेतला नाही म्हणून तो स्वच्छ आहे असेही समजायचे नसते. देवेंद्र फडणवीस मीडियाशी नक्की चांगले संबंध राखून आहेत पण त्यांचे चांगले बोलणे, सभ्य वागणे जेव्हा समोरचा एखादा मीडियापर्सन गांडूगिरीचे लक्षण समजतो तेव्हा समोरचा भलेही अगदी टाइम्स ऑफ इंडीयाचा किंवा आज तक चा जरी स्वतःला बॉस समजत असला तरी ते त्याला त्याची जागा क्षणार्धात दाखवून देतात, अशी माझी माहिती आहे...

एक मात्र नक्की कि का कोण जाणे पण राहुल गांधी सध्या काँग्रेसच्या प्रचंड विरोधात असावेत कारण असे म्हटल्या जाते कि नरेंद्र मोदी सांगतात, त्या त्या ठिकाणी कुठल्याही निवडणुकी दरम्यान राहुलजी प्रचाराला जातात आणि भाजपाला जिंकवून देतात, राहुल यांचे भाजपावर उपकार आहेत. येथे देखील म्हणजे या राज्यात देखील काँग्रेसने आदर्श फेम अशोक चव्हाण मुख्य गादीवर आणून बसविलेले आहेत, राहुल यांनी वेळ काढून आमच्याही राज्यात अशोक चव्हाण यांना घेऊन प्रचार फेरफटका मारावा म्हणजे या राज्यातली उरली सुरली काँग्रेस एखाद्या जादूगारासारखी गायब होईल. प्रचार दौऱ्यात पैशांची चिंता काँग्रेसने करू नये खर्च भाजपा उचलेलकी. गमतीचा भाग सोडा पण आम्ही सर्वांनी आता हे देखील बघायला हवे कि या राज्यात अलीकडे अचानक मोठ्या प्रमाणावर जी भाजपा फोफावली आहे ती तिची खरी ताकद आहे कि हि भाजपाला आलेली सूज आहे, मी म्हणतो, वेळीच म्हणजे आता यक्षणापासून भाजपाने काळजी घेतली नाही, सावध पावले उचलली नाहीत तर या राज्यातल्या भाजपचा देखील नजीकच्या काळात शरद पवार होईल, राष्ट्रवादी होईल, जशी शरद पवारांच्या राष्ट्रवादीला माजातून आणि अचानक मिळालेल्या सत्तेतून, काळ्या पैशातून सूज चढलेली होती, तेच या राज्यात भाजपा चे होण्यास विलंब लागणार नाही जर अन्य पक्षातील चुकीच्या नेत्यांचे सततचे भाजपच्या नेत्यांनी इनकमिंग सुरु ठेवले तर. या पक्षाला, या राज्याला आणि या देशाला संघ संस्कारातून घडलेला आणि वाढलेला नेताच योग्य ठिकाणी नेऊन भले साधू शकतो, जर भाजप नेते या संघ संस्कारित नेत्यांना दुय्यम स्थान देऊन जशी मुंबई राम कदम, प्रसाद लाड आणि प्रवीण दरेकरांसारख्या उथळ नेत्यांच्या हाती सोपवलेली आहे हे असेच जर भाजपा मध्ये वेगाने घडत गेले तर उद्या याच भाजपाची अवस्था त्या शरद पवारांपेक्षाही बिकट होईल, माझा हा लेख जपून ठेवा. पवारांकडे आवश्यक असलेली जात तरी आहे, होती, भाजपाला ब्राम्हणीचेहरा आहे, त्यांचे वाटोळे करायला अनेक टपलेले आहेत, त्यांनी सावध निर्णय घेणे गरजेचे आहे. त्या दानवेंचे जाऊ द्या, नशिबाने मोठा झालेला हा नेता पण गडकरी, भागवत आणि फडणवीस सारखी मंडळी जर नको त्यांना भाजपामध्ये आणण्यात आनंद मानणार असतील तर सारे संपायला फार वेळ लागणार नाही. भाजपने हे लक्षात घ्यावे त्यांनी २००० मध्ये या राज्यातली गमावलेली सत्ता तब्बल १५ वर्षांच्या अथक परिश्रमातून पुन्हा मिळविली, परत एकदा जर वनवासात त्यांना जायचेच असेल तर न बोललेले बरे....
काही चुटके तुमचे डोके शांत ठेवण्यासाठी, 
परवा जेवतांना ठाणेकर आव्हाड बायकोला म्हणाले, 
आज पोळ्या करपल्यात...
मिसेस आव्हाडांनी रागाने वळून बघताच, 
आवाज बदलून मिष्टर म्हणाले, 
फार छान लागतात, 
कुरूंम कुरूंम....!! 

पुढला चुटका
अलीकडे एक तरुणी पत्रकार हेमंत जोशींच्या 
प्रेमात पडली, ओळख करून देण्यासाठी 
म्हणून ती मुद्दाम आईला घेऊन आली, 
तिच्या आईने हेमंत जोशींना बघितल्या 
बघितल्या त्या बेशुद्ध पडल्या...
चप्पल हुंगवल्यानंतर तरुणीची आई 
शुद्धीवर येताच, काय झाले, 
मुलीने विचारले. 
काही नाही गं..
२२-२३ वर्षांपूर्वी मी देखील यांच्याच 
प्रेमात पडले होते कि...!!

No comments:

Post a comment