Friday, 9 December 2016

शरद पवार राष्ट्रपती आणि राष्ट्रवादी : पत्रकार हेमंत जोशी


 प्रत्येक माणसाने दररोज आत्मपरीक्षण करायला हवे. मनुष्य हा देव नाही किंवा साधू संत नाही कि त्याच्या हातून चुका घडणारच नाहीत म्हणून आत्मपरीक्षण हा त्यावर उत्तम उपाय. माझ्यामध्ये कोणती गोष्ट पशूसारखी आहे आणि कोणती गोष्ट सज्जनासारखी आहे, असे त्याने स्वतःलाच विचारावे. अरे अमुक एक गोष्ट तर इतरांना माझ्यापासून दु:खी कष्टी करणारी आहे, अशी एकदा आपण आपल्याशी नेमकी समजूत करवून घेतली कि आपले अवगुण शरीरातून निघून जायला फारसा वेळ लागत नाही. जसा महारोग किंवा क्षयरोग आपण संसर्गजन्य मानून घरात हे रोग एखाद्याला जडले कि त्याची दुसरीकडे राहायची व्यवस्था करतो तेच हायपर टेन्शन जडलेल्या माणसांच्याबाबतीत तेच. अति रागीट किंवा अतिशय संतापी किंवा अति संशयी स्वभाव हा देखील एक संसर्गजन्य रोग आहे. आपल्या घरात अमुक एखादी व्यक्ती अतिशय रागीट किंवा संतापी असते. अशी व्यक्ती आपल्यावर संतापली चिडली कि आपणही प्रसंगी ताकदीने कमी असलो तरी त्या व्यक्तीला मुहतोड जबाब देण्याचा तेथल्या तेथे प्रयत्न करतो म्हणजेच त्या व्यक्तीचा संसर्ग आपल्यालाही होतो म्हणून घरातील एक रागीट माणूस अख्ख्या घराची राख रांगोळी करतो. मी अतिशय संतापी असल्याने घर उध्वस्त होते आहे, हे त्या त्या माणसाने एकदा मनाशी समजवून घेतले कि स्वभाव बदल व्हायला अनेक उपाय आहेत, तज्ज्ञांचा सल्ला किंवा योगासने किंवा विपसचना इत्यादी हमखास उपायातून माणूस आपल्या स्वभावात अगदी सहज बदल घडवून आणू शकतो, प्रयोग करून बघा...


नागपुरातले अतुल लोंढे कुठलेलंही मराठी बातम्यांचे चॅनेल सुरु केले कि हमखास त्यावर विविध चर्चेदरम्यान राष्ट्रवादी पक्षाची बाजू घेतांना दिसायचे.राष्ट्रवादीची बाजू लढवतांना हा प्रवक्ता आता घसा फाडून बोलतांना बेशुद्ध पडतो कि काय, केबधे त्याचे हे पवार किंवा पक्ष प्रेम असे चॅनेल पाहणाऱ्याला वाटायचे. अतुल लोंढे यांना घरादाराची नव्हे तर शरद पवार आणि त्यांच्या राष्टवादीची अधिक चिंता आहे असेच बघणार्याला वाटायचे किंवा पक्ष प्रेमापायी हा माणूस सतत चॅनेल वर पडीक असतो त्यामुळे त्याचे कुटुंब त्याला चॅनेलच्या कार्यालयातच भेटायला येतात असे कुत्सितपणे लोंढे यांच्याविषयी त्यांच्या पाठी बोलले जायचे. नशीब चॅनेलवर बकबक करतांना लोंढे यांचे लग्न झाले नाही अन्यथा त्यांनी आपला हनिमून देखील मेकअप रूम मध्ये साजरा केला असता असे त्यांचे पक्षांतर्गत विरोधक त्यावेळी म्हणायचे. एवढे लोंढे राष्ट्रवादीमय झालेले होते, तसे भासत होते अर्थात तो एक भास होता, स्वर्थी राजकारणाचा भाग होता. राजकारणात ढोंग कसे रंगविल्या जाते ते आता लोंढे यांच्या वागण्यातून अलीकडे दिसून आले जेव्हा त्यांनी राष्टवादीने त्यांच्यावर केलेले उपकार क्षणार्धात बाजूला ठेवून इंदिरा काँग्रेसमध्ये प्रवेश केला. कालपर्यंत राष्ट्रवादीचा प्रवक्ता म्हणून मराठी चॅनेल वर स्वतःचे थोबाड मिरवून आणणारे अतुल लोंढे आता कदाचित इंदिरा काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादीशी भांडताना तुम्हाला एखाद्या चॅनेलवर चाललेल्या चर्चेदरम्यान दिसतील. कोण वागते हो हे असे कि कालपर्यंत एकाशी घरोबा आणि समोरचा कंगाल होतोय दिसल्या दिसल्या दुसऱ्या नवीन व्यक्तीशी घरोबा....? 

वास्तविक अतुल लोंढे केवळ चॅनेल हे माध्यम वापरायला मिळाले म्हणून त्यांचे थोबाड काहीसे परिचयाचे अन्यथा नेता म्हणून हा माणूस फारसा मोठा आहे किंवा त्यांच्या पक्षांतर करण्याने राष्ट्रवादीची अजिबात हानी वगैरे झालेली नाही पण माणसातली प्रवृत्ती कशी असू शकते त्यावर उदाहरण म्हणून त्यांचे येथे नाव घेतले. मला आठवते, सुरुवातीला लोंढे हे विनायक मेटे यांचे बोट पकडून त्यांच्या शिवसंग्राम पक्षाच्या माध्यमातून राजकारणात आले आणि नंतर केव्हा राष्ट्रवादीमय झाले हे खुद्द मेटे यांच्या देखील लक्षात आले नाही किंवा उद्या अमुक एखाद्या पक्षात लोंढे केव्हा कोलांटी उडी घेतील हे इंदिरा काँग्रेसच्या देखील लक्षात येणार नाही. लोंढे महाचतुर असावेत त्यांना ठाऊक आहे विदर्भात आता जवळपास राष्ट्रवादी संपलेली आहे आणि भाजपमध्ये इच्छुक नेत्यांची किंवा कार्यकर्त्यांची भाऊगर्दी आहे, अमुक एखादे पद निष्ठवान नेते आणि कार्यकर्त्याच्या पदरात टाकण्याची भाजपाची नीती असल्याने आपल्या हाती मिळेल तो कटोरा म्हणून त्यांनी विदर्भात आजही ज्या पक्षाला किंमत आहे, ज्या पक्षाच्या पाठीशी आजही मतदार आहेत जरी पडझड झालेली असली तरी, त्या इंदिरा काँग्रेस मध्ये जाणे त्यांनी पसंत केले असावे. तेच आता माजी मंत्री अनिल देशमुख यांच्याही मनात असावे. मागल्या विधान सभा निवडणुकीत अनिल देशमुख यांचा त्यांच्या पुतण्याने म्हणजे आशिष रणजित देशमुख यांनी त्यांचा पराभव केला होता,पराभवाने खचून न जात जो नेता अगदी निकालाच्या दुसरेदिवशीपासून पुन्हा सार्वजनिक जीवनात स्वतःला जुंपवून घेतो तो पुढल्या 
पाच वर्षानंतर परत एकदा आमदार होतो असा माझा अनुभव आहे त्यामुळे पुढली निवडणूक अनिलबाबू यांनी जिंकून आणल्यास मला त्यात फारसे आश्चर्य वाटणार नाही, त्यांना मितभाषी चिरंजिवांची म्हणजे सलील अनिल देशमुख यांची मिळणारी सुरेख साथ अनिलबाबूंचा उत्साह वाढवणारी आहे. एक मात्र नक्की, अनिल देशमुख हे देखील पुढील विधानसभा शक्यतो विदर्भात डबघाईस आलेल्या राष्ट्रवादीतर्फे लढवतील वाटत नाही, हे त्यांनी नक्की ठरविले आहे असे मला वाटते. राष्ट्रवादी ऐवजी ते इंदिरा काँग्रेस किंवा 
भाजपा तर्फे किंवा नेहमीप्रमाणे अपक्ष म्हणून निवडणूक लढवून सत्तेत घुसण्याचा आटोकाट प्रयत्न करतील कारण सत्तेशिवाय ते वेडेपिसे होतात, असे त्यांच्या जवळचे काही सांगतात....

ज्यांना विदर्भात फारसा जनाधार नाही असे पवारांनी अति लाडावून ठेवलेले प्रफुल पटेल सोडल्यास राष्ट्रवादी पक्षात कोणीही उरलेले नाही, जे माजी राज्यमंत्री राजेंद्र शिंगणे, पुसदच्या नाईक घराण्यातील मनोहर नाईक किंवा भाजपमधून बाहेर पडलेल्या पुरुषोत्तम खेडेकर यांच्या पत्नी, माजी आमदार रेखा खेडेकर यांच्यासारखे थांबले आहेत त्यांचा अधिक वेळ राष्ट्रवादीत कमी इतर कानेकोपरे शोधण्यात जातोय, केव्हा उरले सुरले नेते राष्ट्रवादीतून बाहेर उडी मारतील, अजिबात भरवसा नाही. प्रफुल पटेल यांच्यासारख्या चुकीच्या नेत्यांच्या हाती विदर्भातल्या राष्ट्रवादीची धुरा पवारांनी सोपविल्याने, पक्षाची किंवा पवारांची आर्थिक बाजू कदाचित बळकट झाली असेल पण संख्येने मात्र राष्ट्रवादीला क्षयरोग निदान विदर्भात तरी जडला आहे असे दिसते. काल परवा दत्ता मेघे किंवा संजय खोडके, गिरीश गांधी यांच्यासारख्यांनी पाठ फिरवली आता बोटावर मोजण्याएवढे ' अनिल देशमुख 'कोणत्याही क्षणी विदर्भातल्या उरल्यासुरल्या राष्ट्रवादीला भगदाड पडून बाहेर पडतील हेच उद्याचे कटुसत्य आहे, वस्तुस्थिती आहे....

No comments:

Post a comment