Wednesday, 21 December 2016

घेवारेला आवरारे ४ : पत्रकार हेमंत जोशी


जेव्हा एखादा सरकारी अधिकारी सभोवताली स्वतःचे साम्राज्य निर्माण करतो तेव्हा असे साम्राज्य भेदणारा व्यक्ती न झुकणारा, विकल्या न जाणारा, दबावाला आणि पैशांना भीक न घालणारा, न घाबरणारा, पाठपुरावा करणारा, खमक्या, धाडसी, प्रभावी, माहिती देणाऱ्यांची नावे गुपित ठेवणारा असावा लागतो. आम्ही मित्र मीरा भायंदर महापालिकेचा भ्रष्ट आणि भामटा नगररचनाकार दिलीप घेवारेविषयी माहिती जमा करीत असतांना जेव्हा नारायणराव राणे यांचे बेधडक चिरंजीव आमदार नितेश राणे घेवारे विरोधात उतरले आहेत, ऐकून आम्ही काहीसे समाधानी झालो कारण घेवारेचे हात स्थानिक कल्पतरू मेहता सारख्या स्थानिक मंडळींबरोबर प्रेमाने कि व्यवसायात गुंतलेले असल्याने घेवारे विरुद्ध यशस्वी लढा देणे तेवढे सोपे नव्हते, आजही नाही फक्त समाधान याचे आहे कि आपले मुख्यमंत्री खमके 
असल्याने घेवारेला वाचविण्यासाठी मीरा भायंदर मधले भाजप नेते असोत कि बिल्डर लॉबी किंवा राज्यातले प्रभावी नेते असोत कि मंत्रालयातील नगरविकास खात्याशी संपर्क आलेले सचिव पातळीवरील सरकारी अधिकारी, थोडक्यात आमच्यासाठी आशेचा किरण ठरलेले मुख्यमंत्री फडणवीस, तक्रार त्यांच्या विरोधकांनी म्हणजे प्रसंगी नितेश राणे यांच्यासारख्या नेत्यांनी जरी केलेली असली तरी मुख्यमंत्री घेवारेस न वाचवता नेमके सत्य शोधण्याचा प्रयत्न करतील अशी खात्री आहे. आज अवस्था अशी आहे कि राज्यात कुठेही नाही असे अद्ययावत कार्यालय दिलीप घेवारे यांचे मीरा भायंदर महापालिकेच्या इमारतीमध्ये आहे, अख्खा मजला दिलीप घेवारे यांनी त्यांच्या कार्यालयासाठी व्यापला आहे. पत्रकार असोत कि माहितीचे अधिकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते,नगरसेवक असोत कि स्थानिक पुढारी, महापालिकेच्या घेवारे यांच्या हद्दीत अगदी सहज कोणालाही प्रवेश नाही. बांधकाम व्यवसायिक किंवा या व्यवसायाशी 
संबंधित जे दलाल किंवा घेवारे यांच्या मर्जीतले नेते आहेत त्यांना मात्र अगदी सहज पायघड्या घालून प्रवेश असतो. लोकांना घेवारे यांच्या भ्रष्ट साम्राज्यावर जर मनमोकळेपणाने शासकीय गुप्त यंत्रणांना बोलते करायचे असेल तर माननीय मुख्यमंत्र्यांनी तडकाफडकी दिलीप घेवारे यांची अन्यत्र अगदी दूरवर बदली करणे अत्यावश्यक आहे. जसे अलीकडे जेव्हा मुख्यमंत्र्यांकडे शासकीय अधिकारी आणि 
प्रशासकीय अधिकाऱ्यांचे शहापूर जमिनीचे घपला प्रकरण हाती आले तेव्हा चौकशी सुरु करण्याआधी त्यांनी कोकण आयुक्त कार्यालयात ठाण मांडून बसलेल्या कैलास जाधव यांची अगदी दूर म्हणजे लातूरला बदली केली. अतिशय प्रभावी असलेले कैलास जाधव जर चौकशी दरम्यान कोकण आयुक्त कार्यालयात कार्यरत राहिले असते किंवा मुंबईतच अन्यत्र त्यांची बदली केल्या गेली असती तर शहापूर जमीन घपला प्रकरण अगदी सहज आतल्या आत दाबल्या गेले असते असा संशय मुख्यमंत्र्यांना आला असावा त्यातून जाधव यांना खूप दूरवर तडकाफडकी फेकल्या गेले, तेही मराठ्यांचे मोर्चे निघत असतांना, कारण या मोर्चाचे नियोजन करणाऱ्या अधिकाऱ्याला सहजासहजी हलविणे सोपे नव्हते तसेही जाधव यांची बदली झाल्यानंतर ती रद्द करवून आणण्यासाठी जो दबाव मुख्यमंत्र्यांवर आला, ऐकून आम्हा सामान्यांना घाम फुटेल. एक मात्र नक्की कोकण आयुक्त कार्यालयातील अनेक भानगडी नजीकच्या काळात बाहेर पडण्याची अधिक शक्यता आता निर्माण झालेली आहे. तीच भीती सध्या मीरा भायंदर नगररचनाकार दिलीप घेवारे यांच्या बाबतीत वाटते. ज्या पद्धतीने घेवारे यांचे मुख्यमंत्री कार्यालयातील काही बरक्या आणि जमीन व्यवहारात गुंतलेल्या अधिकाऱ्यांशी किंवा सचिव पातळीवर काम करणाऱ्या शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांशी घरोब्याचे आणि व्यवसायिक संबंध आहेत, मनाला शंका चाटून जाते माननीय मुख्यमंत्री बिल्डर लॉबी, अधिकाऱ्यांची लॉबी भाजपचे स्थानिक नेते किंवा अन्य कोणीही, दबावाला बळी न पडता, दिलीप घेवारे यांची बदली करण्याचा आवश्यक तडकाफडकी आणि कठोर निर्णय नेमका केव्हा घेतील, घेणार आहेत. ज्या मराठवाड्यात दिलीप घेवारे व त्यांच्या नातेवाईकांची जमिनीत मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आहे त्याच लातूर औरंगाबाद मराठवाड्यात घेवारे यांची बदली होता काम नये आणि कोकणातही नाही, घेवारे यांच्यासाठी विदर्भातील गडचिरोली जिल्हा अधिक योग्य, त्या परिसरात त्यांच्याहातून माननीय मुख्यमंत्र्यांनी राज्याचे भले करून घ्यावे, खूप कमावून झाले. आतातरी घेवारे यांच्या हातून सत्कार्य घडावे....

पुन्हा एकदा अगदी अगदी मनापासून आमदार नितेश राणे यांचे अभिनंदन. विषयांतर करतांना एवढेच म्हणता येईल पार पडलेल्या हिवाळी अधिवेशनात जर राष्ट्रवादीचे धनंजय मुंडे आणि काँग्रेस चे नारायण राणे विधान परिषद गाजवून मोकळे झाले नसते तर हे अधिवेशन जवळून बघणाऱ्या आम्हा पत्रकारांना वाटले असते कि एखादा पैलवान प्रेतासंगे हनिमून साजरा करतोय, किंवा एक दुजे के लिये या सिनेमातला खलनायक चित्रपटाच्या शेवटी मरण पावलेल्या नायिकेसंगे जसा व्यभिचार करतो ते तसे वाटले असते, होयबा छाप विरोधी पुढाऱ्यांची संख्या अधिक होती, सुदैवाने नारायण राणे आणि धनंजय मुंडे विधान परिषदेत आक्रमक होऊन ज्या पद्धतीने लढत होते, मनातले सांगतो, अधिवेशनात थोडीफार जान आली. दुर्दैवाने मुंडे आणि राणे दोघेही मागच्या दराने निवडून आलेले आमदार म्हणजे विधान परिषद सदस्य, त्यामुळे हवी तशी हवा निर्माण करतांना त्यांनाही फारसे यश आले नाही. धनंजय मुंडे त्यांच्यावरच्या प्रेमापोटी एक सल्ला त्यांना द्यावा वाटतो. धनंजय आणि पंकजा या दोन नेतृत्वात तुलना करायची झाल्यास धनंजय हे राजकारणातले अमिताभ तर पंकजा म्हणजे अलोकनाथ असे वर्णन करता येईल. आज ज्या पद्धतीने धनंजय राजकीय आणि सामाजिक क्षेत्र व्यापू बघताहेत, मला फारसे आश्चर्य वाटणार नाही जेव्हा ते एक दिवस त्यांच्या दिवंगत काकाच्या पुढे निघून जातील किंवा त्यांची बरोबरी साधतील पण काही प्रकरणी संयम हवा, अधिवेशनादरम्यान अमुक एखाद्या मुद्द्यावर आपण दलालांकडून दाबल्या गेलो असे कानावर पडता काम नये. आपले कार्यालय म्हणजे तोडपाणी करणाऱ्या पत्रकारांचा आणि दलालांचा अधिवेशनादरम्यान अड्डा होता, अशी चर्चा पसरता कामा नये, धनंजय यांना आणखी आणखी खूप खूप मोठे व्हायचे आहे आणि त्यांना झेप घेण्या आता कोणीही अडवू शकणे अशक्य आहे.लक्षात राहील असे अजित पवार यांनी केलेले अतिशय उत्कृष्ट काम म्हणजे जेव्हा धनंजय यांना भक्कम राजकीय आधाराची अतिशय गरज होती तेव्हा अजितदादा यांनीच अगदी ठरवून धनंजय मुंडे यांना राष्ट्रवादीत आणले, आमदार केले, विधान परिषदेत विरोधी पक्ष नेता म्हणून आणून बसविले. पुढले काम मुंडे यांनी अतिशय छान पार पडले, त्यांनी पंकजा यांच्या खूप पुढे जाऊन राजकारणात स्वतःला प्रस्थापित केले आणि मीच मुंडे घराण्यातला पुढला मोठा नेता, दिवसरात्र काकांसारखे सामान्य लोकात राहून सामान्यांसाठी झिझून सिद्ध केले. त्यांनी आता सावध असावे, बदनाम होऊ नये....
क्रमश:

No comments:

Post a comment