Wednesday, 21 December 2016

घेवारे ला आवरारे ३ : पत्रकार हेमंत जोशी


बायकोबरोबर मेव्हणी फ्री मिळावी किंवा दारात चपला बघितल्यानंतर आधी केस ठीकठाक करून नंतर आवडीच्या गाण्यावर शीळ यासाठी वाजवत आपण आत जातो कारण बायकोची देखणी मैत्रीण घरी आलेली असते. घरात पाऊल ठेवताच, बायकोने लाडात येऊन म्हणावे, अहो ऐकलंत का, आपण उद्या सहलीला जातांना हिला पण सोबत घेऊया का, या वाक्यावर क्षणात आनंदाच्या उकळ्या फुटून मनातल्या मनात जसे आपण देवाचे मनापासून आभार मानतो तसे माझे अलीकडे झाले किंवा एखाद्या खट्याळ पुरुषाच्या पत्नीने आठ दिवस देवदर्शनाला जातांना शेवंता कामवालीवर नवऱ्याची काळजी घेण्याची जबाबदारी टाकल्यानंतर जसे आसमानही अशा त्या पुरुषाला ठेंगणे वाटू लागते तो तसा गगनात न मावणारा आनंद मला झाला पण आनंदाचे निमित्त आणि कारण वेगळे होते, हटके होते. अमिताभने नवख्या अभिनेत्याला, तू छान अभिनय करतो किंवा आलिया भट्टने किशोरी आंबियेला तू माझ्या वयाची दिसतेस किंवा एखाद्या नवख्या अभिनेत्रीने रमेश भाटकरांना तुम्ही पस्तीशीचे का, म्हणावे तसे माझे झाले, आपण स्वप्नात आहोत कि काय असे क्षणभर मला वाटले म्हणून मी कमरेखाली जोराचा चिमटा काढून स्वप्नात नाही याची खात्री करून घेतली. आजकालच्या पिढीला कदाचित माहित नसावे म्हणून सांगतो, आधीच्या पिढीला मी सांगतोय ते तोंडपाठ आहे. न झाले ना होतील त्या लेखन क्षेत्रातले साक्षात परमेश्वर किंवा फारतर ज्यांचा देवदूत म्हणून उल्लेख करावा त्या दिवंगत प्रल्हाद केशव अत्रे यांना दोन मुली, सुप्रसिद्ध लेखिका शिरीष पै आणि 
मीनाताई देशपांडे पैकी शिरीषताई यांचे एक चिरंजीव म्हणजे प्रख्यात वकील राजेंद्र पै आणि मीनाताई यांचे चिरंजीवांना म्हणजे हर्ष देशपांडे यांना पकडणे,मुश्किलही नाही नामूमकिन भी है कारण ते अमेरिकेत असतात आणि सतत जगभर व्यवसायाच्या निमित्ते फिरत असतात, एवढा मोठा माणूस. सध्या मी मीरा भायंदर महापालिकेतील महाबिलंदर नगररचनाकार दिलीप घेवारेवर सडकून लिहितोय, माझ्या त्यातील एका लिखाणावर एकाचवेळी अत्रे घराण्याच्या दोन दोन वारसदारांनी ज्या प्रतिक्रिया मोठ्या मानाने दिल्या, तुम्हीच सांगा, कोणाला होणार नाही बायकोबरोबर सुंदर मेव्हणी मोफत मिळाल्याचा आनंद ?

बोलण्याच्या ओघात ज्यांच्यामुळे सतत अत्रेसाहेबांची आठवण होते ते राजेंद्र पै साहेब लिहितात, अभिनंदन.... पप्पांच्या पत्रकारितेचा वारसा चालविण्याचा प्रयत्न करीत आहेत त्याबद्दल...आणि मीनाताई लिहितात, अभिनंदन ! असेच काम धडाडीने चालू ठेवा, माझे तुम्हाला आशीर्वाद आहेत.....!! वाचकमित्रहो, काय हवे माझ्यासारख्या खेड्यातून हाती कटोरा घेऊन आलेल्या आणि आज हे अमूल्य द्रव्य त्यात टाकल्या गेलेल्या अति सामान्य माणसाला? अशी मोठ्यांकडून प्रेरणा मिळाली कि आपोआप आणखी वेगाने पावले पडतात, अति तीक्ष्ण लिखाणाच्या दिशेने....!!

No comments:

Post a comment